मुख्य सामग्रीवर वगळा

सुट्टीची भटकंती...(४)

घरी परतल्यानंतर थोडा वेळ टीव्ही पाहू म्हटलं...। पण तेवढ्यात वीज गेली...झालं...। ग्रामीण भागात सध्या जवळपास दहा तास दररोज वीज (भार-नियमन) जाते. ग्रामीण भागासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना कुठे जातात कुणास ठाऊक? बहुदा फक्त कागदोपत्रीच असाव्यात असं मला वाटतंय. शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजे...हे शासनाचं धोरण कुठे गेलं? आणि इतकी वीज घालवून ग्रामीण भागावर कितीतरी अन्याय केला जातोय. बिच्चारे शेतकरी बांधव...खरंच त्यांची कीव करावी असंच वाटतं. वास्तविक गरीब असो, की श्रीमंत...सगळ्यांना भूक तर लागतेच. सगळ्यांना दररोज जेवण लागतंच. केवळ महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशच कृषि अर्थातच शेतीसाठी ग्रामीण भागावर अवलंबून आहे. परिणामी शासनाने ही बाब गांभीर्याने इतके दिवस विचारात का घेतली नाही? वीजेचा तुटवडा काही एकदम होत नाही. आपल्याला एखादा मोठा आजार व्हायचा असेल तर शरीर जसे आधी सूचना देतं, त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नक्की मोठा असा आजार, विकार जडतो. अगदी तस्सच इथेही आहे, पण तसं झालं तर शासन आणि राजकारण काय ते? अशा नाना प्रश्नांचं काहुर माजलं. शेवटी विचार केला, मिस्टर कूल..होण्यातच सगळंकाही आहे. उगाच रागावून, संतापून काय उपयोग? म्हणतात नां, भले भले भागले..देव पूजेला लागले...।
मामाकडे इनव्हर्टर होतं, पण सतत वीज जात असल्यामुळे ते सुद्धा पुरेसं चार्ज होत नव्हतं. बिच्चारा..करणार काय? मामीने कंदील आणि मेणबत्त्या लावल्या...नेमका गॅसही संपला. त्यामुळे स्टोव्ह वरच स्वयंपाक सुरू झाला. थोड्या वेळाने रटरट शिजणारा भात...मस्तपैकी आंबटगोडाचं वरण, बिबड्यांचा वास आला आणि सपाटून भूक लागली. सोबत काकडी, टोमॅटो होतेच. जेवणं झाली। ओसरीवर मामा-मामी बरोबर गप्पा मारत बसलो. पण तिथेही व्यत्यय आलाच. काही क्षणातच डासोपंत चावरे यांचं पथक तिथे आलं आणि त्यांनी कानात गुणगुण सुरू केली. त्या दोघांपेक्षा मलाच डास जास्त चावत होते. एकतर, माझा रक्तगट A+ असल्यामुळे (अशा रक्तगटाच्या माणसांना डास जास्त चावतात असं म्हणतात किंवा नवीन ते सुद्धा शहरी माल वाटल्यामुळे) डासांनी मनसोक्त चावून पोट भरलं असावं. कुठून काय माहिती, वार्‍याची मंद झुळुक मधुनमधुन येत होती, त्यामुळे तरी डास उडत होते. रात्रीचे दहा केव्हा वाजले कळलंही नाही. साडेदहा वाजताच मी झोपलो...
(पुढे सुरू..पण उद्याच्या भागात...)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...