मुंबई, ता. २३ - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना अमेरिकन काँग्रेसकडून भेटीचे निमंत्रण देण्यात आलेआहे. अमेरिकेस भेट देण्याचे हे निमंत्रण तेथील संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीअंतर्गत असलेल्या आशिया-पॅसिफिक विषयक उपसमितीचे रँकिंग मेंबर एफ. एच. फॅलेओमावेगा यांनी पाठविले आहे.
श्री. भुजबळ यांना वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकन काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न करता येऊ शकतील, यादृष्टीने चर्चा करण्याची अपेक्षा निमंत्रणात व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या १० जानेवारी ११ ला अमेरिकेतील नॉर्थ डकोटा प्रांताचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली होती. भुजबळ यांच्या भेटीमुळे प्रभावित झालेल्या अलायन्स फॉर यूएस-इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी यांनी अमेरिकन परराष्ट्र व्यवहार (आशिया-पॅसिफिक) उपसमितीचे रँकिंग मेंबर व यूएस-इंडिया ट्रेड काँग्रेशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष एफ. एच. फॅलेओमावेगा यांना भुजबळ यांच्याविषयी सांगितल्यानंतर थेट निमंत्रणच पाठविण्यात आले आहे. उभय देशात व्यवसाय-व्यापार तसेच विविध क्षेत्रात संधींबाबत ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.