१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करणार्या अफजल गुरू याने आपल्याला जम्मू-काश्मिर येथील तुरुंगात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. शासनाने गुरूची ही मागणी सपशेल अमान्य करावी. फाशीची शिक्षा ठोठावण्यात या देशद्रोह्याला अद्याप फाशी झाली नाही, परंतू त्याची मागणी शासन अमान्य करीत असल्याचे ऐकून तरी या हल्ल्यात क्षती पोहोचलेल्यांच्या कुटुंबियांना धन्य वाटेल.
संसदेवर हल्ला करून संसदेचे किंबहुना संपूर्ण देशाचेच पावित्र्य आणि शांतता भंग करणार्या अफजल गुरूला फाशीची शिक्षा सुनावून बरेच दिवस उलटले. परंतू दुर्दैवाने अद्याप यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. आपल्या सुरक्षा यंत्रणेने त्वरीत सडेतोड प्रत्युत्तर देऊन चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले हे कौतुकास्पद आहे. मुंबई हल्ल्यातील एकमेव आरोपी अजमल कसाब यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने त्याच्या फाशी संदर्भात आपला निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय होईल तेव्हा होईल, परंतू देशद्रोही, अतिरेक्यांच्या फाशीसाठी इतका विलंब होत असल्यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा आणि शासनावरचा विश्वास उडत चालला आहे. वास्तविक अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या कार्यवाहीसाठी, घातपाती कृत्त्यांबाबत, अतिरेकी कारवायांबाबत, घातक कृत्त्यांबाबत शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून अल्पावधीत निर्णय देणे आवश्यक आहे.
अफजल गुरू याने आपल्याला दिल्लीच्या तिहार कारागृहातून हलवून जम्मू-काश्मिर च्या कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी नुकतीच केली आहे. यासंदर्भात न्यायालयाने शासनाकडे काही विचारणा केली आहे. गुरू याने संसदेवर हल्ला करताना हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या तसेच कायमची क्षती झालेल्या सुरक्षा कर्मचारी अथवा संबंधितांच्या कुटुंबियांच्या झालेल्या अवस्थेचा विचार तेव्हा केला नसावा. आपले कुटुंबीय जम्मू-काश्मिर येथे रहात असून आपल्याला भेटण्यासाठी येथे येणे त्यांना अडचणीचे होत असल्यामुळे आपल्याला जम्मू-काश्मिर कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी त्याने केली आहे. संसदेवरील हल्ल्यात क्षती झालेल्या कुटुंबियांना तर त्यांच्या व्यक्तीस कायमचे गमवावे लागले आहे. त्यांची व्यक्ती त्यांना पुन्हा कधीही न भेटण्यासाठी देशासाठी बलिदान देऊन भारतमातेच्या कुशीत सामावली आहे. शासनाने याचे भान ठेवून गुरू याची कोणतीही मागणी मान्य न केल्यास खरोखर शहाणपणाचा निर्णय ठरेल, हाच विश्वास!
देशात झालेले अतिरेकी हल्ले:
१२ मार्च १९९३ - मुंबई - २५७ ठार
१४ फेब्रुवारी १९९८ - कोईम्बतूर - ४६ ठार
१ ऑक्टोबर २००१ - जम्मू-काश्मीर विधानभवन - ३५ ठार
१३ डिसेंबर २००१ - नवी दिल्ली येथे भारतीय संसदेवर हल्ला
२४ सप्टेंबर २००२ - अक्षरधाम मंदिरावर हल्ला - ३१ ठार
१४ मे २००३ - जम्मूच्या लष्करी तळावर हल्ला - ३० ठार
२५ ऑगस्ट २००३ - मुंबईत कार बॉम्बचा स्फोट - ५२ ठार
१५ ऑगस्ट २००४ - आसाममध्ये स्फोट - १६ ठार
५ जुलै २००५ - अयोध्येत हल्ला
२९ ऑक्टोबर २००५- नवी दिल्ली तीन जागी बॉम्बस्फोट - ७० ठार
७ मार्च २००६ - वाराणसी येथे बॉम्बस्फोट - २१ ठार
११ जुलै २००६ - मुंबई लोकल रेल्वेगाड्यांत सात बॉम्बस्फोट - सुमारे २०० पेक्षा अधिक ठार
८ सप्टेंबर २००६ - मालेगाव मशिदीत बॉम्बस्फोट - ३७ ठार, सुमारे १२५ पेक्षा अधिक जखमी
१८ मे २००७ - हैदराबाद मक्का मशिदीवर हल्ला - ४ पोलिसांसह १३ ठार
२५ ऑगस्ट २००७- हैदराबाद लुम्बिनी पार्कमध्ये स्फोट - ४२ ठार
१३ मे २००८ - जयपूर - बॉम्बस्फोटांची मालिका - सुमारे १०० पेक्षा अधिक ठार