गुरुवार, २७ जानेवारी, २०११

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शासनातर्फे शुभेच्छा

मुंबई, ता. २६ - देशाच्या ६२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ, शासकीय प्रतिनिधी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि सहिष्णुता या तत्वांचा अंगिकार करण्यासाठी सारे प्रतिबद्ध होऊ या, अशा आशयाच्या आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोमवार, २४ जानेवारी, २०११

तळपणार्‍या स्वरभास्कराचा अंत - अजित पवार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर दीर्घ काळ अभूतपूर्व तेजाने तळपणार्‍या स्वरभास्कराचा अस्त झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. संगीताच्या ध्यासापोटी वयाच्या अकराव्या वर्षापासून भीमसेन जोशी यांनी केलेले कष्ट, प्रयत्न यातून एका अद्भूत गायकीचा जन्म झाला. पंडितजींनी गायलेल्या अभंगरचना, शास्त्रीय संगीतातील त्यांनी आळवलेले विविध राग, चीज, पुण्यात त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ सन १९५३ पासून सातत्याने साजरा होणारा सवाई गंधर्व महोत्सव अजरामर राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या रुपाने एक मौलिक रत्न आज आपण गमावले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

हळहळलं अवघ्या रसिक जनांचं मन...

माझे माहेर पंढरी, विठ्ठल नामाचा रे टाहो...अशा अनेक भजनांपासून प्रभू अजि गमला..अशी विविध नाट्यगीते, मिले सुर मेरा तुम्हारा...आदी प्रकार सादर करून केवळ रसिकांना थक्क करून सोडणार्‍या आणि जागेवरच खिळवून ठेवणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे अवघं रसिक जनांचं मन हळहळलं आहे.
आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत असताना, लहानपणापासूनच संगीत क्षेत्राकडे कल असणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या व वडिलांच्या मतभेदामुळे अत्यंत लहान वयातच भीमसेन जोशी यांनी घर सोडले होते. ग्वाल्हेर येथे किराणा घराण्याचे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. पंडितजींनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे १९५२ साली सुरू केला. आजही दरवर्षी पुणे येथे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नामवंत गायक येथे येऊन हजेरी लावणे हे भाग्य समजतात.
कोणत्याही कलाकाराला साजेशा अशा पंडित भीमसेन जोशी यांनी केवळ मराठी रसिकच नाही, तर गैरमराठी रसिकांची मने देखील आपल्या खड्या आवाजामुळे जिंकली होती. मराठी व्यतिरिक्त कानडी आणि हिंदी भाषेतही त्यांनी उपशास्त्रीय संगीतास सुरवात केली. पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली. कारण त्यांना वारंवार करावा लागणारा विमान प्रवास मानला जायचे. पंडितजींच्या गायनाला सुरवात झाल्यानंतर मैफलित झोपेमुळे पेंगणारे रसिक त्वरीत खडबडून जागे व्हायचे.
पंडितजींना मिळालेले विविध पुरस्कार-
* भारतरत्न पुरस्कार
    * पद्मश्री पुरस्कार
    * संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
    * पद्मभूषण पुरस्कार
    * पद्मविभूषण पुरस्कार
    * संगीताचार्य
    * पुण्यभूषण पुरस्कार
    * स्वरभास्कर पुरस्कार
    * तानसेन पुरस्कार
    * डॉक्टरेट डि. लिट्.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला

मुंबई, ता. २४ - पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या क्षितिजावर तेजाने तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला, या शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
किराणा घराण्याचे शिष्य असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांचे ख्याल गायकीवर प्रचंड प्रभुत्व होते. कन्नड, हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी भक्तीगीते आणि अभंगांचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ आणि दर्दी रसिकांबरोबरच सामान्य नागरिकांच्या मनावरही त्यांनी गारूड केले. त्यांचा विशिष्ट खर्जातील आवाज आणि ताना घेण्याची पद्धत रसिकांवर मोहिनी घालत असे. अलिकडे, मिले सुर मेरा तुम्हारा..., आणि भारतबाला च्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्येही त्यांचे गायन आणि व्यक्तीमत्व यांची छाप अखिल भारतीयांच्या मनावर उमटली. पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्या गुरुंना आदरांजली वाहण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह अनेक शिष्यांची देणगी या गायकाने देशाला दिली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

पंडित भीमसेन जोशी यांचे निधन

सुमारे पन्नास वर्षांपासून संगीत क्षेत्रात आपल्या खड्या आवाजाने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या पंडित भीमसेन जोशी यांची प्राणज्योत आज मालवली.
आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्‍या संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध होती. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते.
आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती.

