सोलापूर: येथील लेखिका, अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्या कमलादेवी आवटे यांना शिवाजी विद्यापीठाने शिक्षणशास्त्र विषयातील डॉक्टरेट ( पीएच. डी.) नुकतीच प्रदान केली. शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण देण्यासाठी नव्या युगातील माध्यमांचा कसा उपयोग करता येऊ शकतो, याविषयी त्यांनी केलेल्या संशोधनास विद्यापीठाने मान्यता दिली असून, या संशोधनामुळे एका नव्या अध्यापन पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.जी.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले.
कमलादेवी आवटे सध्या उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य असून, शिक्षणशास्त्र अभ्यासक आणि लेखिका-वक्त्या म्हणून त्या सर्वज्ञात आहेत. पर्यावरणशास्त्र या विषयात एम.एस्सी. केल्यानंतर आवटे यांनी पुण्यातून एम.एड. पूर्ण केले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या सर्वप्रथम आल्या. त्यानंतर सोलापूर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंधांचे लेखन- वाचन त्यांनी केले असून, आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.
प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पुनर्रचना मंडळावर प्रा. आवटे सदस्य असून, महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी राबवलेला "सावित्री सखी ज्योत पॅटर्न" राज्यभर लक्षवेधी ठरला. त्यांनी विविध नियतकालिकांसाठी स्तंभलेखन केले आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग: खरे काय, खोटे काय' यासह तीन पुस्तकांचे लेखन-सहलेखन त्यांनी केले आहे. प्राचार्या आवटे अभ्यासपूर्ण वक्त्या असून, 'सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण' हा त्यांच्या आस्थेचा, अभ्यासाचा विषय आहे. "Development of Multimedia Instructional System on Environment Education for B.Ed Pupil Teachers" या विषयावर पीएच.डी. मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.