सोमवार, २३ मे, २०११

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे - छगन भुजबळ

मुंबई, दि. 20 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या चौपदरीकरणाचे काम येत्या अडीच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण होईलच, पण तोपर्यंत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संबंधित विभागाने आपापले काम जबाबदारीने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केली. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात, नागरिकांची सुरक्षा आणि चौपदरीकरणाच्या अनुषंगाने गेल्या 11 मे रोजी श्री. भुजबळ यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत सामोऱ्या आलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी आज ही बैठक बोलाविली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, पोलिस महानिदेशक (वाहतूक) श्री. शर्मा, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. मंडपे यांच्यासह कोकण विभागातील वन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक, गृह विभागांचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, या प्रकरणी प्रत्येक जणच आपल्यावरची जबाबदारी झटकून मोकळा व्हायला पाहतो आहे. असे कसे चालेल? मला सुध्दा केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलता येते; पण, माझ्या राज्यातली माणसं मरत आहेत, म्हणून वेदना होताहेत. राज्यातल्या कुठल्याच रस्त्यावर एकही माणूस अपघातात मरता कामा नये, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. ते अशक्यप्राय असले तरी त्या दृष्टीने प्रयत्न करणे, योग्य पायाभूत सुविधा निर्माण करणे, या गोष्टी तरी आपल्या हातात आहेत. त्या करण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.
श्री. भुजबळ यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या 33 हेक्टर वनजमिनीच्या संदर्भात वेळोवेळी उपस्थित करण्यात आलेल्या शेऱ्यांवर समाधानकारक पूर्तता केल्यानंतरही वर्गीकरणाचा प्रश्न अद्याप अलिबाग आणि रोहा येथील उप वनसंरक्षक यांच्याकडे प्रलंबित असून ते काम तातडीने करण्याची सूचना केली. यावेळी वनजमीन हस्तांतरणाला गती देण्यासाठी गुजरात सरकारने कायद्यात सुधारणा केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर संबंधित कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी करता येईल का, यादृष्टीने चाचपणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.
रायगड जिल्ह्यातील एकूण 67 गावांपैकी आजपर्यंत केवळ 12 गावांतीलच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही श्री. भुजबळ यांनी दिले. त्यावर निवाडे आणि निधी उपलब्धता यांच्या संदर्भातील पूर्तता करून येत्या दोन महिन्यांत या गावांतील भूसंपादनाची सर्व प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांबीत खात्याकडे 30 मीटर रुंदीची जागा उपलब्ध आहे. या रुंदीत वेगमर्यादा, ध्वनिमर्यादा तसेच भौमितिक मापदंडात मर्यादा घालून चारपदरी रुंदीकरण शक्य आहे. त्यादृष्टीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वनविभागाला प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी यावेळी केली.
इंदापूर ते झाराप या 366 किलोमीटर लांबीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या 15 दिवसांत त्याचा डी.पी.आर. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. भुजबळ यांना देण्यात आली.

धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेसाठी...
महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची यादी संबंधितांकडून घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी त्या सर्व ठिकाणी आपल्या अखत्यारीतील आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. पावसाळयापूर्वी महामार्गाच्या बाजूपट्टया उत्तम प्रकारे भरून घ्याव्यात, ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी आधुनिक गतिरोधक 15 दिवसांच्या आत बसवावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
वडखळ येथील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, शक्य असेल तर त्याठिकणी रुंदीकरण करावे तसेच दुभाजक बसवावेत. त्याचप्रमाणे तेथे मागील बाजूने पर्यायी मार्गाची सोय करता येणे शक्य असल्यास ते कामही तातडीने करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

अपघात कमी करण्यासाठी...
या महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टीनेही श्री. भुजबळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले, गेल्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात जसे कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभे करून लहान वाहने जशी पुढे काढली जातात, तशाच पध्दतीने सुटीच्या हंगामात सुध्दा ही मोहीम राबविता येऊ शकेल. त्याचप्रमाणे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्दही तपासणी मोहीम उघडावी, तसेच असे तपासणी नाके वाढवावेत. महामार्ग पोलिसांनी गतिमापक यंत्रे (स्पीडगन) उपलब्ध करण्याबरोबरच गस्ती वाहनांच्या संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचीही सूचना त्यांनी केली. क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे धोरण स्विकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठी भाडोत्री का असेना, पण तातडीने खाजगी क्रेनची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर वैद्यकीय सेवा उपलब्धतेसाठी...
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड, संगमेश्वर आणि कळंबी येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करण्याची गरज श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यावर महाड आणि कळंबी येथील सेंटर्स तातडीने सुरू करण्यात येतील, मात्र संगमेश्वरला थोडा अधिक वेळ लागणार असल्याची माहिती श्री. गगराणी यांनी श्री. भुजबळ यांना दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्याला 950 ऍम्ब्युलन्स मंजूर करण्यात आल्या असून त्यातील 72 कोकणासाठी मिळणार आहेत. तथापि, अद्याप निविदा प्रक्रिया सुरू असल्याने त्या येण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसंगी स्थानिक पातळीवर भाडोत्री ऍम्ब्युलन्सची सोय करण्यात येऊ शकेल, असेही गगराणी यांनी सांगितले.

