मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

'नवीन पोपट' तयार होऊ न देणे 'यशवंतांसाठी' महत्वाचे...

मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळणार्‍या संशयित पोपट शिंदे याचा मृत्यू झाला. निर्ढावलेल्या भ्रष्टाचाराने आणि भ्रष्टाचारास पोसणार्‍यांच्या स्वैराचारामुळे पोपट शिंदेंप्रमाणेच नवीन भेसळ माफिये तयार होऊ न देणे, यशवंत सोनवणे यांच्यासारख्या चांगल्या शासकीय अधिकार्‍यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
नाशिक परिक्षेत्रातील मालेगाव जिल्ह्यातील पानेवाडी प्रकल्पाजवळ इंधनात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावरून यशवंत सोनवणे संबंधित ठिकाणी छापा मारण्यासाठी गेले होते. घडत असलेला भेसळीचा प्रकार गंभीर आणि त्याचे स्वरूप मोठे असलेले पाहून सोनवणे यांनी आणखी काही अधिकार्‍यांना पाचारण करण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. पोपट शिंदे याला समज देतानाच परिस्थिती आणखी चिघळली, यामुळे आणखी अधिकारी, कर्मचारी आवश्यक होते. दरम्यान, सोनवणे यांच्याशी झालेल्या बाचाबाची पोपट शिंदे आणि सहकार्‍यांनी सोनवणे यांच्या अंगावर इंधन टाकून त्यांना जीवंत जाळले. यात सोनवणे यांचा घटनास्थळीवरच मृत्यू झाला होता. शिंदे याला सोनवणे यांनी पकडून ठेवल्यामुळे तो देखील सुमारे सत्तर टक्के जळाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर सहा दिवसांनी सोमवारी (ता. ३१ जानेवारी) संशयित शिंदे याचा मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेमुळे शासन खडबडून जागे झाले (?) आणि ठिकठिकाणी भेसळ माफियांवर कारवाई करण्यात येऊन सुमारे दोनशे जणांना ताब्यात घेण्यात आले. मध्यंतरी पोपट शिंदे याच्या निकटवर्तीयांनी सोनवणे हे शिंदे याला पैशाची मागणी करत होते अशा आशयाची तक्रार दिली. काही क्षण ही तक्रार जरी ग्राह्य धरली, तरीसुद्धा पैसे, लाच मागणार्‍या अधिकार्‍याला, एखाद्या व्यक्तीस जीवंत जाळणे हे कोणत्या कायद्यात बसते? जाळणे अथवा जीवे मारणे हा काही अंतिम उपाय, समाधान नाही...। लाच, भ्रष्टाचार याबाबत न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे (मिळणारा न्याय विलंबाने मिळतो, हे वेगळे), मात्र अशा विभागांकडे धाव घेणे आवश्यक आहे.
या घटनेचा आणि अशा प्रकरणांचा थोडा अभ्यास करता, विविध बाबींची बीजे प्रथम शासन रोवते. डोईजड झाल्यानंतर राजकारण्याप्रमाणे कारवाई करायची, हे अनेकदा दिसून येते. म्हणतात नां, "ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात भत्ता"। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, मंत्रालयात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे नागरिकांच्या तक्रारींवरून जाणवते. एखाद्या मोठ्या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करायची, कालांतराने नागरिक विसरतात याची चांगली जाण असल्यामुळे नंतर सगळे थंडावते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस यशवंत सोनवणे यांनी जणू भ्रष्टाचार, भेसळ करणार्‍या माफियांविरुद्ध बलिदान दिले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे शासनात देखील चांगल्या, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी कार्यरत आहेत. सोनवणे यांना त्यातलेच मानले जाते. आपल्यापेक्षा जग मोठे असते आपण जगाच्या तुलनेत जमिनीवरून जाणार्‍या, भिंतीवरच्या मुंगीइतके छोटे असतो. बोटावर मोजण्याइतक्या चांगल्या प्रतिमेच्या लोकांमुळेच सारे काही ऑल ईज वेल.. सुरू आहे याची जाणीव शासनाला, लोकप्रतिनिधींना देखील असतेच. शिंदेंसारख्या व्यक्तीची पोच अगदी मंत्रालयापर्यंत असल्यामुळे शिंदेने Mr. Clean अशी प्रतिमा देखील कागदोपत्री तयार करवून घेतली होती. शिंदे याने मुलीचे लग्न सुद्धा जवळ असलेल्या काळ्या पैशाने अगदी थाटामाटात लावून देऊन मोठमोठ्या हस्तींना आमंत्रित केले होते, या हस्तींनी लग्नात हजेरी सुद्धा लावली होती. आपली पोच किती आहे हे कदाचित शिंदे याने या माध्यमातून दाखवून दिले असावे. अन्यथा केवळ वडा विकणारा, नंतर किराणा दुकान चालवणारा, ढाबा चालविणारा एखादा माणूस इतक्या थाटामाटात समारंभ आयोजित करणे सध्याच्या काळात तरी अशक्यप्राय आहे.
                                       वाट चुकलेला पोपट आयुष्याचीच वाट चुकला...
पोपट शिंदे आणि त्याची बहिण मनमाड नजीक वाट चुकले होते आणि यानंतर तो तिथेच स्थायिक झाला, असे त्याचे निकटवर्तीय सांगतात. वाट चुकलेल्या या पोपट शिंदे आयुष्यात चालण्याच्या सन्मार्गाचीच वाट चुकला. आपण करीत असलेल्या कृत्याचा पश्चात्ताप देखील पोपट याला झाला नसावा. अन्यथा आपल्या कुटुंबियांवर याचा काय परिणाम होईल? याचा विचार त्याने नक्कीच केला असता आणि सत्कृत्य करू शकला असता.
आता तरी शासनाने खरोखर जागे होऊन भ्रष्टाचार आणि भेसळ करणार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करावी. परिणामी भविष्यकाळात नव्याने तयार होणारे असले पोपट शिंदे सारखे माफिया, भ्रष्टाचार्‍यांना वेळीच पायबंद बसेल, हीच अपेक्षा!

