गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...

सचिनच्या दोनशे धावांच्या निमित्ताने...

ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारीला भारताने आक्रमक खेळी करून विजयाची माळ गळ्यात तर घातलीच, मात्र, सचिन तेंडुलकर याने चक्क दोनशे धावांचा सहजगत्या विश्वविक्रम नोंदवून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एक दिवसीय सामन्यात सेहेचाळीसावे शतक ठोकून सचिनने इतर कसोटीपटूंपुढे आव्हान उभे केले असून एक आदर्श देखील घालून दिला आहे. आणखी चार शतके करून आपले पन्नासावे शतक सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात करून, उन्मत्त झालेल्या कांगारूंना धूळ चारावी, हीच अपेक्षा...।

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

"माओवाद" भूमीवाद अजून किती जीव घेणार...

पश्‍चिम बंगालमधील पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यामध्ये सिल्धा परिसरात माओवाद्यांनी संयुक्त सुरक्षा दलाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात सोमवारी 24 जवान ठार झाले. मोटारसायकलींवरून आलेल्या पन्नासपेक्षा अधिक माओवाद्यांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याधुनिक शस्त्रांनी दहा मिनिटे हल्ला केला. अनेक वर्षांपासून माओवाद, भारत-चीन, भारत-पाकिस्तान भूमीवादावरून अतिरेकी, नक्शलवादी यांचे भारतात अनेक ठिकाणी हल्ले झाले आहेत, होत आहेत. सीमेवर बिचारे जवान अहोरात्र लढताहेत. परंतु अद्याप शासन गप्प का? केवळ फाइलमध्ये किंवा कागदी घोडे नाचवून काहीच उपयोग नाही, हे नुकत्याच झालेल्या या हल्ल्याने सिद्ध केले आहे. कसाबची साक्ष देखील जवळपास पूर्ण झाली आहे. मग आता हे रेंगाळणे का? आदेश न मानणार्‍या लोकांना माओवादी बेदम झोडपतात ही दंडूकेशाही आणि बंदूकशाही नव्याने सावकारीसारखी सुरू होत आहे, भविष्यातल्या अराजकतेची ही नांदी आहे. पुण्यातही जर्मन बेकरी घटना ताजी आहेच.. केवळ सुरक्षा यंत्रणांना दोष देण्यात काहीच तथ्य नाही, त्या यंत्रणा आपल्या परिने कार्य करून वेळोवेळी सतर्क देखील करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आणि सर्वच विरोधी पक्षांनी त्वरीत पावले उचलून तीनही सेनादलांना कारवाईचे आदेश देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

देशातल्या प्रजेचे काय होणार...?

