जल्लोष विजयाचा... |
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर विश्वचषक 2011 चा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाने आज अपेक्षेप्रमाणे खेळून अखेर देशाला विश्वचषक मिळवून देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. क्रिकेटचा जगज्जेता सचिन तेंडुलकर याचं विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण संघाने पूर्ण केले. प्रत्येक सामन्यातच अभूतपूर्व खेळणाऱ्या युवराजसिंह उर्फ युवी याला मॅन ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले. 1983 नंतर प्रथमच 2011 मध्ये भारत विश्वविजेता ठरला आहे.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पन्नास षटकात लंकेने 274 धावा करून विजयासाठी भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले. भारत आणि श्रीलंका संघात विश्वचषकासाठी चुरशीच्या स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय प्राप्त करून विश्वचषक मिळविला. वीरेंद्र सहेवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर, आता पुढे काय? असे वाटत असतानाच गौतम गंभीरने दमदार धावा करून भारताला सुस्थितीत नेले. तत्पूर्वी मुथैया मुरलीधर याच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात संगकाराच्या हातून झेल सुटल्याचा फायदा गंभीरने घेऊन दिवसीय सामन्यातले आपल्या 4,000 (चार हजार) धावा पूर्ण केल्या. विराट कोहली याने रणदिवच्या चेंडूवर चौकार मारून भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या. यानंतर 35 धावांवर कोहली खेळत असताना दिलशान याने त्याचा झेल घेतला. गंभीर 97 धावांवर खेळत असताना परेरा याच्या चेंडूवर तो बाद झाला.
सेहवाग, तेंडुलकर आणि कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. अत्यंत स्थिर बुद्धीने निर्णय घेण्यात सर्वश्रृत असलेल्या धोनीने आज खरोखर कर्णधाराला साजेशी खेळी खेळून अवघ्या 79 चेंडूंमध्ये 91 धावा पूर्ण केल्या. त्याला युवराजसिंग याने सुरेख साथ दिली. धोनी 91 धावांवर आणि युवराजसिंग 21 धावांवर नाबाद राहिले. विजयासाठी 40 धावांची गरज असतानाच देशात भारताचा विजय निश्चित झाला आणि नागरिकांनी बाहेर पडून आतषबाजी करण्यास सुरवात केली.
विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न साकार- सचिन
आपल्या शंभर धावांची शंभरी गाठण्याचं स्वप्न साकार झालं नाही याचं दुःख वाटलं, परंतू विश्वचषक मिळवण्याचं आपलं स्वप्न धोनी आणि सहकाऱ्यांनी पूर्ण केल्याचा आनंद सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला. आपल्या कारकीर्दीत आजचा दिवस सगळ्यात आनंदाचा आणि महत्त्वाचा असल्याचं सचिनने म्हटले आहे.
महिनाभरापासूनच तयारी- धोनी
टीम इंडियाचे 28 वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झालं असून गेल्या महिनाभरापासूनच आम्ही विश्वचषक जिंकण्याची तयारी करत होतो. सचिन सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन आणि अगदी ड्रेसिंग रूम, रेस्ट रूम, मैदानात देखील आम्ही सतत विश्वचषक मिळवण्याची चर्चा आणि नियोजन करत होतो त्याचा फायदा झाल्याचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सांगितले.
हा विश्वचषक मिळण्यात सर्व चहाते, मार्गदर्शक यांच्या शुभेच्छा असल्याचे हरभजनसिंग आणि विराट कोहली याने सांगितले.
दरम्यान विश्वचषक जिंकल्यानंतर हरभजनसिंग आणि युवराज यांनी आपल्या आनंदाश्रृंना विश्वचषक पाहण्यासाठी बाहेर येण्यास वाट मोकळी करून दिली.
प्रत्येक खेळाडूस 1 कोटी
बीसीसीआय कडून भारतीय संघातील प्रत्येकाला एक कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला छत्तीसगड रत्न पुरस्कार तसेच भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला एक प्लॉट देण्यात येणार आहे.
रात्री उशीरापर्यंत देशात ठिकठिकाणी नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन विश्वचषक जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते.