मुख्य सामग्रीवर वगळा

मतदार यादीसंदर्भातील हरकती 12 जानेवारीपासून स्वीकारणार- आयोगाची हेल्पलाईन

मुंबई, ता. 11- महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीसंदर्भातील हरकती आणि सूचना संबंधित महानगरपालिकेत 12 ते 17 जानेवारी 2012 या कालावधीत स्वीकारल्या जाणार आहेत. निवडणूक होत असलेल्या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांसाठी 9225320011 या क्रमांकावर हेल्पलाईनची आणि 56677 या क्रमांकावर एसएमएसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे दिली.

येत्या 16 फेब्रुवारीस मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी 5 जानेवारी 2012 रोजी मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असून यावरूनच निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 12 जानेवारीस प्रसिद्ध केली जाणार आहे. यावर 17 जानेवारी 2012 पर्यंत संबंधित महानगरपालिका किंवा महानगरपालिकेने निर्देशित केलेल्या ठिकाणी मतदारांना हरकती व सूचना दाखल करता येतील. यानंतर 23 जानेवारीला प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जातील.

हेल्पलाईन आणि संकेतस्थळ

या दहा महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदार यादीतील आपले नाव, त्यासंदर्भातील तपशील आणि मतदान केंद्राबाबतची माहिती मिळविण्यासाठी 9225320011 या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घेता येईल. ही हेल्पलाईन सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत कार्यरत राहील.

आयोगाने निवडणुकांच्या दृष्टीने www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळही तयार केले आहे. येथे संबंधित महानगरपालिकांच्या निवडणूकविषयक संकेतस्थळाचीही लिंक उपलब्ध आहे. याद्वारेही मतदारांना मतदारयादीतील आपले नाव शोधता येईल. तसेच या संकेतस्थळांवर प्रभागाचा नकाशा आणि अन्य तपशीलही उपलब्ध असल्याचे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
मतदारांना एसएमएसद्वारे माहिती

मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबतची माहिती 56677 क्रमांकावर मिळू शकेल. प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र कोड तयार करण्यात आले असून मुंबई- mcgm, पुणे- pmc, नागपूर- nmc, पिंपरी-चिंचवड- pcmc, नाशिक- nsmc, अकोला- akmc, अमरावती- ammc, सोलापूर- smc, ठाणे- tmc आणि उल्हासनगर- umc इ.

माहिती मिळविण्यासाठी मतदाराचे नाव आणि वय इंग्रजीत टाइप करून 56677 या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यास आपल्याला माहिती मिळू शकेल. उदा. voter <स्पेस> mcgm <स्पेस> rahul ramcjandra rane <स्पेस> 35 असे टाईप करून 56677 क्रमांकावर एसएमएस पाठविल्यास माहिती मिळेल.

गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान

सुरक्षिततेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चार्मोशी आणि मुलचेरा या 8 तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी पूर्वनियोजनानुसार 7 फेब्रुवारीस मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जि. प. गटांसाठी आणि सिरोंचा या चार तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार 12 फेब्रुवारीस मतदान होईल. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी एकाच दिवशी 14 फेब्रुवारी 2012 रोजी मतमोजणी होईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.०० च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ शकतात. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू शकतात. याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल, रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड, ४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ ...

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.