आज आपल्या देशाचा 60 वा प्रजासत्ताक दिन आहे. येथे विविध सरकारे आली आणि गेली, प्रत्येक वेळी प्रत्येक सरकारकडून वचनं, आश्वासनं...आणि देशातल्या प्रजेस फक्त आशा, अपेक्षा...यापेक्षा दुसरं काहीही नाही. दरडोई उत्पन्न वाढल्याचा दावा होत असला तरीही दिवसेंदिवस महागाई, लोकसंख्या वाढते आहे, अंतर्गत आणि सीमेपलीकडचे शत्रूही वाढताहेत, सामान्य नागरिकाला घराबाहेर गेल्यानंतर आपण घरी परत सुखरूप येऊ अथवा नाही, जीवंत परत येऊच याची शाश्वती वाटत नाही- अशी परिस्थिती निर्माण झाली असून...जगात एक महासत्ता बनण्याची स्वप्न रंगविणार्‍या आणि शक्यता असणार्‍या या देशाच्या प्रजेचे नेमके होणार तरी काय...?
देणाराचे हात हजार..., देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, एक दिवस...या ओळींप्रमाणेच सध्याची स्थिती आहे, या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे हजार हातांनी दिले जाते, ते सुद्धा भरघोस...। भारतावर कितीतरी आक्रमणे झाल्याचा इतिहास आहेच. इंग्रजांच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठीही दीडशे वर्ष लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच देशाची पाकिस्तानरुपी फाळणी झाली, कालांतराने पाकिस्तानने काश्मिरचा बराच भाग ताब्यात घेतला, चीननेही अरुणाचलसह मोठा भूभाग बळकावला असून आम्ही मोठ्या मनाने आणि मोकळ्या तो देऊनही टाकला. भारत-चीन सीमेदरम्यान सिंधू नदीपर्यंतचा भूभाग बळकावण्याचा कट चीनने आखला आहे, अशी गंभीर नोंद जम्मू-काश्‍मीर सरकारच्या एका अहवालात करण्यात आली आहे. त्याच हेतूने लेहच्या ईशान्येकडे असणाऱ्या डोकबुग परिसराला चीनने लक्ष्य केल्याची नोंदही या अहवालात आहे. पाकिस्तान, चीन पासून देशाला मोठा धोका केव्हाही होऊ शकतो. बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ सारख्या अनेक देशांमध्ये अंतर्गत बंडाळीचे चित्र असून येथेही नक्शलवाद फोफावला आहेच.
नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या, तरीही दोन्ही बाजूंच्या आतला भाग दाबला जातो, तशीच काहीशी स्थिती आपल्या देशाची आहे. एका बाजूने पाकिस्तान आणि दुसर्‍या बाजूने चीन देशावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याचे सुरक्षा गुप्तचरांच्या अहवालावरून वाटते. तरीही आम्ही गप्प का? केवळ बैठका, चर्चेच्या फेर्‍यांमध्ये काही साध्य होईल असे सरकारला वाटते तरी कसे? बैठक यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा आणखी एक बैठक आयोजित केली जाते. हे सीमापार विषयांसाठीच नाही, तर देशांतर्गत असलेल्या माओवादी, अन्य नक्शलवादी यांच्याशी चर्चा करतानाही मवाळ धोरणाचा अवलंब का केला जातो? जम्मू आणि काश्मिरच्या उत्तरपूर्व क्षेत्रात लडाख जिल्ह्यातील अक्साई आणि दुसरे कारणही उत्तर-पूर्व विभागातील एका भागास भारताने आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप चीन ने केला असून यामुळे नेहमीच भारताविरुद्ध अनुक्रमे पाकिस्तान आणि चीनकडून कागाळ्या केल्या जातात. उपलब्ध आकडेवारीनुसार भारताने 1970 पासून 2004 दरम्यान अतिरेक्यांनी 4,100 वेळा हल्ला केला आहे. यात सुमारे बारा हजार जणांचे बळी गेल्याची नोंद आहे (संदर्भः ग्लोबल टेररिझम डेटाबेस आणि स्टडी ऑफ टेररिझम अँड रिस्पॉन्सेस (स्टार्ट)). स्टार्टकडील नोंदीनुसार भारतात सीमीसह अतिरेक्यांचे 56 गट आहेत. उपरोक्त कालावधीत देशात दरवर्षी सरासरी सुमारे 360 लोक प्राणघातक हल्ल्यात बळी पडले. अतिरेक्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे प्रमाण 38.7 टक्के, तर 29.7 टक्के बॉम्बहल्ला आणि 25.5 टक्के वेळा भ्याड हल्ला करण्यात आला. संपूर्ण जगातच प्राणघातक हल्ल्याचे प्रमाण वाढतच आहे. "वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा.." सध्या काहीसे असेच झाले आहे...सारांश, अतिरेक्यांनी सर्वत्र अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आसेतूहिमाचल- इतक्या मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांचा अतिरेक झाला आहे.
