बुधवार, २ मार्च, २०११

नवी मुंबई प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या १२.५ टक्के भूखंड वाटप

मुंबई, ता. २ - नवी मुंबई प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्त खातेदारांना शासन निर्णयाप्रमाणे १२.५ टक्के भूखंड वाटप करण्यात येत असून, या भूखंड वाटपाच्या संचिकेतील माहिती मिळणेसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना सिडको कार्यालयात वारंवार यावे लागू नये, या उद्देशाने भूमी व भूमापन विभागातर्फे प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या नावांची व संचिका क्रमांकाची यादी तयार करण्यात आली आहे.
सिडको भवन येथील माहिती केंद्रात व www.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून या यादीत तालुकानिहाय प्रत्येक गावातील भूधारकाच्या संचिकांचा तपशील जसे संचिका क्रमांक, पात्रता धारकाचे नाव याबाबत माहिती तसेच ज्या भूधारकांची पात्रता शिल्लक आहे त्यांची ज्येष्ठता यादी उपलब्ध असून, यापुढे ज्येष्ठतेनुसार भूखंडांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ६७९१, ८१०५/८१०६ या क्रमांकावर संपर्क साधून व वरील संकेतस्थळावर आपल्या संचिकेचा तपशील प्राप्त करू शकतात.

मंगळवार, १ मार्च, २०११

राज्यात प्रीपेड वीज मीटर बसविणार

मुंबई येथे मंत्रालयात प्रीपेड वीज मीटर योजनेचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा विभागाचे मुख्यसचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदी.
मुंबई, ता. १ - मोबाईल फोनच्या धर्तीवर राज्यात वीज बिलासाठी प्रीपेड मीटर लावण्यास प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेस आज सुरवात झाली.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव सुब्रतो रथो, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे २५ हजार प्रीपेड वीजमीटर लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे वीज मीटर लावणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. सुरवातीस पुणे, नागपूर, औरंगाबाद, पेण, कल्याण, कोल्हापूर परीसर तसेच महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा अशा पर्यटनस्थळी प्रीपेड वीजमीटर लावले जातील.
प्रीपेड मीटर लावणार्‍या ग्राहकांना वीज बिलात पाच टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे. या मीटरमधील वैधता संपल्यानंतर ऑनलाईन रिचार्ज करण्याची सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या दिवशी किंवा सुटीच्या दिवशी रिचार्ज अभावी वीज कनेक्शन खंडित होणार नाही. त्यासाठी खास हॅप्पी अवर्स ची त्यात सुविधा आहे. कुठल्याही राष्ट्रीय सणांच्या किंवा सुटीच्या दिवशी रिचार्ज अभावी वीज कनेक्शन खंडित होणार नाही. त्यासाठी खास हॅप्पी अवर्स ची त्यात सुविधा आहे.
या प्रीपेड मीटरची किंमत २ हजार ६०० रुपये असून त्याचा भार वीज ग्राहकांवर पडणार नाही. महावितरणतपर्फे हे मीटर बसविले जाणार आहेत. हे मीटर वापराच्या दृष्टीने सुलभ असल्यामुळे कुणालाही अडचण येणार नाही. याचे कार्य प्रीपेड मोबाईल फोनप्रमाणेच असून या योजनेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजूरी दिली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी अनावरण

मुंबई, ता. १ - अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे उद्या (ता. २ मार्च) सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्ह येथील इक्सिया इव्हेंट लाउंजमध्ये सायंकाळी चारला अनावरण समारंभ होईल.
छत्रपती शिवरायांचे जगभरात अनेक पुतळे असले तरी मेणापासून बनविण्यात आलेला हा शिवरायांचा जगातील पहिलाच पुतळा आहे. भारतातील एकमेव वॅक्स आर्टिस्ट असलेलेल तसेच लोणावळा येथील "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम" चे संकल्पक-कलाकार सुनिल कंदल्लूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. आजपर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक व्यक्तींचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत. शिवाजी महाराजाचा पुतळा त्यांच्या लौकिकास साजेसा असा बनविण्यात आला असून पाहणार्‍यास, शिवाजी महाराज पुन्हा भूतलावर अवतरल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वॅक्स म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार यांनी व्यक्त केला आहे. उद्या अनावरणानंतर हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शंभरीची शंभरी गाठण्यापासून सचिन केवळ दोन पावले दूर..

