मुंबई, ता. १८ - मराठी चित्रपट निर्मितीसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या धर्तीवर नाट्यनिर्मितीसाठी अनुदान देण्यात यावे. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
मराठी रंगकर्मींच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत ते बोलत होते. आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नाट्य निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
नाट्यनिर्मात्यांना तांत्रिक कारणास्तव अनुदान मंजूर होत नाही, अशी अडचण सांगितल्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, की मराठी चित्रपटांना ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते तीच पद्धत नाट्यनिर्मात्यांना अनुदान देण्यासाठी अनुलंबली जावी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाट्यगृह उभारले जावे. यासाठी जिल्हा विकास आराखड्यात निधीची तरतूद करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील. नाट्यगृहांच्या उभारणीसाठी स्थानिक आमदारांच्या विकास निधीतूनही मदत घेता येईल. तसेच नागपूर येथे आणखी एक नाट्यगृह उभारण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यवाही करावी असेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले, की विविध संस्थांना मंजूरी आणि अनुदान देण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया बदलण्यात येणार आहेत. यानंतर निर्मात्यांना अतिशय व्यवस्थित आणि अडथळ्याविना अनुदान मिळेल. आमदार हेमंत टकले, वित्त व नियोजन विभाग मुख्यसचिव सुधीर श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेत्री व निर्मात्या स्मिता तळवलकर, लता नार्वेकर, दीपक करंजीकर, दिलीप जाधव, सुधीर भट, संतोष कोचरकर, चंदू लोकरे, प्रसाद कांबळी आदी उपस्थित होते.