मुख्य सामग्रीवर वगळा

“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!

श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...