सोमवार, ७ मार्च, २०११

अर्जुनसिंग यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्याला मुकलो: अजित पवार

मुंबई, ता. ४ - माजी केंद्रीयमंत्री अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे आपण एका ज्येष्ठ नेत्याला मुकलो आहोत, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की अर्जुन सिंग प्रदीर्घ काळ देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी सांभाळून सामान्यांच्या हितास प्राधान्य दिले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून काम करताना देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दीर्घ काळ स्मरणात राहतील.

अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे मागासवर्गीयांचा भक्कम पाठीराखा हरपला: भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
मुंबई, दि. 4 फेब्रुवारी : ज्येष्ठ नेते अर्जुन सिंग यांच्या निधनामुळे देशातील अल्पसंख्य, मागासवर्गीय समाजाचा भक्कम पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, अर्जुन सिंग हे भारतीय राजकारणातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम करीत असताना केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांत इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यामध्ये त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांनी घेतलेल्या कणखर पुढाकारामुळेच मागासवर्गीय समाजाला हा लाभ होऊ शकला. अल्पसंख्य, मागासवर्गीय समाज याबद्दल नेहमीच अर्जुन सिंग यांचा ऋणी राहील, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे

शुक्रवार, ४ मार्च, २०११

लोणारप्रमाणेच राज्यात अन्यत्रही पुरातत्व विभागाने संवर्धनाचे काम करावे: भुजबळ

मुंबई, ता. ४ - लोणार सरोवर परिसरातील प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. तशाच तोडीचे काम राज्यातील अन्य ठिकाणीसुद्धा होणे अपेक्षित आहे, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात लोणार सरोवराच्या संवर्धनाबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन विभाग मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, सह-व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, पर्यटन उपसचिव राजीव निवतकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे औरंगाबाद सर्कलचे उपअधिक्षक ए. एम. व्ही. सुब्रह्मण्यम्, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी रामस्वामी तसेच सार्व. बांधकाम व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणार सरोवराच्या पर्यटनदृष्ट्या विकासाबाबतही आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) यांच्याकडून सरोवरात लोणार शहरातून जाणारे सांडपाणी रोखण्याबाबत सविस्तर अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सरोवराभोवती चेन-लिंक फेन्सिंग करण्यात यावे, परीसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या पिसाळ बाभळीच्या झाडांची समूळ तोडणी शक्य नसली तरी किमा न छातीएवढी कापणी वनखात्याच्या परवानगी करण्यात यावी, अशी सूचनाही श्री. भुजबळ यांनी केली. लोणार अभयारण्यातून जाणारा लोणार-मंठा रस्ता अंतर कमी होण्याच्या दृष्टीने लोणारा-पांग्राडोळे शिव ते देऊळगाव कुडपाळ फाटा ते मंठा असा बायपास करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. लोणार सरोवर परिसरातील प्रस्तावित भूसंपादनातील शेतीसंबंधी कास्तकारांना अधिकाधिक मोबदला देण्याच्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
जगातील उल्कापात-निर्मित सरोवरांच्या ठिकाणी विकसित केलेल्या सुविधांचा अभ्यास करा
लोणार परिसर विकासाची ही चर्चा अत्यंत प्राथमिक असून जगात अशा प्रकारे उल्का पडून निर्माण झालेली मोजकी सरोवरे आहेत. त्याठिकाणी संबंधित देशांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या सोयीसुविधा विकसित केल्या आहेत, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे. लोणार येथे कोणत्या सुविधा निर्माण करता येऊ शकतील, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवकालिन रायगड पुन्हा उभारण्यासाठी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार: भुजबळ

मुंबई ता. ४ - शिवकालिन रायगड जसाच्या तसा उभारण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी केंद्रीयमंत्री, केंद्रीय सचिवांसह भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. याबाबत श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यासह त्यांनी रायगडखेरीज राज्यातील अन्य पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांच्या संवर्धनाच्या कामाबाबतही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

