गुरुवार, १४ एप्रिल, २०११

राज्यात 3 लाख 36 हजार किलोमीटर रस्तेविकासाचे उद्दिष्ट- भुजबळ

मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्याच्या रस्ते विकास योजना 1981-2001ची मुदत संपली असल्याने रस्ते विकासाचा पुढील 20 वर्षीय आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यानुसार 3,36,994 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत दिली.
सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागांच्या सन 2011-12च्या अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7880.71 कोटी रुपयांच्या 11 मागण्या मंजुरीसाठी असून यापैकी 3812.68 कोटी रुपयांच्या मागण्या योजनांतर्गत तर 4068.03 कोटी रुपयांच्या मागण्या योजनेतर असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
श्री. भुजबळ म्हणाले, राज्याच्या सन 2001-21च्या नूतन रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील 100 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किमान एका बारमाही रस्त्याने जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा आराखडा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 1,09,000 कोटी रुपये एवढया निधीची आवश्यकता भासणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेतून उपलब्ध होणारा अल्प निधी विचारात घेता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाबार्ड कर्जसहाय्य, केंद्रीय मार्ग निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन समिती इत्यादी योजनांच्या माध्यमातून तसेच खाजगीकरणाच्या माध्यमातूनही जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सन 2011-12मध्ये रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये एकंदरीत 2749 कोटी रुपयांचा नियतव्यय प्राप्त झाल्याची माहिती देऊन श्री. भुजबळ म्हणाले की, या निधीमधून केंद्रीय मार्ग निधीसाठी 435 कोटी रुपये, नाबार्डसाठी 500 कोटी रुपये, खाजगीकरणातील शासन सहभागासाठी 150 कोटी रुपये, राज्यमार्गावरील कामांकरिता 795 कोटी रुपये, जिल्हा व इतर कामांसाठी 706 कोटी रुपये, साकवांसाठी 17.76 कोटी रुपयांची तसेच राज्य रस्ते विकास महामंडळासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. विभागाच्या निवासी इमारतींसाठी 22.96 कोटी आणि शासकीय इमारती, विश्रामगृहे यांच्यासाठी 104 कोटी अशी एकूण 127 कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची माहिती देताना श्री. भुजबळ म्हणाले, सध्या राज्यात 669 किलोमीटर लांबीची 2838 कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच 3049 किलोमीटर लांबीची 19,000 कोटी रुपयांची चौपदरीकरणाची कामे मंजूर अथवा प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सहापदरीकरणाची 413 किलोमीटर लांबीची 4762 कोटी रुपये किंमतीची कामे प्रगतीपथावर आहेत. यात सूरत-दहिसर, पुणे-सातारा-कागल राज्यहद्द, गोंदे-नाशिक-पिंपळगाव या कामांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 4327 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांपैकी 3478 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण वा सहापदरीकरण 21,937 कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. खाजगीकरणातून राज्यात 1923 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे 9305 कोटी रुपयांचे प्रकल्प नियोजन स्तरावर असून खाजगीकरणाच्या माध्यमातून जे प्रकल्प पूर्णत: सुसाध्य होत नाहीत, अशा 1262 किलोमीटर लांबीच्या 4736 कोटीच्या 15 प्रकल्पांमध्ये शासनाने आर्थिक सहभाग देण्याचे ठरविले आहे. यासाठी 1847 कोटी रुपयांचा एकूण निधी शासन सहभाग म्हणून मंजूर करण्यात आला असून यातील 854 कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाकडून प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 17 च्या कामाच्या प्रगतीविषयीही श्री. भुजबळ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील काम येत्या दोन महिन्यांत सुरू होणे अपेक्षित आहे. कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम मागे ठेवण्यात येणार असले तरी त्यावर आता भुयारी मार्गाच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू आहे. इंदापूर ते झाराप या टप्प्यातील मार्गाचा सुसाध्यता अहवाल येत्या महिन्याभरात मिळेल. त्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास एक वर्ष लागेल. झाराप ते पत्रादेवी या टप्प्यातील मार्गाचे काम समाधानकारकरित्या सुरू असून 183 कोटी रुपयांपैकी 157 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत.
राज्यात सप्तशृंगीगड व हाजी मलंग गड या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम लवकरच सुरू होणार असून जेजुरी गड आणि माहूर गड येथील कामांना लवकरच मंजुरी मिळणे अपेक्षित असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात सागरी महामार्गाच्या एकूण 786 किलोमीटर लांबीपैकी 759 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, या महामार्गावरील एकूण 51 पुलांपैकी 41 पुलांचे काम पूर्ण झाले असून 4 पुलांची कामे मंजूर झाली आहेत. उर्वरित सहा पुलांची व सुटलेल्या लांबीची (Missing Link) काम पूर्ण करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात बाणकोट, काळेश्री व धरमतर खाडी तसेच 10 किलोमीटर लांबीची मिसिंग लिंक असा एकूण 504 कोटी रुपये एवढया किंमतीचा प्रस्ताव नाबार्डकडे प्रस्तावित केलेला असून त्यापैकी बाणकोट खाडीवरील 297 कोटी रुपये किंमतीच्या कामास नाबार्डने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2440 कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामधून सुमारे 5171 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली आहे. 443 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत 435.50 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून त्यातून 850 किलोमीटर लांबीच्या रस्तेविकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाबार्ड कर्जसहाय्यित रस्ते विकासासाठी आतापर्यंत 2712 कोटी रुपयांचे कर्जसहाय्य प्राप्त झाले असून त्यातून 17,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

