मुंबई, ता. २३ - कोल्हापूर शहरासाठीची थेट पाणीपुरवठा योजना आणि महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वतः मान्यता दिली. शहरातील विविध कामांबाबत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर शहरासाठीच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले, की योजनेचा आर्थिक बोजा, भविष्यातील देखभाल दुरुस्ती व काम करण्याची सुलभता यांचा तौलनिक अभ्यास करून योग्य योजना राबवावी. कोल्हापूर महानगरपालिकेकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे याचाही विचार व्हावा. ही थकबाकी असतानाही आम्ही नव्या योजनेसाठी विशेष बाब म्हणून निधी देत आहोत. ही योजना योग्यरित्या राबविली आणि चालविली गेली पाहिजे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. ही योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी पालकमंत्री, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक येतातय यामुळे महालक्ष्मी मंदिराचा शेगाव धर्तीवर विकास व्हायला हवा. शहरातील अंतर्गत रस्ते विकास प्रकल्पातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी सार्वजनिक उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी करण्याची सूचना यावेळी पवार यांनी केली.
गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर वंदन बुचडे उपस्थित होते.