इंदूर म्हणजे मध्यप्रदेशचे पुणेच...इथेही खवैयेगिरीची अजिबात कमतरता नाही..देणाराने देत जावे..घेणाराने घेत जावे..या उक्तीप्रमाणे राजवाडा परीसरात जवळपास दररोज रात्रीचे चित्र दिसते. जसजसा सराफा बंद होण्याची वेळ जवळ येते तसतशी सराफा दुकानांपुढे विविध खाद्यपदार्थांची दुकानं थाटणे सुरू होते. मनच्युरिअन पासून अगदी पाणीपुरी, कचोरी, समोसा, खमण, मसाला डोसा, दहीवडा असे नाना पदार्थ समोर दिसल्यानंतर खाण्यासाठी कोणीही जीभेवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. खिशाचा आणि घशाचा अजिबात विचार न करता खाण्यासाठी हात सरसावतात. बस्स. हाता-तोंडाची गाठ..। सराफा परीसरात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या जोशी वडेवाल्यांच्या दुकानासमोर तर रीघ लागलेली असते. दहीवडा तयार करताना लहरीप्रमाणे हा वडा किमान पाच ते सहा फूट हवेत उडवून नंतर तळणासाठी तेलात बुडवला जातो. तयार झाल्यानंतर पट्टकन कोणाच्या पोटात नाही गेला, तरच नवल..।
ओमप्रकाश जोशी यांचे वडील रामचंद्र जोशी यांनी 1961 मध्ये कचोरीचे दुकान सुरू करून 1978 मध्ये दहीवडे तयार करणे सुरू केले. अल्पावधीतच चोखंदळ ग्राहकांनी सुद्धा त्यांच्या हाताला आणि वडा तयार करण्याच्या हातोटीला दाद दिली. सराफ्यामध्ये गेल्यानंतर जोशी यांचा दहीवडा न खाणे म्हणजे मंदीरात जाऊन घंटेला स्पर्श न करण्यासारखे आहे. दहीवड्यावर घालायचे दही तयार करताना दह्यासाठी साय काढली जात नसल्यामुळे हे दही सुद्धा चवीला मधुर लागते. मूग आणि उडिद यापासून तयार करण्यात येणाऱ्या या दहीवड्यात कोथिंबीर, जीरं, लवंग, तिखट, मिरची चवीनुसार घातली जाते...
(दर रविवारी, इंदूरच्या खवयैगिरीविषयी एखादा विषय देण्याचा मनोदय आहे...याबाबत आपल्याला काय वाटतं, ते कृपया आपली टिप्पणी (comment) लिहून प्रतिसाद द्या.