काही वर्षांपू्र्वी नेपाळ ने नेपाळमध्ये चीन पुरस्कृत माओवाद फोफावल्यामुळे भारताची मदत मागितली मात्र फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज तिथेही माओवाद्यांची सत्ता आहे, हाच माओवाद आता भारताला भोवतो आहे. चीन निर्मित वस्तूंनी केवळ भारतातच नव्हे, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या अर्थव्यवस्थेही काही अंशी प्रभाव पडला आहे. यामुळे अमेरिकेतील बड्या उद्योगांनी चीनमध्ये निर्मिती सुरू केली असून "मेड इन चायना" या शिक्क्याने उत्पादन बाहेर पडते. भारतीय बाजारपेठेने या चायना मार्केटमुळे कूस बदलली असून चायना उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते. भारतीय उत्पादनाच्या तुलनेत चायना मार्केटची वस्तू स्वस्त असून महागाईमुळे ग्राहकांची चायना वस्तूंची मागणी स्वाभाविक आहे. पाकिस्तान देखील मधुनमधून कागाळ्या करते आहेच, अगदी चौकीनजीक पाकिस्तानचे हातबॉम्ब, मिसाईल्स येऊन पडतात तरीही अद्याप अक्षरशः आम्ही ढिम्मपणे बसलो आहोत. आमच्या सहनशक्तीचा अंत आता पाहू नये, अन्यथा...यापलिकडे केवळ राष्ट्रसंघात निषेधाशिवाय आणि कूटनीतिमधील काथ्याकुटाशिवाय शिवाय काहीच होत नाही. परंतु सहनशक्ती बहुदा नसल्यासारखेच वाटते आहे, सहनशक्ती असती तर आतापर्यंत बहुदा किमान पाकव्याप्त काश्मिर तरी मुक्त झाला असता. न्यायव्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वासही कमी होत आहे, संसदेवर हल्ला, मुंबईवर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांसह अद्याप कोणालाही फासावर लटकविण्यात आलेले नाही. युद्धामुळे महागाई वाढते ही बाब नाकारता येत नाही येणारही नाही. परंतु सध्या युद्ध नसतानाही प्रचंड महागाई वाढली आहे. येणारा उद्या कसा असेल याची कोणालाही शाश्वती नाही. महागाईवर देखील त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार्‍या भत्त्यांमध्ये किमान दोन टक्के कपात करावी, सहावा वेतन आयोग तूर्त लागू करू नये, मोफत वीज-पुरवठा करू नये, वीजेची थकीत बाकी असलेल्या कार्यालयांवर कारवाई करण्यात यावी, सामान्य प्रजेच्या अशा बर्‍याच मागण्या आहेत. आसेतूहिमाचल असलेल्या भारताच्या सेतूबद्दल सुद्धा प्रचंड वाद आहे.
देशाच्या अंतर्गत समस्यांबाबत सांगायचे झाल्यास, महापुरे येती...प्रमाणे प्रत्येक वेळी नवनवीन सरकारे निवडून येतात आणि जातात. दरवेळी आश्वासने, वातावरण निर्मिती, वेगवगळ्या वचनांचे आमिष दाखवून निवडणुका लढविल्या जातात. सत्तेवर विराजमान झाल्यानंतर मागच्या सरकारचे निर्णय रद्दबातल करणे, तिजोरी रिकामी केल्याचे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी लोकसभेत झाडणे, गदारोळाने सभागृहाचे कामकाज स्थगित होणे, या गोष्टी जवळपास प्रत्येक सरकार न विसरता करतेच. वेगळा विदर्भ, वेगळा तेलंगाणा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत.
देश प्रजासत्ताक होऊन इतकी वर्ष झाल्यानंतरही अद्याप कायद्यांमध्ये अपेक्षित बदल झालेले नाहीत. एखादा नागरिक जीवंत असून सुद्धा तो हयातीत नसल्याचे दर्शविणे किंवा मयत झालेल्या व्यक्तीस जीवंत दाखवणे इथे सहज शक्य आहे. याचबरोबर काही वेळा तर आपण जीवंत असल्याचा दाखला द्यावा लागतो किंवा कायदेशीर सिद्ध करावे लागते. देशाचा नागरिक असल्याचे (डोमेझाइल) प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, एखाद्या ऍफिडेव्हिटवर कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी अशा अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीसाठी अजूनही पायपीट करावी लागते, काम लवकर होण्यासाठी मध्यस्थाकडे पैसे मोजावे लागतात. संबंधित उमेदवाराने मतदारसंघातील कामे नीट न केल्यामुळे किंवा जबाबदारी व्यवस्थित न सांभाळल्यामुले सागर सारख्या ठिकाणी नागरिकांनी चक्क षंढाला निवडून दिले आहे. बहुदा सगळ्याच आशांवर पाणी पडल्यामुळे तिथल्या प्रजेची आता "तृतीय पुरुषी-एकवचनी" अपेक्षा असावी. शासनाच्या कारभाराला सामान्य नागरिक कंटाळला असून याचा विपरित परिणाम मतदानावर देखील झाला आहे. निवडून आलेला उमेदवार पाच वर्ष नागरिकांकडे ढूंकूनही पहात नसल्याचे प्रमाण अद्यपि बरेच आहे. सुशिक्षित बेरोजगारी कमी झालेली नाही. समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्याची मागणीही जोर धरते आहेच. यामुळे एकूणच प्रणाली आणि न्यायव्यवस्था अधिक पारदर्शी करण्याची आणि जलद करण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या जागेचा वाद न्यायालयात नेल्यास एक पिढी जाऊन दुसर्‍या पिढीचे अर्धे आयुष्य संपते, तरी सुद्धा त्याप्रकरणाचा निवाडा होत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. सरकार जलद न्यायालयांबद्दल गंभीर असले तरी प्रत्यक्ष कृती जबाबदारीने, लवकर होण्याची आवश्यकता आहे. नवीन कायदा अस्तित्वात आणून बर्‍याचदा नूतन सरकार विराजमान झाल्यानंतर असा कायदा रद्द ठरवण्यामुळे आय-कालापव्यय होतो, समित्यांचे देखील असेच म्हणता येऊ शकेल. परिणामी त्रयस्थ, तटस्थ संस्था, तज्ज्ञांद्वारेच असे कायदे, धोरणे ठरवली जाऊन नव्याने अस्तित्वात आलेला कायदा, धोरण, नियम नंतर रद्द न करण्यासाठीही बहुदा एखाद्या कायद्याची आवश्यकता भासावी...।
"शत्रूने आमच्या पाठित खंजीर" खुपसण्याची घटना पुन्हा घडू नये, आणि किमान 65 व्या प्रजासत्ताक दिनापर्यंत तरी देशातील प्रजा खर्‍या अर्थाने सुखी-समृद्ध व्हावी हीच अपेक्षा।

