सोमवार, ४ एप्रिल, २०११

गोव्यात इतर मागासवर्गीयांसाठी 27 टक्के आरक्षण लागू झालेच पाहिजे

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
म्हापसा, गोवा, दि. 3 एप्रिल : गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये गोव्यात इतर मागासवर्गीय समाजघटकांचे आरक्षण सध्याच्या 19 टक्क्यांवरुन वाढवून 27 टक्के करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आज येथे केली. ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावून धरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा गोव्यातील पहिलाच मेळावा येथील बोडकेश्वर मंदिराच्या मैदानावर झाला. सुमारे पाच हजार समता सैनिकांची उपस्थिती लाभलेल्या या मेळाव्यास गोव्यातील विविध लहानमोठया सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
समता परिषद ही पूर्णत: पक्षविरहित काम करणारी संघटना असून तिच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय या बहुजन मागासवर्गीय समाजघटकांच्या विकासासाठी लढले पाहिजे, एवढी एकच असल्याची बाब भाषणाच्या सुरवातीलाच श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केली. त्याचप्रमाणे जातिनिहाय जनगणनेची आपली मागणी सुध्दा राजकीय हेतूने प्रेरित नसून ती सामाजिक उध्दारासाठीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही इतर मागासवर्गीयांची जनगणना होत नसल्यामुळे त्यांच्या विकासासाठी कोणताही विकास कार्यक्रम राबविणे अशक्य असल्याचा अभिप्राय 11व्या वित्त आयोगाच्या अहवालामध्ये नोंदविण्यात आला आहे. केवळ लोक संख्येचा आकडा माहिती नाही म्हणून इतर मागासवर्गीयांसाठी योजना आखणे, धोरण राबविणे, आर्थिक तरतूद करणे या गोष्टी अशक्य बनत आहेत. त्यामुळे इतर मागासवर्गीयांचा खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधावयाचा असेल तर जनगणनेशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आपण ही मागणी लावून धरली आणि केंद्राला तसा निर्णय घेण्यास भाग पाडले, असेही त्यांनी सांगितले.
इतर मागासवर्गीयांना शिक्षणाबरोबरच खाजगी उद्योगांत, न्यायव्यवस्थेत आणि विधानसभा व लोक सभेतही आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठीही समता परिषद आग्रही असल्याचेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. बहुजन समाजाने आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी प्रस्थापितांविरोधात एकजुटीने लढा उभारण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी गोव्याचे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसूझा यांनी बहुजन समाजाच्या उध्दारासाठी आपण भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची ग्वाही दिली.
गोव्याचे पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनीही बहुजनांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या समता परिषदेने गोव्यात बहुजनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. भुजबळ यांचे आभार मानले.
गोव्याचे पंचायत व क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी फुले, आंबेडकर नसते तर आपण कधीही नगरसेवक, आमदार, मंत्री झालो नसतो, असे सांगितले. यापुढेही आपण पदावर असू अगर नसू, पण समाजाच्या उध्दारासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
समता परिषदेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी बहुजनांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद यांनी समता परिषदेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
यावेळी बिहारचे खासदार उपेंद्र कुशवाहा, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, बापू भुजबळ, गोव्याचे माजी मंत्री काशीनाथ जल्मी, चंद्रकांत चोडणकर, बापू मडकईकर, दत्ताराम चारी, सखाराम कोरगावकर, महादेव जाधव, सुभाष कलगुटकर, लक्ष्मण कवळेकर, नारायण कामत आदी उपस्थित होते. 

रविवार, ३ एप्रिल, २०११

विश्वचषक अपेक्षेनुसार भारताकडे- सचिनचं स्वप्न साकार



जल्लोष विजयाचा...

