मुंबई, ता. ६- लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार मनोहर जोशी यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले आहे. मनोहर जोशी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनीही दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तसेच शिवसैनिकांनी जोशी यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनीही श्री. जोशी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.