सर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार? मुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू नका!
मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.