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर विश्वचषक 2011 चा प्रबळ दावेदार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारतीय संघाने आज अपेक्षेप्रमाणे खेळून अखेर देशाला विश्वचषक मिळवून देण्यात कुठलीही कसर सोडली नाही. क्रिकेटचा जगज्जेता सचिन तेंडुलकर याचं विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि संपूर्ण संघाने पूर्ण केले. प्रत्येक सामन्यातच अभूतपूर्व खेळणाऱ्या युवराजसिंह उर्फ युवी याला मॅन ऑफ द टूर्नामेंट घोषित करण्यात आले. 1983 नंतर प्रथमच 2011 मध्ये भारत विश्वविजेता ठरला आहे.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पन्नास षटकात लंकेने 274 धावा करून विजयासाठी भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य ठेवले. भारत आणि श्रीलंका संघात विश्वचषकासाठी चुरशीच्या स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय प्राप्त करून विश्वचषक मिळविला. वीरेंद्र सहेवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर, आता पुढे काय? असे वाटत असतानाच गौतम गंभीरने दमदार धावा करून भारताला सुस्थितीत नेले. तत्पूर्वी मुथैया मुरलीधर याच्या चेंडूवर चौकार मारण्याच्या प्रयत्नात संगकाराच्या हातून झेल सुटल्याचा फायदा गंभीरने घेऊन दिवसीय सामन्यातले आपल्या 4,000 (चार हजार) धावा पूर्ण केल्या. विराट कोहली याने रणदिवच्या चेंडूवर चौकार मारून भारताच्या 100 धावा पूर्ण केल्या. यानंतर 35 धावांवर कोहली खेळत असताना दिलशान याने त्याचा झेल घेतला. गंभीर 97 धावांवर खेळत असताना परेरा याच्या चेंडूवर तो बाद झाला.
सेहवाग, तेंडुलकर आणि कोहली बाद झाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आला. अत्यंत स्थिर बुद्धीने निर्णय घेण्यात सर्वश्रृत असलेल्या धोनीने आज खरोखर कर्णधाराला साजेशी खेळी खेळून अवघ्या 79 चेंडूंमध्ये 91 धावा पूर्ण केल्या. त्याला युवराजसिंग याने सुरेख साथ दिली. धोनी 91 धावांवर आणि युवराजसिंग 21 धावांवर नाबाद राहिले. विजयासाठी 40 धावांची गरज असतानाच देशात भारताचा विजय निश्चित झाला आणि नागरिकांनी बाहेर पडून आतषबाजी करण्यास सुरवात केली.
विश्वचषक मिळवण्याचं स्वप्न साकार- सचिन
आपल्या शंभर धावांची शंभरी गाठण्याचं स्वप्न साकार झालं नाही याचं दुःख वाटलं, परंतू विश्वचषक मिळवण्याचं आपलं स्वप्न धोनी आणि सहकाऱ्यांनी पूर्ण केल्याचा आनंद सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला. आपल्या कारकीर्दीत आजचा दिवस सगळ्यात आनंदाचा आणि महत्त्वाचा असल्याचं सचिनने म्हटले आहे.
महिनाभरापासूनच तयारी- धोनी
टीम इंडियाचे 28 वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झालं असून गेल्या महिनाभरापासूनच आम्ही विश्वचषक जिंकण्याची तयारी करत होतो. सचिन सारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन आणि अगदी ड्रेसिंग रूम, रेस्ट रूम, मैदानात देखील आम्ही सतत विश्वचषक मिळवण्याची चर्चा आणि नियोजन करत होतो त्याचा फायदा झाल्याचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सांगितले.
हा विश्वचषक मिळण्यात सर्व चहाते, मार्गदर्शक यांच्या शुभेच्छा असल्याचे हरभजनसिंग आणि विराट कोहली याने सांगितले.
दरम्यान विश्वचषक जिंकल्यानंतर हरभजनसिंग आणि युवराज यांनी आपल्या आनंदाश्रृंना विश्वचषक पाहण्यासाठी बाहेर येण्यास वाट मोकळी करून दिली.
प्रत्येक खेळाडूस 1 कोटी
बीसीसीआय कडून भारतीय संघातील प्रत्येकाला एक कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला छत्तीसगड रत्न पुरस्कार तसेच भारतीय संघातील प्रत्येक सदस्याला एक प्लॉट देण्यात येणार आहे.
रात्री उशीरापर्यंत देशात ठिकठिकाणी नागरिक हातात राष्ट्रध्वज घेऊन विश्वचषक जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते.

