नागपूर, ता. २१- येत्या १ डिसेंबरपासून नागपूर येते सुरू होत असलेल्या विधीमंडळ-हिवाळी अधिवेशनाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत आढावा घेतला. यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पीठासन अधिकार्यांच्या निवासस्थानांखेरीज यंदाही, रवीभवन येथे २४ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्र्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य अधिकारी, कमर्चारी यांच्यासाठी निवासव्यवस्था पूर्ववत राहील. कर्मचार्यांसाठी १६० सह ६४ अतिरिक्त निवासी गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींची निवास व्यवस्था देखील 'सुयोग' येथे करण्यात आल्याचे सचिव नंदकुमार जंत्रे यांनी सांगितले. बैठकीस सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव, विविध विभाग वरिष्ठ अधिकारी, नागपूर येथील स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.