सोमवार, २० डिसेंबर, २०१०

कांद्याने अखेर नाकात दम आणलाच!

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक झळ बसलेला कांदा या पीकाच्या किंमती वाढणार हे स्वाभाविक होतेच. यातूनही काही बहाद्दरांनी फेकलेल्या सडक्या कांद्यातून त्यांना बरा वाटणारा कांदा वेचला. नागरीकांनी देखील विशेषतः महिलांनीही दोन पैसे वाचतील म्हणून स्वस्तात मिळणारा कांदा दोन, पाच किलो घेऊन ठेवला. मात्र  हा कांदा देखील जास्त दिवस टिकू शकला नाही. चार-पाच दिवसातच कांद्याला अंकूर फुटल्यामुले पुन्हा एकदा हा फेकण्यात आला. यानंतर कांद्याच्या किंमती सातत्याने गगनाला गवसणी घालत असल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणले होते. याच कांद्याने आता त्यापेक्षा पलिकडे जाऊन न खाताच चांगला झोंबून तिखट लागल्यामुळे नाकात दम आणला आहे. सांगलीसह काही शहरांमध्ये तर चक्क ६५ (पासष्ट) रूपये प्रति किलो या दराने कांदा विकला जात आहे. नाशिक, मुंबई चाळीस ते पन्नास रूपये असा दर आहे. मध्यमवर्गीयांनी मात्र कांदा न खाणेच पसंत केले आहे. या दरवाढीमुळे, नुकतेच चंपा षष्ठीला संपलेले चातुर्मास आणखी काही दिवस सुरू राहतील, असे गृहिणी मानत आहेत.

साहित्यिक डॉ. भेंडे यांना पवार, भुजबळ यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या निधनामुळे गंभीर लेखनाबरोबरच विनोदी लेखनावरही प्रभुत्त्व गाजविणार्‍या आणि नाविन्याचा दृष्टीकोन बाळगणार्‍या लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. भेंडे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या शैलीतून प्रबोधनाचे कार्य केले. नजरेच्या मिस्किल चष्म्यातून जीवनातील घडामोडींकडे ते खेळकर दृष्टीने बघत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांनाही ते सहभागी करून घेत.
विनोदाच्या पायवाटेवरून चालताना गंभीर आणि समस्याप्रधान कादंबर्‍यांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या कादंबर्‍यांमधील आशयात विलक्षण विविधता जाणवते, असा दिलदार आणि अंगभूर रसिकता असलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट संवेदनशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. सुभाष भेंडे उत्कृष्ट साहित्यिक होतेच परंतु एक उत्तम माणूस देखील होते, या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

बोगस "बहिरे" झालेल्यांसाठी शासनानेही व्हावे 'बहिरे'...

धुळे जिल्ह्यात अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मॅनेज् करून अर्थातच बोगस बहिरे झाल्याचे वृत्त आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आता शासनाच्या सवलती मिळवण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि सर्वात आदराने पाहिले जाणारे काही शिक्षक देखील सरसावले आहेत. अशा सर्व बोगस, खोटा दाखला देऊन, अहवाल सादर करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटे बहिरे बनणार्‍या कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी शासनानेही बहिरे होऊन दुर्लक्ष करावे म्हणजे खरेपणा ऐकू येईल, हीच अपेक्षा!

सेंचुरियन मध्ये ५० वी सेंचुरी..वेल डन् सच्यू..