शुक्रवार, १ एप्रिल, २०११

आला उन्हाळा...मुलांना सांभाळा...

सर्वत्र उन्हाळा सुरू झाला असून, काही भागात मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत तर काही ठिकाणी लवकरच लागणार आहेत. परिक्षा संपल्यानंतर पालक आणि मुलं दोघेही...सुटलो बुवा...असा सुटकेचा निश्वास सोडतात. मुलं सुद्धा दिवसभर खेळतात, हुल्लडबाजी करतात, मस्ती करतात, मामा, काका, आजोळी जाण्याचे प्लॅन होतात आणि जातात. मुलांचं हे वयंच खेळण्याचं आहे, त्यांना बिनधास्त खेळू द्या, त्याशिवाय त्यांच्या शरीराची चांगली वाढ कशी होणार? मुलांना अगदी माती, रेतीतही खेळू द्या, किंबहुना क्रिकेट खेळताना चेंडू घाणीच्या ठिकाणी पडला तरीही तिथून चेंडू काढू द्या...फक्त यानंतर घरात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायला सांगा आणि तशी खात्री करा. दुपारी खेळताना सावलीत अथवा घराच्या पडवीत, ओसरीवर, वाड्यात सावली देणार्‍या झाडाखाली बसून खेळायला, शक्यतो बैठे खेळ खेळायला सांगा. अनेक मुलांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याचा त्रास सुद्धा होतो, यासाठी मात्र तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या..उन्हाळ्यात बाजारपेठेत येणारी टरबूज, खरबूज, आंबा, संत्री, मोसंबी अशी वेगवेगळी फळं नक्की द्या...आपण स्वतः सुद्धा मुलांबरोबरच उन्हापासून बचावाची काळजी घ्यायला विसरू नका!

रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार


मुंबई, ता. १ - शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्री दहा तास अखंडितपणे वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंबंधातील विरोधकांच्या शंकांचे निरसन करताना अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीच्या हातात अर्थ आणि उर्जा खाते असल्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांचे हित बघणारे आहे. शेतकर्‍यांना काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करता यावी याकरिता त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दर, तर ५० हजार ते ३ लाख रुपयांपर् यंत फक्त २ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. राज्यातील भारनियमन संपून वीजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी जैतापुर सारख्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करताना त्यामध्ये राजकारण आणणे गैर आहे.

राज्याने ओव्हरड्राफ्ट घेतला आहे, या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाचे खंडन करताना ते म्हणाले की, आघाडी शासनाने २००५ सालानंतर एकदाही ओव्हरड्राफ्ट घेतला नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती युतीच्या काळापेक्षा चांगली आहे. राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात दिलेला शब्द मार्च २०१२ पर्यंत पूर्ण करता आला पाहिजे ही त्यापाठीमागची भूमिका आहे. राज्याने मागील वर्षाची महसूली तूट भरून काढल्यामुळेच यावर्षी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करू शकलो आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचा गाडा योग्य दिशेने हाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील विकासाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी मागासलेल्या तालुका आणि जिल्ह्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. वार्षिक जिल्हा आराखड्याला वाढीव निधी देण्यात आला आहे. आमदारांचा विकास निधी देखील दीड कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपये करण्यात आला आहे.

गुरुवार, ३१ मार्च, २०११

आता लक्ष लंकेला विरुद्ध विजयी गुढी उभारण्याचे...

टीम इंडिया ने विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या पाकिस्तान संघाला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश करून संपूर्ण क्रिकेट विश्वातून वाहवा मिळवली आहे. आता येत्या २ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला हरवून हिंदू नववर्षाच्या सुरवातीपू्र्वीच विजयाची गुढी उभारण्याची अपेक्षा आणि सप्तरंगी स्वप्न चाहत्यांनी रंगविले आहे.
पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळताना आपले शंभरावे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे थोडी निराशा पदरी पडलेला सचिन अंतिम सामन्यात हे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून नववर्षाची भेट देईल असा विश्वास देखील क्रिकेटच्या विश्वासह जनसामान्यांना वाटत आहे.