शुक्रवार, २० मे, २०११

हवेत उडणारे आले जमिनीवर...

तीव्र उन्हाचेचटके झाडावरही बसू लागल्यामुळे अखेर हवेत उडणार्‍यांनाही जमिनीवर यावेच लागले...

सिडकोची साडेबारा टक्के भूखंड वाटप संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई, ता. १९: येथील मौजे-उलवे नोडमधील भूमीपुत्रांसाठी साडेबारा टक्के योजने अंतर्गत भूखंड वाटपाची संगणकीय सोडत यापूर्वी अंतिम केलेल्या ज्येष्ठता यादीनुसार नुकतीच सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांच्या उपस्थितीत निर्मल-नरिमन पॉईंट येथे संपन्न झाली.
उलवे विभागातील संगणकीय सोडतीला सिडको अध्यक्ष नकुल पाटील,  नगर विकास विभागाचे मुख्यसचिव टी. सी. बेंजामिन, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त भास्कर वानखेडे उपस्थित होते. उलवे सोडतीच्या निकालाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या भूखंडांची इरादापत्रे ८ दिवसात रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात येतील. नागरिकांच्या माहितीसाठी सोडतीच्या निकालाची यादी सिडको भवन, तळमजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व सिडकोच्या www.cidcoindia.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक भूमी व भूमापन अधिकारी सूर्यकांत राठोड यांच्याशी ०२२-६७९९ ८६६४ येथे तसेच सिडको भवन, सातवा मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे संपर्क साधावा.

गुरुवार, १९ मे, २०११

अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी नगरपालिकांना पाच टक्के अनुदान: उपमुख्यमंत्री

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई ता. १९ - मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात अद्ययावत मासळी बाजार उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
नुकतीच मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्यासंदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मत्स्यविकासमंत्री मधुकरराव चव्हाण, राज्यमंत्री भास्कर जाधव तसेच मत्स्यविकास आयुक्त हणमंतराव पवार आदी वरिष्ठ उपस्थित होते.
यावेळी श्री. पवार म्हणाले, की राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये अद्ययावत मासळीबाजार उभारण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळातर्फे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हा बाजार उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची कमाल मर्यादा असून यापैकी ९० टक्के रक्कम राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ देते तर उर्वरीत १० टक्के रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांना भरावी लागेल. या १० टक्क्यांपैकी केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींना राज्य शासन ५ टक्के रक्कम अनुदान स्वरुपात देणार आहे. महानगरपालिकांना मात्र १० टक्के रक्कम स्वतः उभारावी लागणार आहे.
अशा प्रकारचा मासळी बाजार उभा करण्यासाठी राज्यातील मुरबाड, कुळगाव-बदलापूर, बारामती, डहाणू नगरपालिकांनी तसेच वसई-विरार महानगरपालिकेने बोळींज, आगाशी, जुचंद्र येथे तसेच पुणे महानगरपालिकेने गणेश पेठ येथे हा बाजार उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या बाजार उभारणी प्रकल्पांसाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. यापैकी मत्स्यिकी विकास मंडळ १७ कोटी ९० लाख रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे.
भारतात दरवर्षी प्रतिमाणसी केवळ ४ किलो ८०० ग्रॅम मासळी खाल्ली जाते. जपानमध्ये हे प्रमाण ७५ किलो, चीनमध्ये २५ किलो तर अमेरिकेत २२ किलो ६०० ग्रॅम इतके आहे. भारतात मासळी उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन निर्यात होते, तर उर्वरीत ८५ टक्के उत्पादनाचा उपयोग खाद्यान्न म्हणून केला जातो.

