मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२

विकास कामांची गती वाढविण्यासाठी प्रगतीशील रहा- प्रमोद हिंदूराव




नवी मुंबई, ता. १८- सिडकोतर्फे नवी मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांच्या विकास कामांची गती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा दृढनिश्चय मनाशी बाळगा असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी केले.

    दिनांक १७ सप्टेंबर २०१२ रोजी सिडको इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आगरी कोळी संस्कृती भवन, नेरूळ येथे आयोजित अभियंता दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे, मुख्य अभियंता (दक्षिण) श्री. संजय चौधरी, मुख्य अभियंता (उत्तर), श्री. केशव वरखेडकर, श्री. चेतन पंडित, श्री. प्रवीण दवणे, श्री. विजय कांबळे, श्री. संजय दाहेदार, श्री. रमेश गिरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात श्री. हिंदुराव पुढे म्हणाले की, सिडकोने पर्यटन स्थळांच्या निर्मितीत  पुढाकार घेतला पाहिजे. भरीव कार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या पदाचा, शिक्षणाचा आणि हिंमतीचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करण्याकरिता पुढाकार घ्यावा असा आग्रह त्यांनी आपल्या भाषणातून केला. सिडको अधिकार्‍यांसाठी स्पोर्टस क्लबची निर्मिती करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे आपल्या भाषणात म्हणाले की, सिडकोच्या प्रगतीत अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. सिडकोने प्रत्येक प्रकल्पाचे योग्य नियोजन केले म्हणूनच नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असा नावलौकिक मिळविला. भविष्यात आपणास भरपूर वाव आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प विकासाधीन आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे आजुबाजूच्या २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यामुळे जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रात आपण कार्यरत होणार आहोत. सिडकोकडे नवीन शहरांचे अनेक प्रकल्प येत आहेत. भविष्यात कामांचा विस्तार होणार आहे त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा आग्रही सल्ला त्यांनी उपस्थित अभियंत्यांना केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ख्यातनाम गीतकार प्रा. प्रवीण दवणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, चांगली सांस्कृतिक पार्श्वभूमी आपणास लाभली आहे, त्यामुळेच समर्पित भावनेने आपण काम करीत आहात. आपण एवढं सुंदर शहर निर्माण केलं कारण आपण सर्व सृजनशील आहात असे गौरवाोर काढून भावी पिढीला भाषेच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या आणि किमान एक भाषा पूर्णतेने शिकवा असा आग्रहाचा सल्ला दिला.
या अभियंता दिनाच्या निमित्ताने तांत्रिक विषयांवरील प्रेझेंटेशन व्.याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते त्यात नद्या जोडणी सारख्या अनवट, अनघट विषयावर श्री. चेतन पंडीत यांनी नितळ, सुश्राव्य असे व्याख्यान दिले. दुपारच्या सत्रात मेसर्स स्ट्रक्टवेल कन्स्लटंट प्रा. लि. चे श्री. चेतन रायकर यांनी 'डिटेक्शन ऑफ अंडरग्राऊंड युटीलिटी सर्व्हिसेस' या विषयावर तर मेसर्स बिमस्टार चे श्री. राजू जगताप यांनी 'बिल्डींग इनफॉर्मेशन मनेजमेंट सर्विसेस' या विषयावर आणि मेसर्स आयएल अन्ड एफएस चे श्री. चेतन जव्हेरी यांनी 'सॉलीड वेस्ट मनेजमेंट टेक्निक्स' या विषयावर पॉवर पाँईट सादरीकरणासह माहिती दिली आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.
अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर एस. विश्र्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री. संजय चौधरी, मुख्य अभियंता (दक्षिण), श्री. केशव वरखेडकर,
मुख्य अभियंता (उत्तर) यांचीही भाषणे झाली.
अभियंता दिनाच्या अनुषंगाने सिडको इंजिनियर्स असोसिएशन तर्फे अभियंत्यांसाठी 'टेक्नीकल पेपर्स' लेखनाचा उपक्रमही राबविण्यात आला. यात एकूण १३ अभियंत्यांनी विविध विषयांवरील पेपर्स सादर केले होते. त्यातील श्री. एस. एम. बोंडे यांच्या 'लेझर स्कनिंग'- हाय डेफिनेशन सर्व्हेइंग टेक्नॉलॉजी फॉर इफिशियंट प्रोजेक्ट प्लनिंग अन्ड एक्झीक्यूशन मॉनिटरींग, श्री. एस. बी. ठाकूर, सहाय्यक अभियंता (लॅब) आणि श्री. ए. के. पाटील, सहाय्यक अभियंता (लॅब) यांच्या 'बेसीक मिक्स डिझाईन ऑफ कॉन्क्रीट' आणि श्री. के. एम. गोडबोले (कार्यकारी अभियंता,  गुणवत्ता परीक्षण), श्री. डी. जे. रांजोळकर (सहाय्यक कार्यकारी अभियंता-प्रयोगशाळा) आणि श्री. एन. बी. कुलकर्णी (सहाय्यक अभियंता - प्रयोगशाळा) यांच्या 'युज ऑफ रूबो/मॅन्युफक्चर्ड क्रश्ड सॅन्ड इन कॉन्क्रीट फॉर ग्रेड एम-२० आणि एम-३० या पेपर्सना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या निवड परिक्षक मंडळात श्री. एस. आर. दराडे, महाव्यवस्थापक (विमानतळ), श्री. संजय नाडगौडा, कार्यकारी अभियंता (मेट्रो) आणि श्री. नंदकुमार निमकर यांचा समावेश होता.
त्याचबरोबर मागील वर्षी सर्वोत्तम कार्य करणार्‍या अभियंत्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रेणीतून गोल्फ कोर्स प्रकल्पाकरिता श्री. दिलीप बोकडे यांना तर सहाय्यक अभियंता श्रेणीतून खांदा उड्डाण पूल प्रकल्पाकरिता श्री. अभिजित मराठे आणि स्ट्रक्चरल डिझाईनकरिता श्री. राजीव कोलप यांना सेवा उत्कृष्टतेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या निवड परीक्षक समितीत श्री. व्ही. एस. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता ( क), श्री. पी. डब्ल्यू. डहाके, अधिक्षक अभियंता (टीपी-३), श्री. आर. बी. धायटकर, अधिक्षक अभियंता (वाशी) आणि श्री. अरविंद शेंडे, वरिष्ठ परिवहन अभियंता यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.