क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर याने काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंचुरियन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात सेंचुरी केली. आपल्या कारकीर्दितली सचिन याची कसोटी सामन्यातील पन्नासवी सेंचुरी (शतक) आहे.सचिनचे करावे तितके कौतुक थोडे आहे...
सुरवातीपासूनच उत्कृष्ट फलंदाजी करून भल्या भल्यांना पाणी पाजणार्‍या सचिनकडे क्रिकेटप्रेमी अपेक्षेनेच पाहू लागले. कसोटी सामन्यात पन्नासवे शतक झळकावणारा सचिन हा आज संपूर्ण जगातला, क्रिकेट विश्वातला पहिला बॅट्समन् झालाय. सचिनचे आता वय झाले आहे, सचिनने आता निवृत्त व्हावे म्हणणार्‍यांना त्याने अजूनही आपण 'फिजिकली-फिट्' असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.  ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सुद्धा ते म्हातारे झाले पण सचिन अजूनही तरूण आहे या शब्दात सचिनबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. गानसम्राज्ञी आशा भोसली यांनी तर सचिनला आता भारत-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन केले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्येही सचिनची ४६ शतके पूर्ण झाली असून तिथेही सर्वोच्च पदावर पोहोचण्याची संधी सचिनला मिळणार आहे. हा विक्रम नोंदवण्यास सुद्धा केवळ चार शतकांनी दूर असलेला सचिन ही अपेक्षा देखील पूर्ण करेल, हीच अपेक्षा!

"डॉक्टरांची माफिया गँग" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, ता. १८ (वार्ताहर)- राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत उर्फ काकासाहेब पुरंदरे यांच्या "डॉक्टरांची माफिया गँग" या पुस्तकाचे काल (ता. १७) प्रकाशन करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या कार्यक्रमात शिवनेर चे संपादक नरेंद्र वाबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद मोकाशी, माउंट अबू येथील डॉ. सचिन परब, योगतज्ज्ञ दादा वैशंपायन, श्रीकृष्ण चैतन्यप्रभू, डॉ. वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, की पुरंदरे यांचे अनुभव तसेच सामान्य माणसाला माहित नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक वास्तवावर आधारित आहे. व्याधी दूर व्हाव्यात म्हणून योगोपचार उत्तम औषध असल्याचं भुजबळ म्हणाले. तीस वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा योगोपचाराचं महत्व पटलेलं आपण पाहिलं आहे. काका पुरंदरे म्हणजे समाजाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी परखड शब्दात डोळ्यात अंजन घालणारा ज्येष्ठ पत्रकार आहे. वैद्यकीय क्षेत्रात काही अपप्रवृत्ती असल्या तरी नि:स्वार्थीपणे व पैशाची अपेक्षा न ठेवता कार्य करणारे डॉक्टर्ससुद्धा असंख्य आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी, पत्रकारिता क्षेत्रात पुरंदेरे यांनी दिलेल्या योगदानाचा श्री. भुजबळ यांनी आवर्जून गौरव केला. आपल्या नावामागे अथवा नावापुढे पदे येतील आणि जातील..मात्र लोक मला छगन भुजबळ म्हणूनच ओळखतील असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पुरंदरे म्हणाले की, अनेक राजकीय नेत्यांची वर्तवलेली माझी भाकितं खरी ठरली आहेत. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करणारे छगन भुजबळ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या हातून राज्याचं निश्चितपणे कल्याण होईल. या पुस्तकात पुरंदरे यांनी वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तींवर प्रकाशझोत टाकला असल्याचं अध्यक्षीय भाषणात नरेंद्र वाबळे यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक पत्रकार अजय वैद्य यांनी केले. डॉ. मंदाकिनी पुरंदरे, चैतन्य महाप्रभू, डॉ. सचिन परब यांनीही यावेळी वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्तींवर प्रकाश टाकला.

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

शासकीय वसूलीनुसार वेतन,भत्ता वाढ देण्यात यावी...