सोमवार, १८ जानेवारी, २०१०

आता तरी भारतीयांना परत बोलवा...

ऑस्ट्रेलियात दिवसेंदिवस भारतीयांवर वांशिक हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होतेच आहे. आणखी किती वाट पाहणार? केवळ चर्चा, सहानुभूती व्यक्त करणे आता बंद करावे. तेथील भारतीयांच्या सहनशक्तीचा आणखी अंत भारत सरकारने न पाहता, त्वरीत त्यांना भारतात परत बोलवावे. सर्व भारतीयांच्या सुरक्षिततेची हमी ऑस्ट्रेलियाने दिल्याशिवाय परत ऑस्ट्रेलियात पाठवू नये. 23 मे 2009 पर्यंत ऑस्ट्रेलियात 81 जणांवर हल्ला झाल्याची माहिती युपीए शासनाने राज्यसभेत दिली होती. 81 काय परंतु खरं तर एकही हल्ला होऊ नये, अशी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अनेक बाबतीत भारत आज अमेरिकेचा आदर्श घेऊन, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवतो, असे असताना या बाबतीत अद्याप हलगर्जीपणा का? विनाविलंब ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास बंद करून पुढील कार्यवाही होणे गरजेचे आहे.

मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

“फिट” ठेवा...“हिट” व्हा!

