मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी


मुंबई, दि. 9 जून : मुंबईमधील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन मंडळाने तातडीने सल्लागार कंपनीची नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून सर्वंकष विकास आराखडा तातडीने तयार करून घ्यावा, असा आदेश राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज दिला.
श्री. भुजबळ म्हणाले, मुंबईच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबरच या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मुंबई महानगरपालिका, दोन जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्हा नियोजन समित्या, केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग, वन, पर्यावरण आणि तत्सम अन्य सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संस्थांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधून प्रयत्न करण्याची गरज आहे. या विविध यंत्रणांमधील प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन करावी. तसे झाले तरच त्यांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या बाबतीतही सुसूत्रता प्रस्थापित होईल आणि मुंबईचा खऱ्या अर्थाने पर्यटन विकास साधणे शक्य होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध कुमार, मुंबई शहर जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.एम. रामचंदानी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संचालक एम.एस. चौहान, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक संजय पाटील, एमटीडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर यांच्यासह बंदरे, नगरविकास, वने या विभागांचे तसेच एम.एम.आर.डी.ए. आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, मुंबई पर्यटनदृष्ट्या खरोखरीच चांगली करावयाची असेल, पर्यटनस्थळांचे योग्य संवर्धन करावयाचे असेल तर इथल्या सर्व पर्यटनस्थळांच्या सद्यस्थितीची आणि तेथे करता येऊ शकणाऱ्या विकासकामांच्या माहितीची  देवाणघेवाण सर्व संबंधित यंत्रणांमध्ये झालीच पाहिजे. त्यामध्ये जी पुरातत्त्वदृष्ट्या महत्वाची ठिकाणे आहेत, त्यांचाही पुरातत्त्वविषयक निकषांनुसार संवर्धन व विकास करण्याबाबत कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे प्रचलित पर्यटनस्थळांबरोबर शहरात ठिकठिकाणी नवीन छोटे छोटे टुरिस्ट स्पॉटही विकसित झाले आहेत, काही निर्माण होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व ठिकाणांचेही व्यावसायिक सल्लागारामार्फत सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सुद्धा पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा विकसित करण्याची गरज आहे, याचाही अभ्यास करावा. एकूणातच सल्लागार आणि समन्वय समिती या दोहोंच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार झाला पाहिजे, अशी अपेक्षा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी अंधेरी येथील गिल्बर्ट हिल या हेरिटेज साईटचे संरक्षण, संवर्धन करून पर्यटकांचा ओघ वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. गिल्बर्ट हिल सध्या झोपड्यांच्या अतिक्रमणाने वेढले आहे. अतिशय सुंदर मंदिर आणि उद्यान असलेल्या या टेकडीकडे जाणारा रोप-वे विकसित करण्याबरोबरच हेरिटेज नियमांचा आधार घेऊन अतिक्रमणे हटविण्याबाबत अथवा त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय कार्यवाही करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. जुहू आणि वर्सोवा या किनाऱ्यांवर हंगामी स्वरुपात का असेना, पण पॅरासेलिंगसारख्या वॉटर-स्पोर्ट्सना परवानगी देण्याबाबतही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी मुंबईतील पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमावी आणि आयुक्तांचे मार्गदर्शन व सल्ल्यानुसार पर्यटन महामंडळ मुंबईतील विविध विकासकामे करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निर्मलकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कान्हेरी गुंफा, जुहू, गिल्बर्ट हिल, पवई तलाव, एरंगळ किनारा, महाकाली गुंफा, मनोरी चौपाटी, बँडस्टँड, जोगेश्वरी, गोराई परिसर, आरे कॉलनी, मढ आयलंड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी पर्यटनस्थळांसाठी सहा कोटी रुपये खर्चाची कामे करण्यात आल्याची माहिती दिली.
मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी बाणगंगा तलावातील गाळ काढण्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे माहीम किल्ला आणि वरळी किल्ला यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यामध्ये झोपड्यांच्या अतिक्रमणाचा मोठा अडथळा असल्याचे सांगितले. राज्य पुरातत्व विभागाकडूनही सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एमटीडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी मरोळ गार्डन येथे पर्यटन महामंडळाने साडेसहा कोटी रुपयांच्या खर्चातून आधुनिक संगीत कारंजा विकसित केला असून मुंबई महापालिकेकडून ताबा घेतल्या जाण्याच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती यावेळी दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...