पर्यटनासाठी 215 कोटी रुपयांची तरतूद
राज्याच्या पर्यटन विकासासाठी यंदा 215 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी प्रादेशिक विकास योजनेसाठी 180 कोटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी 25 कोटी आणि केंद्र पुरस्कृत राज्य शासनाच्या सहभागासाठी 10 कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.
जगातल्या लक्झरी ट्रेनपैकी एक उत्कृष्ट म्हणून गणल्या जाणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या राज्यात पूर्ववत सहली सुरू होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून सात दिवसांच्या मोठया सहलींऐवजी दोन-तीन दिवसांच्या छोटया सहली चालविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
लोणार सरोवरात मंगळावरील विषाणूंप्रमाणे विषाणू सापडल्याची माहिती आजच प्रसिध्द झाली असून तज्ज्ञ समिती नेमून त्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
कोकणच्या पर्यटन विकासासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 225 कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला ही बाब खरी असली तरी येत्या वर्षभरात त्यातला जास्तीत जास्त निधी खर्च करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या 225 कोटी रुपयांमध्ये मुंबई व एमटीडीसीसाठी 33.5 कोटी, ठाणे जिल्ह्यासाठी 18.89 कोटी, सिंधुदुर्गसाठी 70.90 कोटी, रत्नागिरीसाठी 36.86 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी 24.60 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

भूकंपांमुळे जपानवर किरणोत्सर्गाचा धोका वाढतोय

११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर सावरण्याच्या बेतात असलेल्या जपानवर पुन्हा एकदा निसर्गाची कुर्‍हाड कोसळली आहे. एक महिन्याने म्हणजेच ११ एप्रिलला देखील येथे भूकंप झाला, परंतू ६.३ रिश्टर स्केल झाल्यामुळे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतू फुकूशिमा मधील किरणोत्सर्गाची पातळी दररोज वाढतच असून आता ७ झाली आहे. विविध अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये देखील किरणोत्सर्ग वाढल्यामुळे नागरीकांचा हा चिंतेचा विषय बनला आहे. विविध कार्यालयांमधील कर्मचार्‍यांची तपासणी देखील विशेष उपकरणांद्वारे करण्यात येत असून बाजारात सुद्धा उपकरणांच्या सहाय्याने भाज्यांची तपासणी केली जात आहे. अणूप्रकल्पाच्या सुमारे चाळीस किलोमीटर परीसरातील लोकांना आणखी दूर पाठविण्याचे नियोजन सरकार करणार आहे.

आता फक्त हल्ला...

26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारचाच हात असल्याची कबूली अमेरिकेत सध्या ताब्यात असलेल्या तहव्वूर हुसेन राणा याने दिली आहे. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तान सरकार आणि "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेच्या पुढाकाराने रचण्यात आले अशी कबूली राणा याने नुकतीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राणा याच्या विरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल खटला अमेरिकेच्या एका न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आपल्या बचावासाठी तो महत्वाची कागदपत्रं सादर करणार असून येत्या १६ मे स खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आतापासूनच उभारण्यात आली आहे.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

50th Anniversary of the first Human SpaceFlight (12 Apr. 1961)

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
युरी गागारिन
युरी अलेक्सेइविच गागारिन ९ मार्च, इ.स. १९३४ - २७ मार्च, इ.स. १९६८ हा सोवियेत संघाचा अंतराळयात्री होता.

युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

एप्रिल १२, इ.स. १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.

