शनिवार, १० मार्च, २०१२

खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात १२ व १३ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई, ता. १०- सिडकोतर्फे हेटवणे धरणातून खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या १२ व १३ मार्चला वरील नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

१२ व १३ मार्चला सकाळी नऊपासून (९.००) हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. हे काम दुसर्‍या दिवशी म्हणजेच १३ मार्च दुपारी ३.०० पर्यंत चालणार असल्यामुळे सिडको क्षेत्रातील खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखेर अखिलेश च्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर अखेर, समाजवादी पक्षाची धुरा यशस्वीपणे पार पाडणारे आणि सांभाळणार्‍या अखिलेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे.
समाजवादी पक्षाच्या बैठकीत अखिलेश यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अत्यंत कमी वयात (वय ३९) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मान अखिलेश यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत वडील मुलायमसिंग की मुलगा अखिलेश विराजमान होणार याबाबत संभ्रम होता. अखिलेश यांनी त्यांचे वडील मुलायमसिंग हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु पक्षाला मिळालेल्या यशामध्ये अखिलेश यांचा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनीच सांभाळावी अशी मागणी होती.
सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलायम यांचे बंधू आणि जसवंतनगरचे आमदार शिवपालसिंग यादव तसेच रामपूरचे आमदार आझम खान अखिलेश यांचे नाव पक्षाच्या बैठकीत सुचवतील. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बलराम यादव यांचे सुपुत्र आणि आमदार डॉ. संग्राम यादव तसेच हर्दोईचे आमदार नितिन अगरवाल हे अनुमोदन देतील. अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांकडून मांडण्यात आला.

शनिवार, ३ मार्च, २०१२

प्रतीक्षा नवरदेवांची...

कमलादेवी आवटे यांना डॉक्टरेट


सोलापूर: येथील लेखिका, अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्या कमलादेवी आवटे यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील डॉक्टरेट ( पीएच. डी.) नुकतीच प्रदान केली. शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्यासाठी नव्या युगातील माध्यमांचा कसा उपयोग करता येऊ शकतो, याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनास विद्यापीठाने मान्यता दिली असून, या संशोधनामुळे एका नव्या अध्यापन पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.जी.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
कमलादेवी आवटे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य असून, शिक्षणशास्त्र अभ्यासक आणि लेखिका-वक्त्या म्हणून त्या सर्वज्ञात आहेत. पर्यावरणशास्त्र या विषयात एम.एस्सी. केल्यानंतर आवटे यांनी पुण्यातून एम.एड. पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या सर्वप्रथम आल्या. त्यानंतर सोलापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे लेखन- वाचन त्यांनी केले असून, आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.

प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पुनर्रचना मंडळावर प्रा. आवटे सदस्य असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी राबवलेला "सावित्री सखी ज्योत पॅटर्न" राज्यभर लक्षवेधी ठरला. त्यांनी विविध नियतकालिकांसाठी स्तंभलेखन केले आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग: खरे काय, खोटे काय' यासह तीन पुस्तकांचे लेखन-सहलेखन त्यांनी केले आहे. प्राचार्या आवटे अभ्यासपूर्ण वक्त्या असून, 'सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण' हा त्यांच्या आस्थेचा, अभ्यासाचा विषय आहे. "Development of Multimedia Instructional System on Environment Education for B.Ed Pupil Teachers" या विषयावर पीएच.डी. मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

निवडणूक याचिका विहित मुदतीत न्यायालयात दाखल करणे आवश्यक- राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, ता. २३ - महानगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या ग्राह्यतेविषयी वाद किंवा शंका असल्यास अशा निवडणुकीतील उमेदवाराने किंवा मतदाराने कायद्यातील तरतुदींनुसार निकालानंतर विहित मुदतीच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणे आवश्यक आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

या निवडणुका पार पडल्यानंतर मतमोजणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूकीच्या वैधतेबाबत तक्रारी येत आहेत निकालानंतर संबंधित कागदपत्रे सील केली जातात. सील केलेली कागदपत्रे सक्षम न्यायालयाच्या आदेशाशिवाय उघडता येत नाहीत. तसा अधिकार राज्य निवडणूक आयोगास नाही. यामुळे महानगरपालिका संदर्भातील निवडणूक याचिका निकालानंतर १० दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्यात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतीत निवडणूक याचिका १५ दिवसांच्या आत संबंधित सक्षम न्यायालयात दाखल कराव्या लागतात, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिका अंदाजानुसार ५४ टक्के मतदान

मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली.  
दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.  
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात

मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

महानगरपालिकानिहाय तपशील असा-

बृहन्मुंबई-     जागाः २२७      उमेदवार २२३३        मतदान केंद्र ८३२६    मतदार संख्या १०२७९३७७.
ठाणे-     जागाः १३०     उमेदवार ७७८        मतदान केंद्र १४७१     मतदार संख्या ११९४८८६.
उल्हासनगर-    जागाः ७८     उमेदवार ५०४         मतदान केंद्र ५७६     मतदार संख्या ४७६३२७.
नाशिक-     जागाः १२२     उमेदवार ९२९२         मतदान केंद्र १२५३     मतदार संख्या १००३०००.
पुणे-     जागाः १५२     उमेदवार ११७७         मतदान केंद्र २९९६     मतदार संख्या २५५८५७८.
पिंपरी-चिंचवड- जागाः १२८     उमेदवार ८८३         मतदान केंद्र १३३०     मतदार संख्या ११५२५८८.
सोलापूर-     जागाः १०२     उमेदवार ५५७         मतदान केंद्र ९२६     मतदार संख्या ७५४२४०.
अमरावती-     जागाः ८७     उमेदवार ७२४         मतदान केंद्र ६४२     मतदार संख्या ५१७३३८.
अकोला-     जागाः ७३     उमेदवार ५१७         मतदान केंद्र ४२३     मतदार संख्या ३४९५३६.
नागपूर-     जागाः १४५     उमेदवार १२३२       मतदान केंद्र २४९८  मतदार संख्या १९८६०५७.
 
निर्भयपणे मतदान करा

महानगरांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हा बहुमोल हक्क बजवावा असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

या सर्व महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होत असून संबंधित सर्व महानगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य शासनाने आ पल्या विशेषाधिकारांचा वापर करून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...