“We have moved from a state of nothing to everything! अर्थात- आम्ही काही नसल्याच्या अवस्थेतून सर्वकाही असल्याच्या अवस्थेत पोहोचलो आहोत.” हे वाक्य बरंच काही सांगून जातं! एक काळ होता, माणुस निरोगी, आरोग्यसंपन्न, बव्हंशी निर्व्यसनी, होता. आज याउलट चित्र दिसत असून, आरोग्यसंपन्न, खर्या अर्थाने निरोगी, निर्व्यसनी अशी, शंभरातली अगदी बोटावर मोजण्याइतकी माणसं असतील. तरूण वयातच अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले असून एक प्रकारे वृद्धत्व आल्यासारखे वाटते. मात्र, दुसरी बाजू सुद्धा पाहणे आवश्यक आहे, ती म्हणजे, विविध व्याधींवर मात करण्यासाठी स्वतःला “ फिट” ठेवणार्यां ची संख्याही कमी नाही.
मला जेव्हा थोडफार समजू लागलं तेव्हाचे दिवस आठवतात, रस्त्यावर तुरळक गर्दी, पावसाळा आणि उन्हाळ्याचे काही दिवस सोडून दवाखान्यांमध्ये गर्दी जेमतेम असायची. आजकाल तर, अबब! लहान मुलांचा असो, की मोठ्यांचा, दातांचा असो की हाडांचा... कोणताही दवाखाना पाहा, पेशंट्सनी भरलेलाच. एवढं चागलं आहे, की डॉक्टरांच्या उपचारांनी लगेच बरं वाटत असल्याने डॉक्टर आणि पेशंट दोघेही खुष..। शेवटी ही सुद्धा एक सेवाच आहे नां, आणि सेवा ही एखाद्या व्रतासारखीच असते. लोकसंख्या वाढली मग व्याधी सुद्धा वाढणारच नां? नवनवीन लोकांप्रमाणेच, स्वाईन फ्लू, डेंग्यू, बर्ड फ्लू, कावासाकी, चिकुन गुनिया असे नवनवीन रोग, व्याधी सुद्धा वाढत आहेतच. या वाढणार्‍या रोगांवर नियंत्रण करण्यासाठी खरंतर माणसाची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे वाटते. काही झालं की आपण अँटीबायोटिक घेऊन मोकळे होतो, तो व्याधी तात्पुरता जातो, पण त्यामुळे इतर साईड़-इफेक्टही होतातच. ही बाब प्रत्येकानेच गांभीर्याने घ्यावी. विज्ञानांच्या चमत्कारामुळे पुर्वीप्रमाणे दळण्यासाठी जाती, पाटा-वरवंटा आता काळाच्या ओघात नाहिसा होण्याच्या मार्गावर आहे. याची जागा घेतली आहे मिक्सर, ग्राईंडर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, इलेक्ट्रॉनिक ब्रुम अशा वस्तुंनी. दशकापूर्वी दळणासाठी महिला किमान चक्कीवर तरी जात होत्या, मात्र हे प्रमाणही आता कमी होत असून ‘रेडिमेड’ विषयावर भर दिला जातो. पीठ, चटण्या, पोळ्यांपासून अगदी उन्हाळ्यात आंब्याचा रस सुद्धा रेडिमेड आणि घरपोहोच मिळतो. मग काय, मज्जाच असते, तोपर्यंत घरीच टिव्हीवर सिरीयल पाहण्यात वेळ घालवता येतो. या टीव्हीमुळे अनेक घरांमध्ये सायंकाळी किमान दोन-तीन तास तरी परस्पर संवाद नसतात. शाळेतून घरी आलेला विद्यार्थी आई-बाबांना काहीतरी सांगण्याच्या मूडमध्ये असतो, पण अरे, जरा शांत बैस, नंतर सांग, असं सांगितलं जातं. विद्यार्थ्याचा घरी अभ्यास घेण्याऐवजी त्याला शिकवणी अर्थातच ट्यूशन लाऊन पालक मोकळे होतात. काही शाळांमध्ये तर संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे ट्यूशन न लावल्यास अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही काही पालक-विद्यार्थी करतात.