भारतीय संघाची कामगिरी अभिमानास्पद: अजित पवार

मुंबई, ता. ३० - पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार्‍या भारतीय संघाचे अभिनंदन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत संघभावनेच्या आधारे भारतीय संघाने विजयश्रीला गवसणी घातली. भारतीय संघाच्या विजयामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत इतिहास रचून विजयाची गुढी उभारावी, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, पाकिस्तानच्या संघावर विजय प्राप्त करून अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या भारतीय संघाच्या या विजयामुळे रात्री अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. पुणे शहरात अनेक उपनगरांमध्ये दिवसभर शुकशुकाट असणारे प्रमुख रस्ते रात्री दिवस उजाडल्याप्रमाणे नागरिकांच्या गर्दीने फुलले होते.
ठंडा...ठंडा..कूल..कूल झाल्यानंतर कुटुंबियांसह आईस्क्रीम खाणारे लोक दिसत होते.

बुधवार, ३० मार्च, २०११

दे घुमाके...स्पेशल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (ता.30) झालेला सामना पाहण्यासाठी अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती.

"माही" च्या सैन्याने नमविले "रन" भूमीत पाक ला...





पंजाबपुत्र आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या टीम इंडियाने आज मोहाली येथे पार पडलेल्या विश्वचषक 2011 च्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाशी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाकिस्तान संघाला 29 धावांनी गारद करून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 2 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात देखील भारतीय संघालाच अपेक्षित विजय मिळून भारतच विश्वचषक करंडक स्पर्धेचा अंतिम विजेता ठरेल असे भाकित आतापासूनच वर्तविण्यात येत आहे. आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकर शंभर धावांची शंभरी पूर्ण करण्यात असमर्थ ठरला असला, तरीही धावांच्या डोंगराच्या निकषावर सचिन याला आजचा सामनावीर घोषित करण्यात आले. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेत तरी सचिन आपली शंभर धावांची शंभरी पूर्ण करेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आज सचिन याला किमान तीन वेळा जीवदान मिळाल्याचा लाभ घेत सचिनने 85 धावा काढल्या.
आजही संपूर्ण देशात ठिकठिकाणी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात आली. अनेकांनी विश्वचषक अंतिम सामन्यासाठी फटाके आगाऊ आणून ठेवले आहेत. दरम्यान आजचा सामना अत्यंत महत्वपूर्ण मानला जात होता, विविध कार्यालयांमध्ये सामना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दुपारी एकनंतर अनेक कार्यालये ओस पडली होती, तसेच रस्त्यांवर अघोषित संचारबंदी सारखे चित्र दिसत होते.

मंगळवार, २९ मार्च, २०११

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।
IndiBlogger - The Largest Indian Blogger Community

भारत-पाक संघाच्या सामन्याची उत्कंठा वाढतेय क्षणाक्षणाला...

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी होणार असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यासाठी केवळ चोवीस तास (हे वृत्त लिहिपर्यंत) बाकी आहेत. भारताने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी गत विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच धूळ चाखल्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वातील क्रिकेटच्या चाहत्यांच्या भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत आणि पाकिस्ता यांच्यापैकी विजेता ठरणारा संघ अंतिम सामन्यात खेळेल हे निश्चित आहे. या सामन्याबद्दल संपूर्ण देशात वृत्तपत्र माध्यमांसह विविध प्रसार माध्यमे आणि सामान्यांची उत्कंठा देखील क्षणाक्षणाला वाढते आहे. अनेक ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयांमध्ये मात्र सुटी नसल्यामुळे कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला आहे. अनेक नोकरदारांनी तर हा सामना पाहण्यासाठी चक्क सुटी टाकली असून काही कर्मचारी ऐनवेळी कारण सांगून सुटी घेण्याच्या विचारात आहेत.
सचिन तेंडुलकर आपले शंभरावे शतक या सामन्यात पूर्ण करतो अथवा नाही, यावर सट्टेबाजी सुरू आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...