विधानसभेत विविध विषयांवर चर्चा होवो न होवो, अनेक महत्वाच्या, जीवनावश्यक गोष्टींबाबत निर्णय लागो न लागो...याकडे दुर्लक्ष करून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांच्या भत्त्यात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. हा ठराव मात्र एकमताने पारित करण्यात आला. लोकप्रतिनिधी म्हणवणार्‍या या महनीयांना बहुदा स्वतःची नागरीक, मतदारांसाठी असलेल्या जबाबदारी आणि आपण लोकप्रतिनिधी असल्याचा बहुदा विसर पडला असावा. दिवसेंदिवस महागाई गगनाला गवसणी घालतेय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सारखे वाढतच आहेत, वर्षभरात पाच वेळा वाढलेल्या पेट्रोल दराचे उदाहरण पुरे आहे. असे विविध विषय प्रलंबित असून महत्वाच्या विषयांच्या चर्चेसाठी वादविवाद, राजकारण, गदारोळ, गोंधळ घातला जातो. या वाढीमुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे सोळा कोटिंचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. शासकीय तिजोरीचा बोजा वाढवायचा की कमी करायचा, त्या तिजोरीत भर घालायची याबाबत सर्व महनीय साशंक झालेले वाटत असून केवळ शासनाच्या तिजोरीऐवजी स्वतःची तिजोरी भरण्यातच धन्यता मानणारे राजकारणी तयार झाले आहेत. एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांशी चर्चा करणे गैर मानणारे नेते वेतन, भत्ता वाढीसाठी मात्र आपण दोघे भाऊ भाऊ...याप्रमाणे एक झाले. शासकीय तिजोरीवर पडलेला बोजा, अतिरिक्त भार शेवटी नागरिकांच्या खिशातूनच कमी केला जाणार आहे, यात शंका नाही. महागाई कमी होण्याऐवजी आणखी वाढेल यात शंका नाही. सध्या ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महानगरपालिकांसारख्या संस्थांच्या मदतीला सरसावून, शासनाचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकार्‍यांना थकीत बाकी वसूल करण्याची अत्यंत गरज आहे. वेतन व भत्ता वाढ घेतली आहे, तसेच कार्य देखील होणे अपेक्षित आहे. शासनाने देखील संबंधित प्रांतातील मंत्री, आमदारांच्या विधानसभा मतदार संघातील वसूली आदी बाबींचा अभ्यास व पडताळणी करूनच भविष्यकाळात अशी वेतनवाढ करावी, हीच अपेक्षा.

बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते संशोधक खोब्रागडे यांना जमीन


मुंबई, ता. १४- नांदेड (जि. चंद्रपूर) येथील तांदळाच्या वाणाचे संशोधक शेतकरी दादाजी खोब्रागडे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासनातर्फे दीड एकर जमीन देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोब्रागडे यांना जमिनीचा सातबारा उतारा सुपूर्द केला. अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त गोपाळ रेड्डी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विजय वाघमारे आदी उपस्थित होते.
खोब्रागडे यांनी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. यानुसार आज पूर्तता करण्यात आली. नांदेड येथेच त्यांना ही जमिन देण्यात आली आहे. अत्यल्प जमीन असतानाही तांदळाच्या विविध वाणांचे संशोधन करून त्यांनी मोठे कार्य केले आहे.

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

आता लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे

लोकसभेचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमन वेल्थ गेम्स, आदर्श गृहनिर्माण घोटाळा या विषयांमुळे विरोधक व सत्तारूढ पक्ष यांच्यातील मतभेद व खडाजंगी होऊन परिणती शून्य झाली. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची शक्यता असून यात काय होते याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी सुरळीत पार पडेल अशी आशा लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी व्यक्त केली आहे.

संसद हिवाळी अधिवेशन- खर्च १४६ कोटी:निष्पत्ती शून्य

संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाने आजपर्यंतचे सर्व नीचांक मोडित काढले असून २३ दिवस कामकाज न होण्याचा नीचांक मात्र गाठला आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, या अधिवेशनात एकूण १४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
१) लोकसभेचे १२७.४० तास वाया गेले.

२) राज्यसभेचे कामकाज १०० तास झाले नाही.
३) लोकसभेत अवघे २.३० तास आणि राज्यसभेत ७.३० तास कामकाज.
४) लोकसभेत १० सरकारी विधेयकेपास, ६ पारित १ माघारी.
५) राज्यसभेत ३ विधेयके पास अन्य ४ माघारी
६) दररोज ६.३५ कोटी रुपये खर्च
७) एकूण १४६.०५ कोटी रुपये खर्च
८) निष्पत्ती शून्य...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...