अवकाळी पावसामुळे सर्वाधिक झळ बसलेला कांदा या पीकाच्या किंमती वाढणार हे स्वाभाविक होतेच. यातूनही काही बहाद्दरांनी फेकलेल्या सडक्या कांद्यातून त्यांना बरा वाटणारा कांदा वेचला. नागरीकांनी देखील विशेषतः महिलांनीही दोन पैसे वाचतील म्हणून स्वस्तात मिळणारा कांदा दोन, पाच किलो घेऊन ठेवला. मात्र हा कांदा देखील जास्त दिवस टिकू शकला नाही. चार-पाच दिवसातच कांद्याला अंकूर फुटल्यामुले पुन्हा एकदा हा फेकण्यात आला. यानंतर कांद्याच्या किंमती सातत्याने गगनाला गवसणी घालत असल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणले होते. याच कांद्याने आता त्यापेक्षा पलिकडे जाऊन न खाताच चांगला झोंबून तिखट लागल्यामुळे नाकात दम आणला आहे. सांगलीसह काही शहरांमध्ये तर चक्क ६५ (पासष्ट) रूपये प्रति किलो या दराने कांदा विकला जात आहे. नाशिक, मुंबई चाळीस ते पन्नास रूपये असा दर आहे. मध्यमवर्गीयांनी मात्र कांदा न खाणेच पसंत केले आहे. या दरवाढीमुळे, नुकतेच चंपा षष्ठीला संपलेले चातुर्मास आणखी काही दिवस सुरू राहतील, असे गृहिणी मानत आहेत.
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.