भुजबळ यांना गौरवपत्र...

न्यूजर्सी (अमेरिका) येथील भारतीय रहिवासी आणि इंडियन लायन्स क्लबतर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांना गेल्या ऱविवारी मुंबई येथील रामटेक निवासस्थानी गौरवपत्र प्रदान करण्यात आले. अमेरिकेत गेल्या ४० वर्षांपासून स्थायिक असलेले प्रख्यात आर्किटेक्ट श्री. किशोर जोशी यांच्या हस्ते आणि श्रीमती अल्पना पेंटर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

सोमवार, ३१ जानेवारी, २०११

भुजबळ ठरले "सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट" विशेष पुरस्काराचे मानकरी

व्हिन्टेज ड्राइव्ह...आनंद लाँग ड्राइव्हचा...
मुंबई, ता. ३० - मंत्री जरी असलो तरीही आपण हरहुन्नरी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज सिद्ध करून दाखविले. येथे आयोजित 'व्हिन्टेज कार रॅली' चे उद्घाटन करून त्यांनी अचानक चक्क रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला. चालवायला अत्यंत अवघड असलेल्या १९४७ ब्युईक कन्व्हर्टिबल चे स्टेअरिंग अत्यंत सफाईदारपणे हाताळले तसेच रॅलीचे संपूर्ण अंतर व्यवस्थित पूर्ण केले. अशी रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच मंत्री ठरल्याने त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ ड्रायव्हर ठरल्याने त्यांना "द सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट टू ड्राईव्ह इन द व्हिन्टेज कार रॅली" या विशेष पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. हॉर्निमन सर्कल ते बांद्रा आणि तेथून पुन्हा परत असा मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता. श्री. भुजबळ यांनी हे अंतर पूर्ण केले.
या गाडीचे मालक नितिन दोसा यांनी ही कार चालविण्यास अत्यंत अवघड असून लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्याचे सांगितले. दरम्यान, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनतर्फे आयोजित रॅलीमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, एमटीएनएलचे व्यवस्थापक एस. पी. सिंग देखील सहभागी झाले होते. सुमारे १४७ प्रकारच्या दुर्मिळ व्हिन्टेज कार या रॅलीच्या निमित्ताने मुंबईत धावल्या.