सोमवार, १६ मे, २०११

कोकणच्या समुद्रकिनार्‍यांची भुजबळांनी केली हवाई पाहणी


मुंबई, ता. १३ - राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या निसर्गसंपन्न कोकण किनारपट्टीची हवाई पाहणी केली.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा वैभवशाली समुद्रकिनारा लाभला आहे. ही किनारपट्टी म्हणजे कोकणच्या सर्वांगीण पर्यटन विकासाची गुरूकिल्ली आहे. हीच बाब हेरून श्री. भुजबळ यांनी कोकणच्या विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यावेळी त्यांचे समवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.
श्री. भुजबळ यांनी मांडवा, किहीम, रेवस, जयगड किल्ला जयगड जेटी, कुणकेश्वर येथील केशवसुत स्मारकाची पाहणी केली. याचबरोबर गणपतीपुळे येथील मंदीर व परिसर तसेच तेथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमधील व्यवस्थेचीही पाहणी केली.

बुधवार, ११ मे, २०११

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून 15 दिवसांत अहवाल सादर करा: भुजबळ


मुंबई, दि. 11 मे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17वर सातत्याने होत असलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या संपूर्ण महामार्गाची जाता-येता अशी दुतर्फा पाहणी करून 15 दिवसांच्या आत तपशीलवार अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले. सदर पाहणी करत असताना संबंधित जिल्ह्यातील अभियंत्यांनाही सोबत घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे, महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामुळे निर्माण होत असलेला जनक्षोभ लक्षात घेऊन श्री. भुजबळ यांनी आज मंत्रालयात संबंधितांची तातडीची बैठक बोलाविली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) धनंजय धवड, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एन.एच.ए.आय.) मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री. भुजबळ यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाशी तसा थेटपणे संबंध नसतानाही त्या कामात होणाऱ्या दिरंगाईबद्दल नागरिकांच्या नाराजीला राज्य शासनाला तोंड द्यावे लागते आहे, असे भुजबळ यांनी सुनावले. 'माणसं मरत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेत आहात. या बाबीकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे,' अशी भावना व्यक्त केली.
या राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा करारनामा 22 जानेवारी 2011 रोजी करण्यात आला असून या दिनांकाच्या सहा महिन्यात आर्थिक ताळेबंद (Financial Closure) झाल्यानंतर येत्या जुलैअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी 67 गावांतील 170 हेक्टर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत या 67 गावांपैकी केवळ 10 गावांचे ऍवॉर्ड तयार झालेले असून अद्यापही 57 गावांचे ऍवॉर्ड तयार करण्याचे काम सुरू असल्याचे ऐकून श्री. भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे या चौपदरीकरणाच्या कामासाठी एकूण 33 हेक्टर वनजमिनीचे संपादन आवश्यक होते. त्यापैकी अलिबाग वनविभागाकडील 26.604 हेक्टर वनक्षेत्र आणि रोहा वन विभागाकडील 6.403 हेक्टर वन जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव एन.एच.ए.आय.ने अलिबाग व रोहा वनविभागाकडे सन 2007मध्येच सादर करण्यात आलेला आहे. त्यांनी काढलेल्या शेऱ्यांची वेळोवेळी पूर्तता करण्यात येऊनही आणि सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतरही त्यांच्याकडून अद्याप हा प्रस्ताव नागपूर वनविभागाला सदर करण्यात आलेला नसल्याचे ऐकताच श्री. भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात सर्व संबंधित महसूल व वन विभागाचे अधिकारी, मुख्य सचिव, सचिव यांच्याशी चर्चा करण्याचे त्याचबरोबर सदर रस्त्याच्या परिस्थितीबाबत आणि अपघातांबाबत वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या कात्रणांसह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री, वन विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश श्री. भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम सचिवांना दिले.
यावेळी भुजबळ यांनी जिल्हा वाहतूक पोलिसांकडूनही अपघात रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी जाणून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरीकरण झालेल्या मार्गावर साईडपट्टया नसल्यामुळे वाहने कलंडून अपघात होतात, अशी माहिती त्यांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात 41 किलोमीटरपैकी 22 किलोमीटरचे जे काम पूर्ण झाले आहे, त्या टप्प्यातील साइडपट्टयांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश श्री. भुजबळ यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक, दुभाजक, दिशादर्शक फलक, संकेतचिन्ह फलक, धोक्याची सूचना देणारे फलक आदींचीही तातडीने उभारणी करण्यासही त्यांनी सांगितले.
अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी क्रेन भाडयाने घ्यावी लागत असल्यामुळे किंवा तातडीने उपलब्ध न झाल्यामुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयाशी बोलून तोडगा काढावा किंवा जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तातडीची गरज म्हणून एखादी तरी क्रेन ठेवता येईल का, याविषयी चाचपणी करावी, अशी सूचना त्यांनी श्री. सरंगी यांना केली.
महामार्गावर पोलिसांच्या संख्या वाढविणे गरजेचे असले तरी तातडीच्या प्रसंगी स्थानिक पोलिसांचे सहकार्य वाहतूक पोलिसांनी घ्यावे, असे श्री. सरंगी यांनी यावेळी सुचविले.