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

१५ जानेवारी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा होणार

दरवर्षी १५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यास केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. मतदान करण्यात असलेली मतदारांची उदासीनता लक्षात घेऊन ही संकल्पना अस्तित्वात येत आहे.
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. दिवसेंदिवस मतदारांची मतदान करण्याविषयी उदासीनता वाढत आहे. वारंवार होणारी सत्ता परिवर्तने आणि जनतेस मिळणार्‍या सुखसोयी हे याचे प्रमुख कारण असल्याने युवकांपासून ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यास मतदान केंद्रात जात नाहीत. कोणीही सत्तेवर आला तरी देखील काहीच करत नाही. यापेक्षा मतदान न केलेलेच बरे...! अशी मतदारांची भूमिका असते. यात बर्‍याच अंशी तथ्य देखील आहे,
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी बनविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघातील नवीन मतदारांचा मेळावा भरविण्यात येईल. त्यांना ओळखपत्र व बॅज देण्यात येणार असून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे पंचवीस टक्के युवक मतदारयाद्यांसाठी नावनोंदणी करतात अथवा मतदान करतात असे सर्वेक्षणात आढळले असून यामुळेच राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना मूर्त रूपात आणत असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाची ही संकल्पना कौतुकास्पद आहे. या संकल्पनेस प्रतिसाद मिळेल तो मिळेल. परंतू शासनापेक्षा तज्ज्ञांच्या मताप्रमाणे मतदारांच्या, मतदार नोंदणी करणार्‍यांच्या प्रमाणात, टक्केवारील अपेक्षेनुरुप वाढ झाल्यानंतर दरवर्षी साजरा करण्यात येणारा हा दिन थांबविण्यात यावा. दरवर्षी साजरा करण्यात येणारे विविध दिन यावर खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या खर्‍या अर्थान सोडविण्यासाठी राबविल्या जाणार्‍या योजनांमध्ये अथवा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना आवश्यक तो अर्थपुरवठा करण्यात शासनाने हा पैसा वापरल्यास सार्थक होईल, हीच अपेक्षा.

पिंपरी-चिंचवड महापालिका व एमआयडीसीने एकत्रित प्रयत्नांतून अतिक्रमणे रोखावी

मुंबई, ता. २० - पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीच्या जागेवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिका व एमआयडीसीने संयुक्त प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासह विविध सूचना श्री. पवार यांनी केल्या.
एमआयडीसीने मागणी केल्यानुसार रिकामे भूखंड परत करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली असून महापालिकेने देखील एमआयडीसीकडे विकास योजनेतील रस्ते आणि पाणी पुरवठा प्रकल्पासाठी जागेची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

नायगाव येथे पॉलिटेक्निक सुरू करणार - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई, ता. २० - नायगाव (जि. सातारा) येथे मुलींसाठी पॉलिटेक्निक सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
नायगाव येथील विकास कामांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, आमदार मकरंद पाटील, पर्यटन विभागाचे मुख्य सचिव आनंद कुळकर्णी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव असल्यामुळे विशेष बाब म्हणून तेथे पॉलिटेक्निक सुरू केले जाईल. मुलींसाठी वसतीगृह उभारण्याची कार्यवाही देखील त्वरीत सुरू करावी. पर्यटक निवास आणि विविध बाबींसाठी दोन ठिकाणांची जागा निश्चित करून संबंधित विभागांना त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळाचे सपाटीकरण यांत्रिकी विभागकडून करून घ्यावे. आदी सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात कुस्ती, कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी

मुंबई, ता. २० - देशी खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन आराखड्यात कुस्ती आणि कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी, तसेच महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या मानधनासंदर्भातील वय आणि उत्पन्न अट शिथील करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या विविध मागण्या आणि कुस्ती स्पर्धांचे धोरण ठरविण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. युवक कल्याण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी, वित्त विभाग मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड, क्रीडा व युवक संचालनालयाचे संचालक नरेंद्र सोपल, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
मानधनासाठी खेळाडूंचे वय ५० वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे, परंतू हिंदकेसरी, महान भारतकेसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेत्यांना वय व उत्पन्नाची अट नाही. याच धर्तीवर महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांना असणारी उत्पन्नची अट शिथील करावी अशी कुस्तीगिरांची मागणी होती. याविषयी प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा किताब विजेत्यांना एसटी बस प्रवास सवलत लागू करावी. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठीची एसटी प्रवास सवलत कूपनची मर्यादा ५०० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढवावी असे निर्देश पवार यांनी दिले.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा विचार केला जाईल. यासाठी क्रीडामंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कुस्तीगिरांनी चर्चा करून आराखडा सादर करावा असेही पवार यांनी सांगितले.

स्वारगेट बसस्थानकासह परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता

मुंबई, ता. २० - पुण्यातील स्वारगेट एसटी आणि शहर वाहतूक बस स्थानक परिसरातील सद्यस्थिती आणि नियोजित मोनो व मेट्रो रेल्वे स्थानकामुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन या परिसराच्या पुनर्विकासास तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
पुणे आणि बारामती शहरातील एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी ही माहिती दिली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक, उपाध्यक्ष दीपक कपूर, पुणे विभागीय आयुक्त दिलीप बंड, पुणे महापालिका आयुक्त महेश झगडे आदी उपस्थित होते.
बैठकीत स्वारगेट परिसराच्या पुनर्विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी श्री. पवार म्हणाले की, स्वारगेट परिसरात सर्व बाजूंनी वाहतूक एकवटली असून सध्याच्या आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून एसटी आणि शहर वाहतूक बसस्थानकांचा विचार करणे आवश्यक आहे. पुनर्विकास करताना सध्याची बसस्थानके आणि नियोजित मेट्रो व रेल्वे स्थानकांसह खासगी वाहनांच्या संख्येचाही विचार करावा लागेल.
बारामती येथे एसटीचा डेपो क्रमांक दोन उभारण्यासाठीच्या जागेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की बारामती एमआयडीसीतील जागा केंद्र शासनाच्या एका संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आली असून संबंधित जागा उपलब्ध होत नसल्यास सेंट्रल बिल्डिंगजवळील जागा देण्याबाबत चौकशी केली जाईल.
बसस्थानकांचा पुनर्विकास करताना तेथेच गाळे देऊन परवानाधारक कॅन्टीन आणि स्टॉलधारकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी परवानाधारक असोसिएशनतर्फे करण्यात आली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...