क्रमांक एक चा विश्वविख्यात क्रिकेटपटू होऊन देखील आपल्या साध्या राहणी, सुशील स्वभावाची ख्याती प्राप्त केलेला अनेक चाहत्यांचा सुपरहिरो सचिन तेंडुलकर आपल्या शंभर धावांची शंभरी अर्थात शतकांचे शतक गाठण्यापासून केवळ दोन पावले दूर आहे.
आजतागायत सचिनने कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५१ शतके झळकावली असून एक दिवसीय सामन्यांमध्ये ४७ शतके झळकावली आहेत. ९८ वे शतक नुकतेच बंगळूर येथे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना पूर्ण केले आहे. सर ब्रॅडमन यांच्याशी तुलना केली जाणारा सचिन...एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सचिन तेंडुलकरला शाळेपासूनच क्रिकेटची खूप आवड होती. आपल्या 'शारदा विद्यामंदिर' शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असतानाच जीवलग मित्र विनोद कांबळीबरोबर त्याने ६६४ धावांची भागीदारी रचली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्याने मुंबई संघातून गुजरात संघाविरुद्ध खेळून नावलौकिक प्राप्त केला. सचिन तेंडुलकर याच्या कुटुंबियांचे, सचिन देव बर्मन म्हणजेच एस. डी. बर्मन हे आवडते संगीत दिग्दर्शक होते, यांच्या नावावरूनच त्याचे नाव "सचिन" ठेवले गेल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूसचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. १८ डिसेंबरला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच पुन्हा वकार युनूसने त्याला बाद केले. या मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौर्‍यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या जॉन राईटने सचिनचा झेल पकडला परिणामी सचिन जगातला सर्वात तरूण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौर्‍यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. परंतु या काळात तो फारसे चांगले खेळू शकला नाही. तेंडुलकरला खरा सूर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात गवसला, यावेळी त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकावीर ठरला होता. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचताना सचिनला अनेकदा अपमान देखील सहन करावे लागले, हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.
सचिनने एकदिवसीय सामन्यात १७,०००पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेत सचिन आणखी कोणकोणते विक्रम नोंदवतो, याकडे संपूर्ण जगातील त्याच्या चाहत्यांचे लक्ष आहे.
सचिनची ९८ शतके याप्रमाणे:
धावसंख्या      देश
119                 इंग्लंड
148                 ऑस्ट्रेलिया
114                 ऑस्ट्रेलिया
111                 दक्षिण आफ्रिका
165                 इंग्लंड
104                श्रीलंका
142                श्रीलंका
179                वेस्ट इंडिज
122               इंग्लंड
177               इंग्लंड
169              दक्षिण आफ्रिका
143             श्रीलंका
139            श्रीलंका
148            श्रीलंका
155           ऑस्ट्रेलिया
177           ऑस्ट्रेलिया
113          न्यूझिलंड
136         पाकिस्तान
124         श्रीलंका
126         न्यूझिलंड
217         न्यूझिलंड
116        ऑस्ट्रेलिया
122        झिम्बाब्वे
201        झिम्बाब्वे
126        ऑस्ट्रेलिया
155        दक्षिण आफ्रिका
103        इंग्लंड
176        झिम्बाब्वे
117        वेस्ट इंडिज
193        इंग्लंड
176        वेस्ट इंडिज
241       ऑस्ट्रेलिया
194       पाकिस्तान
248       बांग्लादेश
109       श्रीलंका
101       बांग्लादेश
122       बांग्लादेश
154       ऑस्ट्रेलिया
153      ऑस्ट्रेलिया
109      ऑस्ट्रेलिया
103      इंग्लंड
160      न्यूझिलंड
100     श्रीलंका
105      बांग्लादेश
143      बांग्लादेश
100      दक्षिण आफ्रिका
106      दक्षिण आफ्रिका
203       श्रीलंका
214       ऑस्ट्रेलिया
111        दक्षिण आफ्रिका
146       दक्षिण आफ्रिका
   
   

