26/11 च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारचाच हात असल्याची कबूली अमेरिकेत सध्या ताब्यात असलेल्या तहव्वूर हुसेन राणा याने दिली आहे. मुंबई हल्ल्याचे कारस्थान पाकिस्तान सरकार आणि "आयएसआय' या गुप्तहेर संघटनेच्या पुढाकाराने रचण्यात आले अशी कबूली राणा याने नुकतीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राणा याच्या विरुद्ध मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल खटला अमेरिकेच्या एका न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. आपल्या बचावासाठी तो महत्वाची कागदपत्रं सादर करणार असून येत्या १६ मे स खटला सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था आतापासूनच उभारण्यात आली आहे.
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.