मुख्य सामग्रीवर वगळा

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ



मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला.
विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणास सर्वच संबंधितांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
यापुढील काळात राज्याची आर्थिक प्रगती खऱ्या अर्थाने साधावयाची झाल्यास सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (पी-पी-पी) पर्याय नसल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ म्हणाले की, केवळ शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून पायाभूत सुविधा विकासाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेणे आणि विहित मुदतीत पूर्ण करणे अशक्य असते. त्यामुळे 'पीपीपी' तत्त्वावर प्रकल्प उभारणेच अधिक उपयुक्त ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 2749 कोटींची तरतूद करण्यात आली असताना अजघडीला राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून राहिल्यास यातला एखादा प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत 'एमईडीसी' व 'एलएआय' यांच्यात 'आर्थिक विकासासाठी जमिनीचा वापर' यासंदर्भात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला निश्चितपणे लाभ होईल, अशी आशा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुरवातीला 'एमईडीसी'चे अध्यक्ष विठ्ठल कामत यांनी प्रास्ताविक केले. अमेरिकन कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिकविषयक प्रमुख रॉबर्ट कार्लसन यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमास 'एलएआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरन सिएरॅकी, राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी, एमईडीसीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. डॉ.सी.एस. देशपांडे यांनी आभार मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धुळे ,नंदुरबार व अकोला जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान- आज मतमोजणी

मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांची मुंबई भेट...

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व...