मध्य प्रदेशात अजूनही थंडी

महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असला, तरीही मध्यप्रदेशात मात्र अद्याप थंडीचा जोर कायम आहे. दिवसा तापमान २४ ते २५ अंशांपर्यंत जात असून रात्रीचे किमान तापमान मात्र ८ ते ९ अंश असते. गेल्या आठवड्यात थंडी कमी होत आहे अशी चिन्हं असतानाच थंडी मात्र स्थिरावल्याचे चित्र आहे. थंडीमुळे लोकांनी पुन्हा जॅकेट्स, स्वेटर, कानटोपी, मफलर, मुलांना हँडग्लोज् घालणे सुरू केले आहे. शहरातील नागरी वस्त्यांमध्ये रात्री आठनंतर शुकशुकाट दिसतो.

रविवार, ३० जानेवारी, २०११

अति सर्वत्र वर्ज्यते...।

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. एका देशातून दुसऱ्या देशात क्षणात ज्या-त्या देशातल्या घडामोडी, घटना यांची प्रत्यक्ष माहिती समजू शकते. वैज्ञानिक विविध विषयांचा अभ्यास करून मानवाच्या हितासाठी, असाध्य रोगांवर तोडगा निघावा म्हणून विविध औषधे,लसींचा शोध लावत आहेत. भारत देखील यात तसूभर देखील मागे नाही. परंतू कोणत्याही बाबतीत मर्यादा ओलांडल्यास पुन्हा शून्यावर वेळ येऊन ठेपते. बंगलोर येथील एका संशोधन केंद्राने टायफॉईड संदर्भात अँटीबायोटिक म्हणून समजल्या जाणाऱ्या हळदीवर अर्थातच हळद या घटकावर संशोधन केले. हळदीचा वापर "अति" केल्यास हळदीच्या अती वापरामुळे माणसावर जीव गमावण्याची वेळ येते असे अनुमान काढल्याचे आजच (30 जानेवारी 11) एका इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर, अति सर्वत्र वर्ज्यते...। हा निसर्ग नियमच आहे, हे या संशोधकांना ठाऊक नसावे. अमृत जरी अति सेवन केले तरीसुद्धा त्याचेही विष तयार होते. हळदीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी कोणत्याही निष्कर्शावर पोहोचण्यापूर्वी, अनुमान काढण्यापुर्वी ज्येष्ठ, तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदाच्या ज्येष्ठांचा सल्ला, मार्गदर्शन घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. निसर्गाने मानव कल्याणासाठीच हळदीसारख्या विविध वनौषधींची निर्मिती केली आहे. स्थिर बुद्धीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केल्यास आणि ठरलेल्या मात्रेतच हळदीसारख्या वनौषधींचा वापर केल्यास अखिल मानवाचे कल्याणच होईल, किंबहुना "हल्दी" मुळे मानव "हेल्दी" आणि "वेल्दी" देखील राहील यात शंका नाही.

हेलमेट सक्ती किती 'सुरक्षित'...!

काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे.


दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आकारण्याची तरतूद देखील करण्यात आली. वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीस देखील हेलमेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी हेलमेट लावण्यापासून महिला वाहनचालकांना सूट देण्यात आली आहे. परंतु अनेक शहरांमध्ये हेलमेट सक्तीस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून दिसून येते.

हेलमेट लावून वाहन चालविले तरीसुद्धा व्हायचे ते अपघात होणारच...ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही! इंदूरनजीक गौतमपुरा-चंबळ मार्गावर नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेलमेट लावून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकास झालेल्या अपघातात या वाहनचालकाच्या डोक्याचे हेलमेटसह तुकडेतुकडे झाले. आयएसआय मार्क असलेले हेलमेट घातले असले तरीही तुकडे झालेच. कोणत्यातरी डंपरसारख्या अवजड भरधाव वाहनाने त्याला ठोस मारल्यामुळे बऱ्याच दूरपर्यंत हा वाहनचालक फरपटत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यावरून हेलमेट लावून वाहन चालविणे देखील किती सुरक्षित आहे, हेलमेट लावून वाहन चालविणे किती सुरक्षित, जीव वाचविण्यासाठी लाभप्रद ठरते हे विचार करण्यासारखे आहे.