110       ऑस्ट्रेलिया
115       न्यूझिलंड
105       वेस्ट इंडिज
112      श्रीलंका
127      केनिया
137      श्रीलंका
100      पाकिस्तान
118     पाकिस्तान
110     श्रीलंका
114     दक्षिण आफ्रिका
104     झिम्बाब्वे
117     न्यूझिलंड
100     ऑस्ट्रेलिया
143     ऑस्ट्रेलिया
134     ऑस्ट्रेलिया
100    केनिया
128    श्रीलंका
127    झिम्बाब्वे
141     ऑस्ट्रेलिया
118    झिम्बाब्वे
124    झिम्बाब्वे
140    केनिया
120    श्रीलंका
186     न्यूझिलंड
122     दक्षिण आफ्रिका
101    श्रीलंका
146    झिम्बाब्वे
139     ऑस्ट्रेलिया
122     वेस्ट इंडिज
101     दक्षिण आफ्रिका
146    केनिया
105     इंग्लंड
113    श्रीलंका
152    नामिबिया
100     ऑस्ट्रेलिया
102     न्यूझिलंड
141    पाकिस्तान
123    पाकिस्तान
100    पाकिस्तान
141     वेस्ट इंडिज
100     वेस्ट इंडिज
117     ऑस्ट्रेलिया
163     न्यूझिलंड
138    श्रीलंका
175     ऑस्ट्रेलिया
200     दक्षिण आफ्रिका
120     इंग्लंड

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

देशाच्या सर्वंकष विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प: अजित पवार

मुंबई, ता. २८ - केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वंकष विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केली.
श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठीच्या भरीव तरतुदीबरोबरच डाळी, भाजीपाला, बाजरी, ज्वारीच्या उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न म्हणजे खर्‍या अर्थाने दुसर्‍या हरितक्रांतीच्या दिशेने टाकलेली दमदार पावले आहेत. कृषी पतपुरवठ्यातील एक लाख कोटी रुपयांची भरीव वाढ तसेच मांस, मासे, दूध आदींच्या उत्पादन आणि वितरणात सुलभतेसाठी आखलेल्या योजना शेतीपूरक व्यवसायाला चालना देणार्‍या आहेत. त्याचबरोबर महिला बचत गटांसाठी केलेल्या तरतुदीमुळे ग्रामीण भागाच्या सर्वंकष उन्नतीस हातभार लागेल .
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, की सध्या अस्तित्वात असलेल्या विशाल किंवा अतिविशाल ऊर्जा प्रकल्पांना भांडवली वस्तूचा पुरवठा करणार्‍या डोमेस्टिक सप्लायर्सनां पॅरलल एक्साईज ड्यूटीतून सवलत मिळणार आहे. तसेच पीपीपी अंतर्गत प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण आणले जाणार असल्याने खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून होणार्‍या विकास कामांमध्ये सुसूत्रता येईल. अर्थमंत्र्यांनी मेट्रो रेल्वेसाठी केलेल्या आर्थिक मदतीच्या सूतोवाचमुळे मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरणाचे भान राखण्याच्या दृष्टीने करण्यात येणार्‍या उपाययोजना जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच महत्वपूर्ण ठरतील.
वैयक्तिक करदात्यांच्या कर मर्यादेत वाढ केल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्यात आली आहे. तसेच ८० वर्षांवरील नागरिकांना २०० रुपयांऐवजी दरमहा ५०० रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांच्या वेतनात दुप्पटीने वाढ केल्याने राज्यातील सुमारे दोन लाख जणांना त्याचा लाभ होईल. अनुसूचित जाती आणि जमातीमधील इयत्ता नववी आणि दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमुळे वंचितांच्या शिक्षणास मदत होईल.

