मुंबई, ता. २४ - आंबोली घाटात वनविभागाच्या हद्दीतील संरक्षक भिंत बांधण्याचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. वनविभागास आवश्यक ते तांत्रिक सहकार्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी करावे अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आंबोली वनविभागाच्या हद्दीतील कामांबाबत आयोजित बैठकीत श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर, सा.बां.विभागाचे सचिव धनंजय धवड, वनविभाग सहसचिव प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.
गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या पावसाने आंबोली घाटातील १०० मीटर लांबीची आणि ४० मीटरपेक्षाही उंचीची दरड कोसळली होती. युद्धपातळीवर काम करून येथील वाहतूक सुरळीत करावी लागली होती. संरक्षक भिंत बांधण्याचे काम वेळेतच पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात पुन्हा एखादी मोठी दरड कोसळून जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आवश्यक ते सर्व सहाय्य घेण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले आहेत.