पुणे येथे कसबा मंडळातर्फे गणेश चतुर्थीला पुरस्कार वितरण

पुणे, ता. १८- येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेसोत्सव मंडळातर्फे उद्या (ता. १९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडळातर्फे पुण्यातील नामवंतांना श्री कसबा पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर पुण्यातील नामवंतांना श्री. भटकर यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वश्री वैद्य खडीवाली, कॉटनकिंग चे मालक प्रदीप मराठे, सरहद संस्थेचे संजय नहार, सनईवादक प्रमोद गायकवाड आणि गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांना पुरस्कार देण्यात येईल.

मंडळाचे माजी अध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने निरगुडकर परिवार व कसबा गणपती मंडळातर्फे भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून हा पुरस्कार यंदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना श्री. भटकर यांच्या हस्ते देण्यात येईल. बुधवारी (ता. १९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता कसबा गणपती उत्सव मंडपात कार्यक्रम संपन्न होईल. असे सचिव मोरेश्वर घोळे यांनी मंडळ व कार्यकारिणीतर्फे कळविले आहे.

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी

मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका

मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल.

जिल्हानिहाय मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची संख्या अशी- 
ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळे १०८, जळगाव १३१, नंदुरबार ५३, पुणे २२०, कोल्हापूर ४७७, सांगली ४५९, सातारा ३२५, सोलापूर १९४, औरंगाबाद २१८, बीड ७०३, हिंगोली ६२, जालना २८५, लातूर ३५३, नांदेड १७७, उस्मानाबाद १६५, परभणी १२५, अमरावती २६२, अकोला २७७, बुलडाणा २७८, वाशिम २८७, यवतमाळ १००, नागपूर २४६, भंडारा ३८०, चंद्रपूर ६१, गडचिरोली ३९, गोंदिया ३५७ आणि वर्धा ११५. एकूण ७, ७५६.

शनिवार, २१ जुलै, २०१२

मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली

मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली.
ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्‍या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय जीवनाचे एक प्रतीकच बनला आहे, असे मत श्री. हिंदूराव यांनी व्यक्त केले.

शनिवार, १४ जुलै, २०१२

रमाबाई रानडे...

मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली-http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks
(या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्‍यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...