छगन भुजबळ यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत

मुंबई, ता. २८ - महागाई नियंत्रणाबरोबरच अन्नधान्य उत्पादन वाढीला चालना देणारा तसेच कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक दर वृद्धीचे सूतोवाच करणारा अर्थसंकल्प 'आम आदमी' ला दिलासा देणारा तसेच परिपूर्ण ठरला आहे. या शब्दात सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी, केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
शेती, शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत असतानाच जीवनावश्यक वस्तू, इंधनाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी त्यावर कोणताही कर न लावता आणि प्राप्तीकरमर्यादा वाढवून नोकरदार वर्गालाही दिलासा देणार्‍या या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे, असे मत श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कृषी क्षेत्राने ५.४ टक्क्यांची वृद्धी नोंदविली ही अत्यंत चांगली बाब आहे. ही वाटचाल आगामी वर्षातही कायम रहावी यासाठी अर्थसंकल्पात विचार केला आहे. भाजीपाला, डाळींच्या उत्पादनासाठी भरीव आर्थिक तरतूद, कृषी कर्जमर्यादा ४.७५ लाखांवर, खतांवर रोख सबसिडी, सिंचन उपकरणे व कृषी अवजार स्वस्त, कोल्ड स्टोअरेज प्रकल्पांमध्ये वाढ, फूडपार्क उभारणी असे शेतकर्‍यांच्या दृष्टीने अनेक उपयुक्त निर्णय घेण्यात आले आहेत. कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा लाभ निश्चितच मोठ्या प्रमाणात होईल. सबसिडीऐवजी रोख मदतीमुळे भ्रष्टाचारासही आळा बसेल. बटतगटांच्या विकासासाठी विशेष तरतूद करतानाच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाचा ठरू शकतो. भारत-निर्माण योजनेसाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे देशातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून जाण्यास मोठी चालना मिळणार आहे.
शिक्षणासाठी करण्यात आलेली सुमारे ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद अत्यंत महत्वपूर्ण असून याअंतर्गत सार्वशिक्षण अभियानासाठी भरीव तरतूद केली आहे. तथापि, इयत्ता नववी व दहावीतील गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती योजनेच्या परीघात इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याची आवश्यकता होती. असंघटित क्षेत्रासाठीही स्वावलंबन पेन्शन योजना राबवित असतानाच ८० वर्षांवरील बीपीएलधारकांना ५०० रुपये पेन्शन, इंदिरा गांधी पेन्शन योजनेची मर्यादा ६० वर्षे, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षांपर्यंत खाली आणणे या निर्णयांचा समाजाच्या तळागाळातील नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने व आर्थिक स्वावलंबनासह जगण्यासाठी मोठा उपयोग होईल. जीवनावश्यक वस्तू व इंधनावर एक्साईज कर न आकारण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू ठरलेल्या मोबाईल, फ्रीज स्वस्त झाल्याचा फायदाही या वर्गास होईल.
आरोग्य क्षेत्रासाठी आपण भरीव तरतूद केली असली तरी हॉस्पिटलमधील उपचारांवरील खर्च वाढविण्याऐवजी नियंत्रणात ठेवता आला असता तर अधिक बरे वाटले असते, असेही श्री. भुजबळ म्हणाले.

कोकणच्या विकासाला सर्वतोपरी सहाय्य करणार: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २५ - पर्यटकांना इतर राज्यातील पर्यटन स्थळांचा विसर पडेल इतकी पर्यटन क्षमता कोकणात आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटनाच्या विकासाकरिता राज्य शासनातर्फे सवर्तोपरी सहाय्य करण्यात येईल. असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिले.
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने बांद्रा-कुर्ला संकुलातील मैदानावर आयोजित ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त चर्चासत्रात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी पर्यटनमंत्री असताना कोकणसाठी केलेल्या प्रयत्नांना तेव्हाच्या मानसिकतेमुळे अनुकूल वातावरण नव्हते, परंतू आजच्या या ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सवातून मात्र कोकणवासीयांची पर्यटनाबाबतची मानसिकता अनुकूल झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्र किंवा कोकणात येणारा विदेशी पर्यटक सुमारे ८० जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. कोकणातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्ग व त्यावरील पुलांची बांधकामे प्रगतीपथावर असून लवकरच पूर्णत्वास येत आहेत. रायगड सारख्या ऐतिहासिक किल्ल्याचा व परिसराच्या विकासासाठी खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे मात्र यात अनेक अडचणी आहेत.
पर्यटन विकासासाठी सर्व संबंधितांसमवेत तपशीलवार चर्चा करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे सांगून भुजबळ यांनी कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांच्याकडे अहवाल सुपूर्द केला.
रायगड किल्ला व परीसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी सारस्वत बँक आर्थिक मदतीसाठी तयार असल्याचे एकनाथ ठाकूर यांनी सांगितले. कार्याध्यक्ष संजय यादवराव व सुकथनकर यांनी कोकणातील पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना भेडसावणार्‍या समस्या शासनाने दूर करण्याची विनंती केली.

रविवार, २७ फेब्रुवारी, २०११

किती उरली आहे अस्खलित मराठी...?