वयाच्या ३४ व्या वर्षी एका विमान अपघातात युरीचा मृत्यु झाला.
(सौजन्य- इंटरनेट)

सोमवार, ११ एप्रिल, २०११

महात्मा फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात सुमनांजली

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विधान भवनाच्या आवारातील पुतळ्याला आज मान्यवारानी सुमनांजलि वाहिली. विधान सभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह उपाध्यक्ष वसंत पुरके, मंत्री छगन भुजबळ, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री मधुकर चव्हाण, मुख्य सचिव अनंत कळसे आदी यावेळी उपस्थित होते.

'दै. विश्वरुप'च्या महात्मा फुले जयंती विशेषांकाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 11 एप्रिल :  महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील 'दै. विश्वरुप'ने काढलेल्या 'महात्मा' या विशेषांकाचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सकाळी प्रकाशन करण्यात आले. श्री. भुजबळ यांच्या 'रामटेक' निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, तरुण पिढीला महात्मा फुले यांच्या कार्याची महती व माहिती ज्ञात करुन देण्याच्या दृष्टीने 'दै. विश्वरुप'ने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या विशेषांकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संपादक सतीश धारप यांनी सांगितले की, 'दै. विश्वरुप'च्या या विशेषांकात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री सुनिल तटकरे, प्रा. हरि नरके, नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांचे लेख आहेत.

बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे ज्येष्ठ, जागरूक पत्रकार हरपला: भुजबळ

मुंबई, ता. ११ - ज्येष्ठ पत्रकार बाळ देशपांडे यांच्या निधनामुळे आपण एका जुन्या स्नेह्याला आणि वृत्तपत्रसृष्टी ज्येष्ठ जागरूक पत्रकाराला कायमची अंतरली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
बाळ देशपांडे हे पत्रकारितेच्या क्षेत्रातले दीपस्तंभासारखे व्यक्तीमत्व होते. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अनेक वर्षे सदस्य असलेल्या देशपांडे यांनी विविध वृत्तपत्रांमधून समतोल आणि अभ्यासपूर्ण लेखन केले. पत्रकारांच्या हक्काबद्दल ते अत्यंत जागरूक होते. त्यांच्या निधनामुळे तरूण पिढीला मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. भुजबळ म्हणाले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला शासनाकडून ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान


कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रतिष्ठानाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानला ४० लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गंगापूररोड वरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या वतीने कार्यवाह लोकेश शेवडे, उपाध्यक्ष रंजना पाटील व कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारला. यावेळी जिल्हाधिकारी पी.वेलरासू, उपविभागीय अधिकारी निलेश सागर, कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लोणारी, प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, विश्वस्त विनायक रानडे, उपकार्यवाह विनायक जोशी, आर्किटेक्ट संजय पाटील आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती पाटील यांनी यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना कुसुमाग्रजांच्या पुस्तकांचा संच भेट दिला तर श्री. लोणारी यांनी जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह पालकमंत्र्यांना देवून त्यांचे स्वागत केले.
महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथे महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रारंभ झाला. या अभियानाच्या निमित्ताने श्री. भुजबळ यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शेतकर्‍यांना शेत तळ्यासाठीच्या चेकचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी अभियानास शुभेच्छा दिल्या. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, व जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष मायावती पगारे, जिल्हाधिकारी पी.वेलरासू, येवला पंचायत समिती सभापती आर. डी. खैरनार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बापू काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कैलास मोते, निफाड व चांदवड येथील उपविभागीय कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Good Morning...सुप्रभातम् ।

9 एप्रिल 2011 ला धावत्या बसमधून ओझरनजीक सूर्योदयाचे मोबाईलद्वारे घेतलेले छायाचित्र

रविवार, १० एप्रिल, २०११

आधी हवेत...नंतर पोटात...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
इंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ..। सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..।
ओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातोटीला दाद दिली. सराफ्यामध्ये गेल्यानंतर जोशी यांचा दहीवडा न खाणे म्हणजे मंदीरात जाऊन घंटेला स्पर्श न करण्यासारखे आहे. दहीवड्यावर घालायचे दही तयार करताना दह्यासाठी साय काढली जात नसल्यामुळे हे दही सुद्धा चवीला मधुर लागते. मूग आणि उडिद यापासून तयार करण्यात येणाऱ्या या दहीवड्यात कोथिंबीर, जीरं, लवंग, तिखट, मिरची चवीनुसार घातली जाते...
(दर रविवारी, इंदूरच्या खवयैगिरीविषयी एखादा विषय देण्याचा मनोदय आहे...याबाबत आपल्याला काय वाटतं, ते कृपया आपली टिप्पणी (comment) लिहून प्रतिसाद द्या.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...