शुक्रवार, १३ जानेवारी, २०१२

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील.

हेल्पलाईन आणि संकेतस्थळ

या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, त्यासंदर्भातील तपशील आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळविण्यासाठी 9225320011 या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेता येईल. ही हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत कार्यरत राहील.

आयोगाने निवडणुकांच्या दृष्टीने www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळही तयार केले आहे. येथे संबंधित महानगरपालिकांच्या निवडणूकविषयक संकेतस्थळाचीही लिंक उपलब्ध आहे. याद्वारेही मतदारांना मतदारयादीतील आपले नाव शोधता येईल. तसेच या संकेतस्थळांवर प्रभागाचा नकाशा आणि अन्य तपशीलही उपलब्ध असल्याचे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
मतदारांना एसएमएसद्वारे माहिती

मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबतची माहिती 56677 क्रमांकावर मिळू शकेल. प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र कोड तयार करण्यात आले असून मुंबई- mcgm, पुणे- pmc, नागपूर- nmc, पिंपरी-चिंचवड- pcmc, नाशिक- nsmc, अकोला- akmc, अमरावती- ammc, सोलापूर- smc, ठाणे- tmc आणि उल्हासनगर- umc इ.

माहिती मिळविण्यासाठी मतदाराचे नाव आणि वय इंग्रजीत टाइप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. उदा. voter <स्पेस> mcgm <स्पेस> rahul ramcjandra rane <स्पेस> 35 असे टाईप करून 56677 क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास माहिती मिळेल.

गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान

सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चार्मोशी आणि मुलचेरा या 8 तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी पूर्वनियोजनानुसार 7 फेब्रुवारीस मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जि. प. गटांसाठी आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार 12 फेब्रुवारीस मतदान होईल. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकाच दिवशी 14 फेब्रुवारी 2012 रोजी मतमोजणी होईल.

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली- ता. 10: पाकिस्तानमधील आयएसआय या एजन्सीला माहिती पुरविण्याचा आरोप ठेवून निलंबित करण्यात आलेल्या भारतीय दूतावासातील अधिकारी माधुरी गुप्ता यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारी (ता. 10 जानेवारी) 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुप्ता यांना 22 एप्रिल 2010 रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली होती. श्रीमती गुप्ता यांनी 20 महिने तुरुंगवास भोगला आहे. न्यायालयाने त्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडण्यास मनाई केली असून कोणत्याही साक्षीदारीशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्यास देखील मनाई केली आहे.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

सिडकोचे शुक्रवारी (ता. 6) होणारे पारितोषिक वितरण पुढे ढकलले

मुंबई, ता. 5 - सिडकोतर्फे उद्या पनवेल नवी मुंबई येथे होणारे विविध गुणवत्ता यादीतील इ. दहावी, बारावी, सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण पुढे ढकलण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सिडकोतर्फे अनंतसिंग राजपूत यांनी कळविले आहे.

जळगाव येथे शुक्रवारी पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

जळगाव, ता. 5 - येथे शुक्रवारी (ता. 6) पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बळीराम पेठेतील जळगाव पत्रकार संघात सकाळी दहा वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, मा. रविराज गंधे मार्गदर्शन करतील.

मुंबई येथे 15 जानेवारीला छात्रभारतीतर्फे एक दिवसीय कार्यशाळा

मुंबई, ता. 5 - मुंबई येथे रविवारी (ता. 15) छात्रभारतीतर्फे युवकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली आहे. सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत तळमजला, पोयाबावडी म्युनिसिपल स्कूल, कामगार मैदानाजवळ, केईएम समोर, परळ, मुंबई येथे हे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मार्गदर्शन करतील.

नाटक, सिनेमा, मालिका, वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रसासकीय संधी आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान आदी विषयांवर यावेळी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमं खुणावताहेत या विषयावर सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे, तरुण मित्रांनो - कपिल पाटील (शिक्षक आमदार), मनोरंजनाची न्यारी दुनिया - सचिन गोस्वामी (मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक), चला प्रशासकीय सेवेत - हाजी जतकर (उपायुक्त विक्रीकर), दिल्ली हादरवणारा फकीर - राजा कांदळकर (लेखक, पत्रकार), समारोप: आपण कोण? - ऍड. अरुण दोंदे (अध्यक्ष छात्रभारती) आदी मान्यवर मार्गदर्शन करतील. कार्यशाळेत प्राध्यापक देखील सहागी होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी प्रा. जयवंत पाटील, प्रा. ईश्वर आव्हाड (9870329155), प्रा. उत्कर्षा मल्या, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. सुरेश कोकीतकर, प्रा. लिना पगारे, प्रा. सुदाम वाघमारे, प्रा. चंद्रभान लांडे, भूषण वर्धमाने (9224762024), नेहा पांचाळ, सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

