मुख्य सामग्रीवर वगळा

विकास कामांची गती वाढविण्यासाठी प्रगतीशील रहा- प्रमोद हिंदूराव




नवी मुंबई, ता. १८- सिडकोतर्फे नवी मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांच्या विकास कामांची गती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा दृढनिश्चय मनाशी बाळगा असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी केले.

    दिनांक १७ सप्टेंबर २०१२ रोजी सिडको इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आगरी कोळी संस्कृती भवन, नेरूळ येथे आयोजित अभियंता दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे, मुख्य अभियंता (दक्षिण) श्री. संजय चौधरी, मुख्य अभियंता (उत्तर), श्री. केशव वरखेडकर, श्री. चेतन पंडित, श्री. प्रवीण दवणे, श्री. विजय कांबळे, श्री. संजय दाहेदार, श्री. रमेश गिरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात श्री. हिंदुराव पुढे म्हणाले की, सिडकोने पर्यटन स्थळांच्या निर्मितीत  पुढाकार घेतला पाहिजे. भरीव कार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या पदाचा, शिक्षणाचा आणि हिंमतीचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी करण्याकरिता पुढाकार घ्यावा असा आग्रह त्यांनी आपल्या भाषणातून केला. सिडको अधिकार्‍यांसाठी स्पोर्टस क्लबची निर्मिती करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचनही त्यांनी यावेळी दिले.
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे आपल्या भाषणात म्हणाले की, सिडकोच्या प्रगतीत अभियंत्यांचा सिंहाचा वाटा आहे. सिडकोने प्रत्येक प्रकल्पाचे योग्य नियोजन केले म्हणूनच नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असा नावलौकिक मिळविला. भविष्यात आपणास भरपूर वाव आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प विकासाधीन आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे आजुबाजूच्या २५ कि.मी. अंतरापर्यंतच्या क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यामुळे जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रात आपण कार्यरत होणार आहोत. सिडकोकडे नवीन शहरांचे अनेक प्रकल्प येत आहेत. भविष्यात कामांचा विस्तार होणार आहे त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असा आग्रही सल्ला त्यांनी उपस्थित अभियंत्यांना केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ख्यातनाम गीतकार प्रा. प्रवीण दवणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, चांगली सांस्कृतिक पार्श्वभूमी आपणास लाभली आहे, त्यामुळेच समर्पित भावनेने आपण काम करीत आहात. आपण एवढं सुंदर शहर निर्माण केलं कारण आपण सर्व सृजनशील आहात असे गौरवाोर काढून भावी पिढीला भाषेच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या आणि किमान एक भाषा पूर्णतेने शिकवा असा आग्रहाचा सल्ला दिला.
या अभियंता दिनाच्या निमित्ताने तांत्रिक विषयांवरील प्रेझेंटेशन व्.याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते त्यात नद्या जोडणी सारख्या अनवट, अनघट विषयावर श्री. चेतन पंडीत यांनी नितळ, सुश्राव्य असे व्याख्यान दिले. दुपारच्या सत्रात मेसर्स स्ट्रक्टवेल कन्स्लटंट प्रा. लि. चे श्री. चेतन रायकर यांनी 'डिटेक्शन ऑफ अंडरग्राऊंड युटीलिटी सर्व्हिसेस' या विषयावर तर मेसर्स बिमस्टार चे श्री. राजू जगताप यांनी 'बिल्डींग इनफॉर्मेशन मनेजमेंट सर्विसेस' या विषयावर आणि मेसर्स आयएल अन्ड एफएस चे श्री. चेतन जव्हेरी यांनी 'सॉलीड वेस्ट मनेजमेंट टेक्निक्स' या विषयावर पॉवर पाँईट सादरीकरणासह माहिती दिली आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले.
अभियंता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न सर एस. विश्र्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी श्री. संजय चौधरी, मुख्य अभियंता (दक्षिण), श्री. केशव वरखेडकर,
मुख्य अभियंता (उत्तर) यांचीही भाषणे झाली.
अभियंता दिनाच्या अनुषंगाने सिडको इंजिनियर्स असोसिएशन तर्फे अभियंत्यांसाठी 'टेक्नीकल पेपर्स' लेखनाचा उपक्रमही राबविण्यात आला. यात एकूण १३ अभियंत्यांनी विविध विषयांवरील पेपर्स सादर केले होते. त्यातील श्री. एस. एम. बोंडे यांच्या 'लेझर स्कनिंग'- हाय डेफिनेशन सर्व्हेइंग टेक्नॉलॉजी फॉर इफिशियंट प्रोजेक्ट प्लनिंग अन्ड एक्झीक्यूशन मॉनिटरींग, श्री. एस. बी. ठाकूर, सहाय्यक अभियंता (लॅब) आणि श्री. ए. के. पाटील, सहाय्यक अभियंता (लॅब) यांच्या 'बेसीक मिक्स डिझाईन ऑफ कॉन्क्रीट' आणि श्री. के. एम. गोडबोले (कार्यकारी अभियंता,  गुणवत्ता परीक्षण), श्री. डी. जे. रांजोळकर (सहाय्यक कार्यकारी अभियंता-प्रयोगशाळा) आणि श्री. एन. बी. कुलकर्णी (सहाय्यक अभियंता - प्रयोगशाळा) यांच्या 'युज ऑफ रूबो/मॅन्युफक्चर्ड क्रश्ड सॅन्ड इन कॉन्क्रीट फॉर ग्रेड एम-२० आणि एम-३० या पेपर्सना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाच्या निवड परिक्षक मंडळात श्री. एस. आर. दराडे, महाव्यवस्थापक (विमानतळ), श्री. संजय नाडगौडा, कार्यकारी अभियंता (मेट्रो) आणि श्री. नंदकुमार निमकर यांचा समावेश होता.
त्याचबरोबर मागील वर्षी सर्वोत्तम कार्य करणार्‍या अभियंत्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रेणीतून गोल्फ कोर्स प्रकल्पाकरिता श्री. दिलीप बोकडे यांना तर सहाय्यक अभियंता श्रेणीतून खांदा उड्डाण पूल प्रकल्पाकरिता श्री. अभिजित मराठे आणि स्ट्रक्चरल डिझाईनकरिता श्री. राजीव कोलप यांना सेवा उत्कृष्टतेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या निवड परीक्षक समितीत श्री. व्ही. एस. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता ( क), श्री. पी. डब्ल्यू. डहाके, अधिक्षक अभियंता (टीपी-३), श्री. आर. बी. धायटकर, अधिक्षक अभियंता (वाशी) आणि श्री. अरविंद शेंडे, वरिष्ठ परिवहन अभियंता यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...