पूर्वी केवळ ढ विद्यार्थ्यालाच शिकवणी लावली जात होती अथवा शिक्षक त्याला स्वतः घरी शिकण्यासाठी, विषय पक्का करण्यासाठी बोलवत असत. हा एकप्रकारे कमीपणा वाटत असे, पण आज परिस्थिती बदलली आहे. आमच्या मुलाला ट्यूशन लावली आहे..(without tution, no education) असं आपण अभिमानाने सांगतो. याला वास्तव कारणीभूत आहेच. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे, मिळणारा पैसा मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत तुटपुंजा असतो, तद्वतच दोघांनाही नोकरीसाठी घराबाहेर पडणे गरजेचे असते. मुलांना चांगलं शिक्षण देणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं, यासाठी कष्ट करावे लागणारच नां? प्रामाणिकपणे, काबाडकष्ट करून पैसे मिळवणं हे सध्याच्या काळात खूप-खूप कठीण आहे, ही बाजू सुद्धा नाकारता येणार नाही. कॉर्पोरेट सेक्टरची सवय आता लहान कंपन्या, नोकर्यां मध्येही अंतर्भूत होत असून वीक-एन्ड साठी बाहेर जाऊन चायनीज्-फुड, फास्ट-फुड खाण्याच्या सवयींचा आलेख मोठा होतोय. मुलांनाही याचं आकर्षण आहेच, मग काय? पटकन् बनवता येणारे नूडल्स सारखे पदार्थ लगेच तयार होतात. अधुनमधून हे खाणे ठीक, मात्र आठवड्यातले २-३ दिवसातून एकदा न घेणेच इष्ट, असा मोलाचा सल्ला येथे द्यावासा वाटतो. नावात जरी “फास्ट” असले तरी माणसाचे शरीर यामुळे “स्लो” होते, हे विसरू नका. शाळेत जाणार्या अनेक विद्यार्थ्यांची डोळेदुखी, पाठदुखी बाबत तक्रार असते. पुस्तकांचे आणि अभ्यासासह दप्तराचे ओझे बाळगावे लागते. याचबरोबर आजकाल ‘व्हायरल इन्फेक्शन’ हा विषय सर्वसाधारण झाला आहे. टीव्हीवरच्या जाहिराती आणि सतर्कता यामुळे दवाखान्यात न जाताच मुलांना औषध दिले जाते. लहान मुलाला सर्दी झाल्यास लगेच सर्दीचे औषध देणे, जास्त खेळू न देणे, मातीत-रेतीत खेळू न देणे यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल कशी? मुलांना थोडी सर्दीही होऊ द्यावी, अभ्यासाच्या वेळांचे नियोजन करून भरपूर खेळू द्या. प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल, याची खात्री वाटते. मुलांना लहान वयातच मधुमेह होण्याचे प्रमाणही वाढते आहे. हा भाग थोडा अनुवंशिकही आहेच मात्र यावर वेळीच औषधे, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावे, शक्यतो आयुर्वेदिक उपचार केल्यास चांगले!
समाज प्रबोधन करणार्याे अनेक संस्था पुढे येत आहेत, रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर, शंकराचार्य असे अनेक महनीय योग आणि अध्यात्माची सांगड घालून समाजप्रबोधन कराताहेत. या महनीयांचे प्रबोधन टीव्हीवर देखील आपण पाहू शकतो, केवळ पाहू नये, त्याप्रमाणे शक्य असेल तितके आचरण सुद्धा करावे.
महाविद्यालयीन, पदवी, पदव्योत्तर शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नोकरी, उद्योग-व्यवसायानिमित्त बाहेर पडतात. मुलीही यात मागे नाहीत, हे विशेष. नोकरी विषयी जाहिरातींवर कोणीही भाळून जाऊन लगेच निर्णय घेऊ नये. एखादी संस्था, व्यक्ती नोकरी लाऊन देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्यास अशा व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नये. पैसा कष्टाचा असतो. नोकरीनिमित्त महानगर, परदेशात गेलेल्या युवकांची फसवणूक झाल्याचेही वृत्त आपण वाचतोच... अनेक युवक पोटाच्या कोटासाठी परदेशात जातात, पण तिथेही त्यांची