(संग्रहित छायाचित्र) |
संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत मुंबईतील महत्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन बेछुट गोळीबार करून देशाच्या अनेक नागरिकांना आणि कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देणार्या अधिकार्यांना देखील मारणार्या नराधम अतिरेक्यांपैकी कसाब हा एक अतिरेकी सुरक्षा पथकांच्या हाती जखमी अवस्थेत जीवंत सापडला. रुग्णालयातून उपचार घेऊन बरा झाल्यानंतर कसाबची रवानगी तुरुंगात करण्यात येऊन त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. स्वतंत्र सेल, स्क्वॉड, यंत्रणा..सर्वच अगदी स्वतंत्र..। खरंतर प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेर्यांनी कसाब याने गोळी झाडताना दाखविल्याची चित्रफीत उपलब्ध असताना आणखी पुरावे मागण्याची मुळात गरजच काय?
कसाब याचे जेवण, राहणी, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तैनाती, वाहतूक, वहन, तपासण्या, विशेष वकील इ.वर दररोज लाखो रुपये खर्च झाला असून हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात तर कधीच पोहोचला आहे. मध्यंतर तो तुरुंगाधिकार्यांशी वाईट वागला, कुटे थुंकला, तरीही सर्व काही निमुटपणे सहन करायचे..। इतकी सन्मानाची वागणूक त्याला कशाला हवी? पाकिस्तानमधील भारतीय वंशाच्या लोकांना अथवा भारतीय कैद्यांना मिळणारी वागणूक शासनाने ध्यानात घेणे नितांत गरजेचे आहे. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची देखील अनेक उदाहरणे आजकाल समोर येत आहेत. परंतु इतक्या मोठ्या देशद्रोह्याला, अतिरेक्याला पोलिस संरक्षणाची गरजच का? कसाबकडून मिळवायची तेवढी माहिती घेणे पूर्ण झाल्याचे सुरक्षा यंत्रणेचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याला जनतेच्या सुपूर्द करणे अथवा लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे आवश्यक ठरले आहे. दोन वर्ष उलटून देखील अद्याप त्यावर निर्णय न होऊ शकणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.
अतिरेकी, देशद्रोही यांच्यासाठी विशेष कायद्याची तरतूद घटनेत करण्यात यावी. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांना अजिबात पायबंद न बसता उलटपक्षी पोषक वातावरण, परिस्थिती निर्माण होईल. शासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देऊन संभाव्य खर्च टाळण्यात यावा. खर्च होणारी रक्कम शहीदांच्या कुटूंबांना दिल्यास मोठा आधार होऊन, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, हवे तसे शिक्षण घेता येईल, देशाच्या शिलकेत एकप्रकारे भरच पडेल, हाच विश्वास!