मुख्य सामग्रीवर वगळा

"व्हाइटवॉश" मुळे होताहेत जुने शब्द "वॉश"

ठराविक अंतरानंतर भाषा बदलते असे म्हणतात...काळाच्या ओघात काळाच्या प्रवाहाबरोबर जावे, असे म्हणतात...! टप्प्याटप्प्याने प्रवास करणार्‍या पथिकांना तर बदललेली भाषा लगेच जाणवते. एके काळी अस्खलित असणारी मराठी भाषाही याला अपवाद कशी असणार? गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेत इंग्रजी शब्द रूढ होत असल्याचा (मिंग्लीश) प्रत्यय सध्या येत आहे.
दीडशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले, यामुळे भारत आणि भारतीयांवर स्वाभाविकच इंग्रज आणि इंग्रजीचा पगडा बसला. तेव्हाची आणि आजची मराठी भाषा...यात बरेच अंतर असल्याचे दिसून येते. मराठी भाषेत इंग्रजीचा प्रवेश बहुदा "सॉरी.." या शब्दापासून झाला असावा. क्षमा करा, माफ करा, माफी असावी हे पूर्वीचे शब्द आजकाल अगदी बोटावर मोजण्याइतके लोक वापरताना दिसतात. यापेक्षा 'सॉरी' म्हणा आणि 'कामाला लागा' अशी विचारसरणी तयार झाली आहे. यापेक्षाही जास्त महत्वाचे असल्यास, एखादी घोडचूक झालेली असल्यास सहसा कार्यालये, नोकरी, उद्योग, कामाचे ठिकाण अर्थातच जॉबचा कॅम्पस् अशा ठिकाणी तर बहुतेक कामे होण्यासाठी 'चहा' हे पेय उपयोगी ठरते हा भाग वेगळा. चहा देखील आणला कोणी? अर्थातच चहा हे सुद्धा इंग्रजांचेच पेय होते. इंग्रज भारतातून परत जाताना सॉरी हा शब्द आणि चहा हे पेय सोडून गेले असावे..।
पूर्वी गावाच्या चौकात, मोकळ्या मैदानात होणार्‍या कुस्तीच्या स्पर्धा आता जवळपास नाहीशा झाल्या आहेत, काही शहरांमध्ये अजूनही होतात हा अपवाद. ठिकठिकाणी उभारलेल्या व्यायामशाळा, एखाद्या आठवडे बाजाराच्या मैदान, शाळेचे प्रांगण अशा ठिकाणी मुद्दाम तशी जमीन तयार करून तेथे कुस्ती खेळली जाते. कुस्ती या शब्दाची जागा देखील रेसलिंग या शब्दाने घेतली आहे. शुभरात्री या शब्दाऐवजी गुड-नाईट सहजपणे नकळत म्हटले जाते. सुप्रभात ऐवजी गुडमॉर्निंग, दिनचर्या ऐवजी रुटीन, हो ऐवजी ओके, सस्पेंड, कॅज्युअल, टाइम-लिमिट, चेंज, बॅकग्राउंड असे कितीतरी शब्द दररोजच्या बोलण्यात वापरले जातात. इंग्लिश + मराठी = मिंग्लीश असे नवीन समीकरण आता तयार झाले आहे. बर्‍याच प्रमाणात हे बदल आवश्यक सुद्धा आहेत, असेही अनेकदा प्रत्यय येतात. याचबरोबर, फक्त बॅकग्राउंड म्हणजेच पार्श्वभूमी हा शब्द उच्चारायचा असल्यास मागचे बॅकग्राउंड असा शब्दप्रयोग केला जातो, बॅकग्राउंड हे मागचेच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पू्र्वी वापरले जाणारे "शाळा-बिळा, जिलबी-बिलबी, आलतू-फालतू, चहा-वहा, बटाटे-बिटाटे, बाजार-बिजार, भाजी-बीजी, नाश्ता-बिश्ता" असे शब्दांमागून येणारे अनेक शब्द मात्र अजून तसेच वापरले जातात. दिल्ली येथे काही दिवसांपूर्वी यशस्वीपणे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा (कॉमनवेल्थ गेम् commonwealth games) च्या माध्यमातून "व्हाइटवॉश" हा मधुन-मधून ऐकला जाणारा शब्द आता सर्रासपणे नियमित वापरण्यास प्रसार माध्यमांसह, बोलीभाषेतही सुरवात झाली आहे. खरंतर, टक्कर, पराजय, हार, धुव्वा उडवणे या मूळ शब्दांच्या ऐवजी "व्हाइटवॉश" हा शब्दप्रयोग करण्यात आलेला दिसतो, अशा विविध इंग्रजी शब्दांमुळे मराठी शब्द पार धुतले गेले आहेत! हे मात्र खरं आहे, की मिंग्लीश जरी असले, तरीही हे नवीन मराठी टाकाऊ अजिबातच नाही, कालानुरुप होत असलेले हे बदल कोणीही नाकारू नये हे मात्र नक्की...!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...