आचारसंहितेसंदर्भात तक्रारी महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे कराव्यात- निवडणूक आयोग

मुंबई, ता. 4 - आचारसंहिता संदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

राज्यातील 10 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषदा आणि 309 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याबाबत अनेक तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांकडे आणि आयोगाच्या कार्यालयाकडे करण्यात येत आहेत. त्याऐवजी महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे सादर कराव्यात, तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भातील तक्रारी असल्यास त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे द्याव्यात, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी आवाहन केले आहे.

अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा- कलाम

भुवनेश्वर, ता. 4 - अद्वितीय व्हा आणि चांगला विचार करा तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यात स्वतःस झोकुन द्या. असे आवाहन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आज येथे शाळेच्या विद्यार्थ्यांना केले. येथील केआयआयटी विद्यापीठाच्या प्रांगणात 99 व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनकार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पाच दिवस (7 जानेवारीपर्यंत) चालणाऱ्या या कार्यक्रमात नोबेल विजेत्यांसह 15,000 प्रतिनिधींपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यावेळी श्री. कलाम म्हणाले की युवकांनी आपल्या स्वप्नातील कल्पनेनुसार कार्य करावे. सध्याचा काळ जोखीम पत्करण्याचा आहे. येणाऱ्या पीढीचे भविष्य उज्ज्वल असून त्यांचीही विशिष्ट स्वप्न आहेत. कठोर परीश्रम करा आणि सर्व समस्यांचे निराकरण स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. चांगली पुस्तकं लिहा, चांगला माणूस बना आणि आपला मित्र वाटावा असे चांगले शिक्षक व्हा, असेही श्री. कलाम म्हणाले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की विज्ञानासाठी भरपूर पैसा लागतो आणि पैसा हा राजकारण्यांकडून येतो.

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली 1 फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी असेल. 4 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची मतदारनिहाय यादी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊन दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होऊ शकते.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयात)-
अ वर्ग महानगरपालिका (मुंबई) 1,35,000 वरून 5,00,000
ब वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर) 1,00,000 वरून 4,00,000
क वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- 1,00,000 वरून 4,00,000.
ड वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) 1,00,000 वरून 3,00,000
जिल्हा परिषदा- 60,000 वरून 3,00,000
पंचायत समित्या- 40,000 वरून 2,00,000

मतदारांच्या सोयीसाठी-

राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी.
उर्वरित महानगरपालिका, जि.प., पं. समितीसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या 800
रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
अंध, अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
आता मार्करपेनने मतदाराच्या बोटावर निशाणी
आधार कार्ड - सुद्धा चालणार
प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास मनाई.

जिल्हा परिषद/पंचायत समित्या निवडणूका
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास 18 जानेवारीपासून सुरवात होईल व 23 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. छाननी व वैध उमेदवार यादी 24 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

सोमवार, २ जानेवारी, २०१२

सचिन...सिडनी येथे महाशतक झळकण्याची अपेक्षा!

क्रिकेट जगताचा बादशहा...अगदी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवणारा सचिन क्रिकेट खेळण्यासाठी कोणत्याही देशात गेला, तरीही मैदानावर जाताना मॅचचे प्रत्यक्ष वर्णन करणाऱ्यापासून अम्पायरसुद्धा खुश होणारच. शतकाचे महाशतक झळकवण्यासाठी योग्य संधीच्या शोधातल्या सचीनने गेल्या काही दिवसात संयम मात्र अजिबात सोडला नाही. सिडनी येथे सचिनचे हे शतक नक्की झळकणार असल्याची अपेक्षा अनेक चहाते व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आजपर्यंतचे खेळाडू पाहिले तर या सगळ्यांची उंची जेमतेमच असल्याचे सहज जाणवते. सर ब्रॅडमन, रिकी पॉइंटिंग, सुनिल गावस्कर ही नावं यासाठी लगेच डोळ्यासमोर येतात. यांची उंची कमी असली तरीही शारीरिक आणि बौद्धिक उंची फारच उंच आहे. तिथपर्यंत पोहोचायला अजून अनेकांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...