'वेगनियंत्रणासाठी स्पीड मोजणाऱ्या कॅमेऱ्यांचा पर्याय उपयुक्त!'
महामार्गावर होणारे अधिकतर अपघात हे अतिवेगामुळेच होत असल्याची माहिती श्री. भुजबळ यांना यावेळी देण्यात आली. त्यावर महामार्गावर साधारण प्रत्येक 50 किलोमीटरच्या अंतरावर स्पीड मोजणारे कॅमेरे बसविण्याचा पर्याय उपयुक्त वाटतो, तसे करता येईल का, त्याचप्रमाणे वाहनचालकांच्या मद्यचाचणीसाठी महामार्गावर 8 ते 10 ठिकाणी तपासणी केंद्रे उभारता येतील का, याविषयी महामार्ग पोलिसांनी चाचपणी करावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली.

'रात्रीच्या वेळी कंटेनर रस्त्याकडेला थांबविता येतील!'
मोठमोठया कंटेनरमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे गणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे असे कंटेनर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला थांबवून लहान वाहने पुढे काढली जातात. त्याच धर्तीवर सुट्टीच्या हंगामासाठी सुध्दा अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

"सौर ऊर्जा निर्मिती" ठरणार काळाची गरज...

महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वीजेचे संकट उभे आहे. वीज कंपनीचा वाढत असलेला तोटा आणि सातत्याने वाढणारा वीजेचा दर ग्राहकांवर लादला जात आहे. यावर पर्याय म्हणून लवकरच "सौर ऊर्जा" ही काळाची गरज ठरणार आहे.

रेडिओ, फ्रीज, कूलर, फोन, मोबाईल या चैनीच्या वाटणार्‍या पूर्वीच्या वस्तू आज काळाची गरज ठरल्या आहेत. सध्या महाग आणि चैनीची वाटत असली तरीही "सौर ऊर्जा" (अर्थात सोलर एनर्जी) ही काळाची गरज नक्कीच ठरेल...
कोकणातील रत्नागिरी नजीक ९,९०० मेगावॉट क्षमतेचा आणि जगातील सर्वात मोठा मानला जाणारा नियोजित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आहे. हा प्रकल्प भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मार्च ११ ला जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ८.९ रिश्टर स्केल असून यानंतर आलेली त्सुनामी लाट यामुळे झालेल्या नुकसानीतून आता तीन महिने उलटूनही देश पूर्णपणे सावरलेला नाही. आणखी भूकंप होऊन आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती लोकांच्या मनातून गेलेली नाही. वास्तविक जपान हा देश तंत्रज्ञानात अग्रेसर असून स्थिरचित्ताने शांततेने निर्णय घेण्यासाठी या देशाचा नावलौकिक आहे. सुमारे ४८ फूट उंचीच्या एका लाटेने फुकुशिमा येथील तीनपैकी एका अणुभट्टीला तडाखा दिल्याने या भट्टीतून किरणोत्सर्ग होऊन या किरणोत्सर्गाचे अत्युच्च पातळी गाठलेले पाणी प्रशांत महासागरात देखील गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. कारण काहीही असले तरीही नुकसान झाले आहे हे नक्की!

