जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. एका देशातून दुसऱ्या देशात क्षणात ज्या-त्या देशातल्या घडामोडी, घटना यांची प्रत्यक्ष माहिती समजू शकते. वैज्ञानिक विविध विषयांचा अभ्यास करून मानवाच्या हितासाठी, असाध्य रोगांवर तोडगा निघावा म्हणून विविध औषधे,लसींचा शोध लावत आहेत. भारत देखील यात तसूभर देखील मागे नाही. परंतू कोणत्याही बाबतीत मर्यादा ओलांडल्यास पुन्हा शून्यावर वेळ येऊन ठेपते. बंगलोर येथील एका संशोधन केंद्राने टायफॉईड संदर्भात अँटीबायोटिक म्हणून समजल्या जाणाऱ्या हळदीवर अर्थातच हळद या घटकावर संशोधन केले. हळदीचा वापर "अति" केल्यास हळदीच्या अती वापरामुळे माणसावर जीव गमावण्याची वेळ येते असे अनुमान काढल्याचे आजच (30 जानेवारी 11) एका इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर, अति सर्वत्र वर्ज्यते...। हा निसर्ग नियमच आहे, हे या संशोधकांना ठाऊक नसावे. अमृत जरी अति सेवन केले तरीसुद्धा त्याचेही विष तयार होते. हळदीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी कोणत्याही निष्कर्शावर पोहोचण्यापूर्वी, अनुमान काढण्यापुर्वी ज्येष्ठ, तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदाच्या ज्येष्ठांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. निसर्गाने मानव कल्याणासाठीच हळदीसारख्या विविध वनौषधींची निर्मिती केली आहे. स्थिर बुद्धीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यास आणि ठरलेल्या मात्रेतच हळदीसारख्या वनौषधींचा वापर केल्यास अखिल मानवाचे कल्याणच होईल, किंबहुना "हल्दी" मुळे मानव "हेल्दी" आणि "वेल्दी" देखील राहील यात शंका नाही.
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.