डाव्यांनी फुलेंचा शेतर्‍यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडे



मुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्‍यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...!
हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. यानंतर रंगलेल्या प्रकट मुलाखतीत प्रतिमा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वानखेडे यांनी आपल्या जीवनसंघर्षातील अनुभवाचे बोल ऐकवले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत वानखेडे यांच्या अभ्यासाला खुद्द पी. साईनाथ यांनी सलाम केला आहे. वानखेडे यांनी एस. एम. जोशी यांचे सहाय्यक म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. "पोळा हा सण साजरा करताना शेतकरी आपल्या शेतावर काम करणार्‍या गड्याला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो. आणि पोळ्याच्या आदल्या रात्री वर्षभर राबणार्‍या बैलाची खांदशेकणी करतो. खांदशेकणी बैलाच्या खांद्याला लोण्याने चोळले जाते. मात्र कर्जबाजारी झालेला शेतकरी आपण बैलाची खांदशेकणी वा गड्याला पुरणपोळीही खाऊ घालू शकत नाही, या दुःखानेच शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही संपलेल्या आंदोलनातून उत्पन्न झालेली 'सायलेंट मूव्हमेंट' " . या शब्दात त्यांनी भारत आणि इंडियातील विषमतेची दरी किती खोल आ हे हे दाखवून दिले.
या मुलाखतीत वानखेडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या माया यांनीही मेटीखेडा या आपल्या गावात ग्रामपंचायतीत सर्व महिला निवडून आणण्याच्या प्रयोगाची माहिती दिली.
उत्तम साहित्यकृती - डॉ. बापट
आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साहित्यिक डॉ. रवी बापट यांनी आपल्याला हे पुस्तक खूप आवडल्याचे सांगतानाच वानखेडे यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे टराटरा फाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. समाजात मोठे म्हणून मिरवणारे लोक हे ढोंगी आहेत. त्यांचे खरे रूप उघडकीस आणल्याशिवाय जनता जागरूक होणार नाही. असे म्हणत त्यांनीही नाव न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांचे वस्त्रहरण केले. "मार्क्सवादी भ्रष्ट झाला तर क्रूर होतो आणि गांधीवादी भ्रष्ट झाला की ढोंगी होतो" हे वानखेडे यांचे वाक्य सुभाषितच असल्याचे ते म्हणाले

उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ

ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख
मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.
सचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.
एचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

गुरुवार, ३ मार्च, २०११

कृषिधन...

हैदराबादच्या 'मॅनेज' या संस्थेतील विद्यार्थी संघास सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी सार्व. बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ ३० हजारांचा धनादेश प्रदान करताना..

मुंबईमध्ये वॅक्स म्युझियमच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य: भुजबळ



हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकास विनम्र अभिवादन...!



मुंबई, ता. २ - लंडनमधील मादाम तुसाँ वॅक्स म्युझियमच्या तोडीचे वॅक्स म्युझियम मुंबईमध्ये उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले.
लोणावळा येथील 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' चे आर्टिस्ट सुनील कंदल्लूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मेण पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ गिरगाव चौपाटीनजीकच्या इक्सिया इव्हेंट लाऊंजमध्ये श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, आपण स्वतः लंडन येथील मादाम तुसाँ म्युझियमला भेट दिली असून विविध देशांच्या महान व्यक्तींचे मेणाचे पुतळे असलेले हे म्युझियम पाहण्यासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात. तसे म्युझियम जगात कुठेही आपल्या पाहण्यात नाही. परंतू गेल्या आठवड्यात लोणावळा परीसरात कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असताना मुद्दाम 'सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम' भेट दिली आणि स्तंभित झालो. मादाम तुसाँ इतके हे म्युझियम भव्य नाही, मात्र सुनिल कंदल्लूर या कलाकाराची कामगिरी मात्र मादाम तुसाँ वॅक्स आर्टिस्टच्या तुलनेत कुठेही कमी नाही. त्या कलाकारांच्या तोडीचा हा कलाकार आपल्या देशात असल्याचा आपल्याला अभिमान आहे. तयार करण्यात आलेला हा पुतळा अत्यंत तेजस्वी आणि सजीव वाटत आहे. जणू काही छत्रपतीच या सभागृहात अवतीर्ण झाल्याचा भास होतो आहे. त्यांच्या पाणीदार डोळ्यांमधील तेज, धारदार नाक ही सारी वैशिष्ट्ये पुतळ्यात हुबेहुब उतरली आहेत. शिवरायांकडे पाहिल्यानंतर लोकांना आदरयुक्त जरब वाटते. तीच भावना या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर होत असून पाहणारा नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीच या पुतळ्याची वाखाणणी करून प्रशस्तीपत्रक दिले आहे. यामुळे कलाकाराच्या कामगिरीला दाद दिल्याखेरीज रहावत नाही.
                              मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण नाही- कंदल्लूर
आपण मेण-पुतळे तयार करण्याचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसून मादाम तुसाँ म्युझियमला भेटही दिलेली नाही. परंतू चमत्कार अथवा साक्षात्कार म्हणून आपण काम करून पुतळे साकारत गेलो. गेल्या १३ वर्षात घेतलेल्या परिश्रमांचे मिळालेले फळ म्हणजे छत्रपतींचा पुतळा आपल्या हातून साकारला गेला. या शब्दात भारावून गेलेल्या आर्टिस्ट कंदल्लूर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भुजबळ यांचाही मेण-पुतळा तयार करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रमुख रोहिदास लोखंडे, म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार उपस्थित होते. सूत्रसंचालन मोनाली कुलकर्णी यांनी केले.


कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...