फसवणुक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे Don’t become someone’s meal, when searching for food…म्हणजेच, नोकरीच्या, भोजनाच्या शोधार्थ जाताना आपण दुसऱ्याचे भोजन होणार नाही, याची काळजी घ्यावी...। आजकाल तर इंटरनेटमुळे पन्नास टक्के मुलांनी ई-मेल आयडी तरी तयार केलेला असावा. ईमेलद्वारे आलेल्या जाहिरातींवरही लगेच विश्वास ठेवू नये. आज-काल IT म्हणजेच इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्राकडे खूप कल आहे. IT क्षेत्रात काम करणार्यांाना, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर इ. बहुदा तासन् तास कॉम्प्यूटरवर काम करतात, डॉक्टरांची बैठक जास्तच होते. परिणामी कार्यालयीन कामकाजाचा ताण-तणाव निर्माण होऊन नसलेली डोकेदुखी आणि पोटाचे विकार जडतात. अनेक कर्मचार्यां ना तर एखादी Pain-Killer घेतल्याशिवाय डोकेदुखी बंद होत नाही. पण ही सवय चांगली नाहीच. ताण-तणाव कमी करणारी शिबिरे अटेन्ड केली पण फरक पडतच नाही, पुन्हा तसेच...हे कां होते? असा प्रश्न अनेक जण विचारतात. या प्रश्नावर खरोखर संशोधन व्हावे. यात बहुदा भोवतालचे वातावरण हा विषय कारणीभूत असावा असे वाटते. हृदयविकाराचे रुग्णही खूप उपाय-उपचार करतात. याबाबत, नियमित व्यायाम-सातत्य आवश्यक असून One of the major benefits of regular physical activity is a protection against Coronary Heart Disease. नियमित व्यायामाचा एक फायदा म्हणजे कोरोनरी हार्ट डिसीझ होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अति रुग्ण (पेशंट्स) मुळे स्वतःच्या प्रकृतीकडे बर्यातचदा डॉक्टरांना लक्ष देता येत नाही. मात्र भुसावळसारख्या शहरातल्या डॉक्टर मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन ‘केल्याने होत आहे रे’ ही उक्ती ध्यानात घेऊन, दर तीन-चार महिन्यातून एकदा मैलोगणती पदयात्रा आयोजित करून जनजागृती केली, दररोज सकाळी आपण म्हणतो तसे “मॉर्निंग वॉक” सुरू केले. नागरिकांचा याला मोठा प्रतिसाद मिळाला. स्वयंप्रेरणेने व्यायाम करणार्यां ची संख्याही कमी नाही. स्वतःस “फिट” ठेवल्यास कोणतेही कार्य, कामकाज सहज, सुखासुखी करता येऊन संबंधित क्षेत्रात आपण नावलौकिक निश्चितच प्राप्त करू शकू, आणि “हिट” होऊ हाच विश्वास!
शेवटी, इतकाच उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे-When you make a serious effort, you can achieve the extremely fast.

बुधवार, ६ जानेवारी, २०१०

पत्रकार दिनानिमित्त ...

समस्त पत्रकार बांधवांना "पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...
बुद्धिःयस्य बलं तस्य ।
ज्याच्याजवळ श्रेष्ठतेची बुद्धी आहे तोच खरा बलवान होय...। हे सुभाषित आपल्या पत्रकार बांधवांसाठी चपखल ठरते. या बुद्धिचा सदुपयोग करून स्व. बाळशास्त्री जांभेकरांचे स्वप्न साकार करू या...।

इंटरनेटच्या युगात अजूनही विशेषतः तालुका-जिल्हा स्तरावरील पत्रकार बंधू-भगिनिंनी स्वतःला अपडेट करण्याची गरज मात्र वाटते. चला तर मग,

घेऊनी हाती लेखणी, करू या उज्ज्वल क्रांती..
धरूनी हाती माऊस, साधू या ही उत्क्रांती...
सुश्रुत

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...