नियोजित जैतापूर अणुप्रकल्प सुद्धा सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या प्रकल्पामुळे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होणार असल्याचे स्थानिक जनतेचे मत आहे. जपानच्या फुकुशिमा अणुभट्टीचे उदाहरण भारतानेही डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असल्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. भविष्यातील भूकंपाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मध्य जपानमधील हामाओका अणुप्रकल्प बंद करण्याचा आदेश नुकताच पंतप्रधान नाओटो कान यांनी दिला आहे. हा आदेश व घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा, लक्षवेधी आहे. मानव निसर्गाच्या सामर्थ्यापुढे टिकू शकत नाही ही बाब आता तज्ज्ञांनाही मानावीच लागेल. तरी सुद्धा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास रिश्टर स्केल ९.० तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप झाल्यास, त्सुनामी आल्यास जीवित आणि वित्तहानी होऊ नये म्हणून किंवा याचे प्रमाण शक्य तितके कमी होण्याच्या उपाययोजना अगोदर करून त्याचे प्रयोग, प्रात्यक्षिक करणे अत्त्यावश्यक आहे. देशात सध्या बहुतांशी वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी लागणार्‍या कोळशाच्या किंमती वाढत आहेतच. वीज निर्मितीसाठी पुरवला जाणारा कोळसा, त्याची उपलब्धता, गुणवत्ता इ. बाबी फारशा गांभीर्याने घेतल्या जाताना दिसत नाहीत. परिणामी उपलब्ध होणार्‍या कोळशातून बराच कोळसा वाया जातो, फेकून द्यावा लागतो अशी वीज निर्मिती केंद्रांची ओरड असते. लोकसंख्या वाढीबरोबर वीजेची मागणी देखील वाढतच जाणार हे नाकारले जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षात वीज महाग झाली असून सततच्या भार-नियमनामुळे अनेक वीजग्राहक वीजेची बिलं भरेनासे झाले असून 'वीज द्या- बिल घ्या' असा अनेकांचा सूर आहे, याचबरोबर वाढत्या थकीत बाकीमुळे वीज कंपनीचा तोटा वाढतो आहे. हा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसते. अनेक शासकीय, निमशासकीय संस्थांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी असून वीज चोरीकडे राजकीय दबावामुळे दुर्लक्ष करावे लागत असल्याचे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

लवकरच वीज किमान ८ टक्क्यांनी महाग होणार असल्याचे वीज नियामक आयोगाने सूचित केले आहे. ठिकठिकाणच्या ट्रान्सफार्मरला लागणारे इंधन देखील महाग झाले आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी जास्त होत असून ग्रामीण भागात विशेषतः शेतीला जास्त पाण्याची आवश्यकता असते, परंतु किमान बारा तासांच्या भार-नियमनामुळे, अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काही वेळा तर पीक हातचे जाण्याच्या, जळण्याच्या आणि शेतकरी बांधवांचा हाती आलेला घास पुन्हा पडत असल्याच्या घटना घडतात.

सोमवार, ९ मे, २०११

नवी मुंबई येथे १० मे स सिडकोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम

मुंबई, ता. ९ - सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२० जयंती कार्यक्रम होईल. सिडको एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस मिलिंद बागूल अध्यक्षस्थानी व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील.
मंगळवारी (ता. १० मे) सिडको सभागृह, सिडको भवन, सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक व्यवस्थापक अनिता पगारे, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, व्यवस्थापकीय संचालक सिडको तानाजी सत्रे, विधान परिषद सदस्य व संचालक-सिडको सुभाष भोईर, संचालक सिडको नामदेव भगत, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल उपस्थित राहतील, असे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

गोंदे ते पिंपळगाव टप्प्याचे बहुतांश काम आगामी सहा महिन्यात पूर्ण: भुजबळ

नाशिक (प्रतिनिधी) - आगामी सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोंदे ते पिंपळगाव या साठ किलोमीटरपैकी पंचेचाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण पूर्ण होणार असून उर्वरित पंधरा किमी अंतरावरील काम जून २०१२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिली. यामुळे मुंबई ते धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग आगामी दीड वर्षाच्या आत चौपदरी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे नाशिकच्या पालकमंत्र्यांचे आवाहन


नाशिक (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या विकासासाठी लागणार्‍या जमिनीच्या भूसंपादनात प्रकल्पग्रस्तांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, राजकीय आकसापोटी विकासकामांना खीळ बसेल असे प्रयत्न कुणीही करू नये असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुंबई आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा आढावा घेताना पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते.
ते म्हणाले, की प्रत्येकाला विकास हवा आहे. विकास कामांमुळे जमिनीचे भाव वधारतात. शासनाला एक इंचही जमीन विनाकारण नको आहे. शेतकर्‍यांनी योग्य त्या मोबदल्यात विकासकामांना सहकार्य करावे. विकासाची खरी बाजू जनतेसमोर आणून शासकीय यंत्रणेच्या चुका निदर्शनास आणून देण्याचे आवाहन यावेळी श्री. भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना केले. भूसंपादनापोटी काही ठिकाणी शेतकर्‍यांना एकरी ६५ लाखापर्यंत भाव देऊनही मोर्चे निघणे ही बाब भूषणावह नाही. आजही कारखानदारांची पहिली पसंती पुण्याकडे आहे कारण तिथे मूलभूत सुविधांचा विस्तार झाला आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...