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
दिवसेंदिवस जग जवळ येतंय, तसा माणूस माणसापासून दूर जातोय. टीव्ही, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेट, कॉम्प्यूटर अशा विविध माध्यमांमुळे होणारी प्रगती आणि विकास नाकारता येणार नाही. परंतू माणूस माणसापासून दूर जातोय हे कटूसत्य आहे. काही वर्षांपूर्वी मातृभाषेसह एखादी भाषा बोलता येणारी व्यक्ती आता किमान चार भाषा बोलू लागली आहे. मात्र भोवतालच्या वातावरणामुळे बऱ्याच अंशी कित्येकांच्या, विशेषतः मराठी बांधवांच्या भाषेवर विपरित परिणाम झाला आहे. अन्य मातृभाषा असलेले परंतू महाराष्ट्रात राहणारे बांधव एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेतच साधतात. आमचा मराठी बांधव मात्र एकमेकांशी संवाद साधताना मातृभाषेत बोलण्याऐवजी अन्य भाषेत बोलतो. मध्य प्रदेशाकाही राज्यांमध्ये तर सर्रासपणे हे पहावयास मिळते. आजी-आजोबा मराठी बोलतात, आई-वडिल मराठी-हिंदी भाषेत बोलतात आणि तिसरी पिढी म्हणजेच मुलं..या मुलांना तर मराठी अगदी कमी बोलता येतं..! त्यांचे पालक देखील त्यांच्याशी जास्तीत जास्त हिंदीमध्येच बोलतात. हिंदी भाषेचा येथे विरोध नाही, मात्र आपली मातृभाषा विसरता कामा नये, मातृभाषा यायलाच पाहिजे हे संस्कार आपल्या मुलांवर करणे ही पालकांची जबाबदारी आहे. याचा विसर पालकांना पडलेला दिसतो. एकीकडे मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि यासाठी घेतल्या जाणाऱ्या बैठकांना, तयारी करताना मात्र आम्हाला मराठीचा विसर पडतो, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सुद्धा सध्याची पिढी अस्खलित मराठी विसरत चालली आहे हे सहज जाणवते. मराठी बोलताना, संवाद साधताना इंग्रजाळलेली मराठी वापरायची (खानदेशी शब्द म्हणजे घुसडायची) सवय झालेली आहे. अलिकडे तसे इंग्रजी सुद्धा वाढले आहे, लोकांना इंग्रजी माध्यम वापरता येऊ लागले आहे, ही बाब चांगली कौतुकास्पद आहे. पण याबरोबर आपली मातृभाषा मराठी मागे पडत चालली आहे.
मराठी बांधव कोणत्याही प्रांतात जावो, स्थायिक झालेला असो, परंतू मराठी विसरू नये, हीच आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त विनंती!

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

CIDCO organizes Vasant Mela at Urban Haat

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
The Urban Haat at Navi Mumbai has surfaced as the new happening destination for the exhibition and sale of artifacts of artisans from various states. Last year, the citizens of Navi Mumbai bought the artifacts from various states displayed at different exhibitions at Urban Haat and also experienced a great time. The exhibitions included CIDCO Navi Mumbai Festival, Kokan Saras, Maharashtra Mahotsav, Handloom Festival, Marathi Vyapari Mitramandal Mahotsav, Vasant Mela, Shravan Mela and Surabhi Dhamaka.


Now, Vasant Mela is being organized at Urban Haat from 9th to 20th March, 2011. With an objective to benefit the artists displaying their traditional folk art at the Urban Haat as well as the citizens, CIDCO aims to organize such exhibitions for the whole year at Urban Haat.

Through this appeal, Bachat Gats from all Zilla Parishads under Rural Development Department, Maharashtra, artisans related to Khadi Gramodyog Mandal as well as handloom, handicraft and food artists, sculptors and small businesses are being invited to participate in the Vasant Mela.

Any artist, NGO and Bachat Gat producing handloom, handicraft, food, herbal and floriculture products, art and paintings, books in various languages, bamboo and wooden furniture, jute, leather and terracotta products, and garden and nursery equipment can participate in this Vasant Mela in March 2011. To participate, contact Manager - Urban Haat, CBD Belapur, Navi Mumbai on 022-2756 1284 (0) / 95945 21169 (M) or e-mail manager.urbanhaat@gmail.com.





शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे.
श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाकुर्ली (ठाणे) येथे ७०० मेगावॉट क्षमतेचा गॅस पॉवर प्रकल्पही उभारला जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीला नव्या रेल्वे मार्गाने जोडले जाणार असल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कुठलीही वाढ न केल्यामुळे महागाई आटोक्यात राहण्यास मदत होईल. ई-तिकिटांच्या आरक्षण शुल्कातही कपात करण्यात आली आहे. शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अपंगांसाठी दिलेली सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढीव सवलतीसह विविध घोषणांमुळे हा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने आम-आदमी चा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी श्री. पवार यांनी व्यक्त केली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...