केवळ हेलमेट लावून आणि सीटबेल्ट लावून वाहन चालविण्यापेक्षा दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनचालकांनी (शासकीय वाहनचलकांसह) वाहन भरधाव न चालविता विशिष्ट मर्यादित वेगात वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण नक्की कमी होईल. शासनाने देखील यावर गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल यात शंका नाही.

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची स्पर्धा अन्य देशांशी-भुजबळ

मुंबई, ता. २७ - राज्याने सुरवातीपासूनच औद्योगिक क्षेत्रात आघाडी मिळवली असून याबाबतीत राज्याची स्पर्धा देशातील अन्य राज्यांशी नव्हे, तर अन्य देशांशी असल्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे.
श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात १९८० मध्ये केवळ ४८६० लघुउद्योग होते. आज अशा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची संख्या ३ लाख ५ हजार ६१ इतकी आहे. या क्षेत्रात सुमारे ४३ लाख ६९ हजार २९९ लाख रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक झाली असून २३ लाख ८ हजार ९४४ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्यात लघु-मध्यम उद्योग अजूनही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या परिसरातच एकवटलेले दिसतात. अशा उद्योगांच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट वर भर देण्याची नितांत आवश्यकता असून या दृष्टीने ग्लोबल परिषदेत चर्चा होईल असा विश्वास श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.

केंद्राच्या पर्यटन विकास निधीचा महाराष्ट्राने पुरेपूर लाभ घ्यावा- सुबोधकांत सहाय

मुंबई, ता. २७ - आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून राज्यांना पर्यटन विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राने या निधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी आज येथे व्यक्त केले. कफ परेड येथील  वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्री. सहाय म्हणाले की, भारतात कृषि व कृषि आधारित प्रक्रिया उद्योगांना देखील मोठे भविष्य आहे. देशात सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स किंमतीची फळफळावळ, शेतमाल प्रक्रियेअभावी वाया जातात. आजमितीस आपण त्यापैकी केवळ सहा ते सात टक्के मालावरच प्रक्रिया करू शकतो. या पार्श्वभूमीवर लघु-मध्यम उद्योजकांना प्रक्रिया उद्योगातही गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
गेल्या दोन दशकात भारतीय उद्योगाने मोठी झेप घेतली असून यात लघु-मध्यम उद्योगांचे अमूल्य योगदान आहे. संपूर्ण भारतीय उद्योगाचे प्रतिबिंब या उद्योगांमध्ये दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीच्याही सर्वाधिक संधी आहेत. असे केंद्रीय उद्योगमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.
यावेळी राज्याचे पर्यटन व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पद्मश्री भवरलाल जैन, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्यूयॉर्कचे वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका आदी मान्यवर उपस्थित होते.

भवरलाल जैन यांना "जीवनगौरव"

मुंबई, ता. २७ - जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष व खानदेशचे भूमिपुत्र भवरलाल जैन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कफ परेड मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्ययॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर्स असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, बँक ऑफ इंडियाच्या एक्सपोर्ट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रंगनाथन आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका यांनी स्वागत व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज चे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी प्रास्ताविक केले.

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाईची गरज

मुंबई, ता. २७ - भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाई करण्याची गरज आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे.
मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना माफियांनी जाळून मारण्याच्या घटनेबद्दल श्री. भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. पेट्रोल-डीझेल भेसळ करणार्‍या माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना माफियांनी जाळून मारल्याचे समजताच श्री. भुजबळ यांनी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिककडे तातडीने प्रयाण केले.
भेसळ करणार्‍या माफियांचा प्रश्न खूप जुना असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह आपण अशा टोळ्यांची दहशत रोखण्याची गरज व्यक्त केली होती. या टोळ्या संपविण्यासाठी त्यांच्यावर भेसळ प्रतिबंधक पथकांकडून नव्हे, तर थेट पोलिसांकडूनच कारवाई होण्याची गरज आहे. कायद्याला आव्हान देणार्‍या व कायदा हातात घेणार्‍या या प्रवृत्तींवर 'मोक्का' सारखी कडक कारवाई केलीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...