रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

कौतुकाचा आनंद म्हणजे सायीवर घातलेली पिठीसाखर... -बाबासाहेब पुरंदरे

  इंदूर (ता. ३ फेब्रु.): मुलांना मिळालेलं पारितोषिक कोणतंही असो, त्यांचं कौतुक केलच पाहिजे. मुलांना त्यांना मिळालेल्या पारितोषिकाचं आईवडिलांनी केलेलं कौतुक म्हणजे दुधावरच्या सायीवर घातलेल्या पिठीसाखरेसारख्या आनंदासारखाच असतो. या शब्दात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी, येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्याचे कौतुक केले.

येथील महाराष्ट्र साहित्य सभेच्या ५५ व्या शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी प्रतिभावंतांना प्रीतमलाल दुवा सभागृहात शिवशाहीर तथा श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सध्याचा काळ हा स्पर्धेचा असून कोणत्याही स्पर्धेत आता यश संपादन करणे वाटते तेवढे सोपे राहिले नाही. मात्र प्रयत्न केल्यास यश हे पदरात पडतेच, पालकांनी मुलांचं यश कितीही लहान स्वरुपात असलं तरीसुद्धा त्याचं कौतुक अर्थात appreciation हे केलंच पाहिजे, कष्टाने मिळविलेल्या अशा गुणांचा अंगीकार केला पाहिजे. प्रतिभावंतांच्या या कर्तृत्वावर महाराष्ट्र साहित्य सभेने फुंकर घालण्याचं कार्य या माध्यमातून केलं आहे.

यावेळी श्री. पुरंदरे यांनी समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य म्हणजे एक महान देणगी लाभली असल्याचे सांगून अहिल्यादेवी होळकर यांचं महत्त्व देखील जिजाबाई यांच्याइतकच असल्याचे गौरवोद्गार काढले. याचबरोबर वेरूळ येथील १६ व्या (कैलास) लेणीचा उल्लेख करून कर्तृत्व म्हणजे काय असतं हे ही लेणी पाहून लक्षात येतं. या लेणीतील चित्राच्या स्वरुपात साहित्यातील रौद्र, श्रृंगार, हास्य, भय, भक्ती आदी रस कोरलेले असल्याचे सांगून ही लेणी आवर्जून पाहण्याचं आवाहन केलं.

क्षणचित्रे-
  • राष्ट्रीय महापुरुषाची वेशभुषा केलेला पारितोषिक विजेता शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतच पारितोषिक घेण्यास आल्याचा आनंद बाबासाहेबांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. त्यांनी यावेळी उठून मुजरा केला.
  • श्रीदुर्गासप्तशतीचा अनुवाद मराठीत करणार्‍या भगिनीस पारितोषिक वितरणापूर्वी बाबासाहेबांनी पवित्र मनाने पादत्राणे काढून नंतर हा पुरस्कार दिला


शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

HAPPY DASRA!!!

सोनेरी क्षणांनी यावी हाती सोनेरी पाने...
वेचुन घेण्यासाठी आपले हात पुढे "पसरा"...
झाले आहे सुरू आता सुवर्ण युग नवे,
साजरा करू या चला सारे "दसरा"...
दसर्‍यानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

Soneri Kshananni yavi haati Soneri Pane.
Vechun ghenyasathi aaple haat pudhe "pasra".
Zale aahe suru aata 'Suvarn Yuug' nave,
Sajara Karu Ya Sare "Dasra"!
Happy Dasra!!!

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१२

ग्रामपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी 6 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ

मुंबई, दि. 4 : राज्य शासनाने ग्रामपंचायत निवडणुकांबाबतच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील निकषात बदल केला आहे. मागासवर्गीय उमेदवारांना याचा लाभ मिळावा म्हणून 21 ऑक्टोबर 2012 रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 5 ऑक्टोबर ऐवजी 6 ऑक्टोबर 2012 पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने 25 सप्टेंबर 2012 रोजी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशनपत्रासोबतच जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते; परंतु त्यात आता राज्य शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नसल्यास संबंधित उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे जातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी दिल्याची पावती किंवा पुरावा नामनिर्देशनपत्रासोबत जोडावा; तसेच निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भातील हमीपत्रदेखील नामनिर्देशनपत्रासोबत देण्याची तरतूद केली आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राज्य शासनाने अधिनियमात ही दुरुस्ती केली आहे. त्याचा मागासवर्गीय उमेदवारांना लाभ मिळावा व ते निवडणूक लढविण्याच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने पूर्वनियोजित ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमात अंशत: बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 6 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 ऑक्टोबर ऐवजी 8 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत 8 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदानाच्या दिनांकात कोणताही बदल केला नसून पूर्वनियोजनाप्रमाणे 21 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.

सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

दहा नगरपरिषदांसाठी ४ नोव्हेंबरला मतदान- आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई, ता. १- डहाणू, जव्हार, इगतपुरी, त्र्यंबक, नंदुरबार, तळोदा, नवापूर, किनवट, चिखलदरा, आणि पांढरकवडा या दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. या नगरपरिषदांच्या क्षेत्रात आज (ता. १ ऑक्टोबर) रात्री बारापासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या निवडणुकांसाठी चार ते दहा ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. ११ ऑक्टोबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबररोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. २७ ऑक्टोबरला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याची दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. चार नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतदानाच्या दिवशी सायंकाळी साडेसहानंतर किंवा सर्व मतदान केंद्रांवरील मतदान संपल्यावर किंवा दुसर्‍या दिवशी पाच नोव्हेंबरला मतमोजणी होईल. यासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

नगरपरिषदनिहाय जागांचा तपशील (कंसात महिला राखीव): इगतपुरी- १९ (१०), त्र्यंबक- १७ (९), किनवट- १७ (९), नंदुरबार- ३७ (१९), तळोदा- १७ (९), डहाणू- २३ (१२), जव्हार- १७ (९), चिखलदरा- १७ (९) आणि पांढरकवडा- १७ (९).

वसई-विरारमध्ये ४ नोव्हेंबरला एका जागेसाठी पोटनिवडणूक

वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४८ मधील सदस्य संजय रामडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ४ नोव्हेंबर २०१२ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती देखील श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

या पोटनिवडणुकीसाठी ९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील.  १७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर असेल. २० ऑक्टोबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील व अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत होईल. दुसर्‍या दिवशी पाच नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता मतमोजणी होईल. संबंधित प्रभाग क्षेत्रात आज रात्री बारापासून आचारसंहिता लागू होईल व ती निकाल जाहीर होईपर्यंत राहील, असेही राज्य निवडणूक आयुक्त श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...