११ मार्च २०११ ला जपानमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपानंतर सावरण्याच्या बेतात असलेल्या जपानवर पुन्हा एकदा निसर्गाची कुर्हाड कोसळली आहे. एक महिन्याने म्हणजेच ११ एप्रिलला देखील येथे भूकंप झाला, परंतू ६.३ रिश्टर स्केल झाल्यामुळे त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. परंतू फुकूशिमा मधील किरणोत्सर्गाची पातळी दररोज वाढतच असून आता ७ झाली आहे. विविध अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ, फळभाज्या, पालेभाज्यांमध्ये देखील किरणोत्सर्ग वाढल्यामुळे नागरीकांचा हा चिंतेचा विषय बनला आहे. विविध कार्यालयांमधील कर्मचार्यांची तपासणी देखील विशेष उपकरणांद्वारे करण्यात येत असून बाजारात सुद्धा उपकरणांच्या सहाय्याने भाज्यांची तपासणी केली जात आहे. अणूप्रकल्पाच्या सुमारे चाळीस किलोमीटर परीसरातील लोकांना आणखी दूर पाठविण्याचे नियोजन सरकार करणार आहे.
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.