बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

क्षण आनंदाचा...

...तर रायगड जसाच्या तसा उभारू! -भुजबळ

मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण विनंती केंद्र सरकारलाकेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे आगामी वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी देऊन पर्यटन क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था आणि तज्ज्ञांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन केलं. राज्यातील प्रचलित, अप्रचलित पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छता, पायाभूत सुविधा विकास करण्याबरोबरच योग्य मार्केटिंग करण्यावर आपला भर राहिल, असेही ते म्हणाले.
"केसरी गौरव सन्मान २०१०" पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. अजित फडके, कृषी क्षेत्रात अनेक यशस्वी प्रयोग करणारे कॅप्टन प्रकाश थोरात, 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून काश्मिरी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी धडपडणारे संजय नाहर, धावपटू कविता राऊत, 'टाटा नॅनो' च्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे गिरीश वाघ, अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा समावेश होता. रोख रूपये एक्कावन्न हजार आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं.

"सावित्रीचे सावित्रीपण" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई येथे मंगळवारी (ता. २१) प्रकाश धुळे यांच्या "सावित्रीचे सावित्रीपण" या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री सचिन अहिर, श्री. धुळे, नंदकुमार वाघ आदी.

उपमुख्यमंत्र्यांकडून पहिलवान बुचडे यांचे अभिनंदन

मुंबई, ता. २२- पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मानाचा "रुस्तम-ए-हिंद" किताब पटकावून सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी कामगिरी बजावलेल्या पहिलवान अमोल बुचडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काळात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्री. बुचडे यांनी ही कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे राज्यात कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाची भर पडून नवोदितांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या शब्दात श्री. पवार यांनी बुचडे यांचे अभिनंदन केले.

देशात पाचव्या पिढीची विमाने तयार होणार

भारत आणि रशियात नुकतेच विविध ३० करार झाले आहेत. यात प्रामुख्याने रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनीही रशियाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेच भर दिलेला दिसतो. दोन्ही देशांमध्ये येत्या दोन वर्षात सुखोई सारखीच लढाऊ विमानांची पाचवी पिढी तयार करण्याचा प्रस्ताव असून सन २०३० पर्यंत अशा प्रकारची सुमारे तीनशे विमाने तयार होतील. ही विमाने तिसर्‍या देशास दोन्ही देश मिळून विकणार आहेत. यापूर्वी अशाच प्रकारे ब्रह्मोस मिसाईल देखील तयार करण्यात आले आहे.
यासह अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातीस सहकार्याचा देखील महत्वपूर्ण करार करण्यात आला. भारतातील वैज्ञानिकांचे एक पथक लवकरच रशियात जाणार आहे. एक पथक यापूर्वीच रशियात दाखल झाले असून डिझाईन आणि संशोधन दोन्ही देशांच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे सुरू केले देखील आहे.

सिडकोतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न

मुंबई, ता. २२- नवी मुंबई येथील सिडको भवनमध्ये सिडकोतर्फे नुकताच नवी मुंबईतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक व शाळांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, शिक्षण हा एक यज्ञ असून त्यात आपल्या श्रमाची आहुती टाकल्यानंतर त्यातून येणारी निष्पत्ती ही देशाचे भाग्य असते. गुणवंत विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन आपली कारकीर्द घडविण्यापेक्षा आपल्या देशाच्या महासत्तेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातच आपले योगदान द्यावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करणे हे कल्याणकारी राज्यांचे धोरण असावे.
नोडल क्षेत्रासाठी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नेरूळ येथील अपीजय स्कूलच्या चंद्रिका एरी, दिल्ली पब्लिक स्कूल, नेरूळच्या मोनिका शर्मा, खारघरच्या अपीजय स्कूलच्या कुसुम प्रजापती, ज्युडिथ जॉन यांना देण्यात आला. प्रकल्प क्षेत्रासाठी बेलापूर येथील विद्या प्रसारक हायस्कूलचे विश्वास ठाकूर, कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्था हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शोभा पाटील, ज्युनियर कॉलेजचे अशोक बदाडे यांना प्रत्येकी रोख रूपये दहा हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबईतून इ. दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या अपूर्वा सावंत, सीबीएसई बोर्डाच्या श्वेता म्हात्रे, आयसीएसई बोर्डाच्या अंकिता डे, आयसीएसई बोर्डाचा रक्षित शेट्टी यांना प्रत्येकी रोख रुपये पाच हजार एक देण्यात आले. 
सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, संचालक नामदेव भगत, मुख्य नियोजक, एम. डी. लेले, नवी मुंबई स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष फादर अल्मेडा, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रिमा दीक्षित, उत्कृष्ट शिक्षक व शाळा निवड समिती सदस्या डॉ. प्रियंवदा देसाई, रेखा रोहिरा आणि स्नेहल देशमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक रिमा दीक्षित, सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी आणि आभार दीपा गायकवाड यांनी मानले.

मंगळवार, २१ डिसेंबर, २०१०

२१ डिसेंबर सगळ्यात लहान दिवस-झोपाळूंची मजा

मंगळवार ता. २१ डिसेंबर हा दिवस वर्षातला सगळ्यात लहान दिवस ठरणार आहे. मंगळवारी सकाळी ७.०८ वाजता सूर्योदय आणि सूर्यास्त संध्याकाळी ६.०५ वाजता होईल. पृथ्वीच्या उत्तरायणास मंगळवार ता. २१ पासून सुरवात होईल उत्तरायण वर्षातून दोनदा होते. यापैकी एक दिवस लहान आणि एक दिवस मोठा असतो. यासाठी १८० दिवसांचा कालावधी लागतो. हिवाळ्यात सूर्य विषूववृत्तापासून लांब जातो म्हणून दिवस लहान होतो. २१ डिसेंबरला सूर्य आणखी लांब जाईल परिणामी सूर्यास्त आणखी लवकर होईल. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो.
 
झोपाळूंची मज्जा..

केव्हा एकदा दिवस संपून रात्र होते आणि आपण झोपतो अशी वाट पाहणार्‍या झोपाळू लोकांसाठी आजचा दिवस पर्वणीच असून आज (मंगळवार) दिवस हा १०.५७ मिनिटांचा आणि सगळ्यात मोठी रात्र १३.०३ मिनिटांची असेल. अशी माहिती विनायकशास्त्री जोशी यांनी दिली.

कांद्याची निर्यात थांबविणे स्तुत्य

शासनाने भारतातून केली जाणारी कांद्याची निर्यात तूर्त थांबविली आहे. सद्य परिस्थितीत उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आणि स्तुत्य आहे.
अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा, द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी गुदामांमध्ये साठविलेला कांदा अक्षरशः सडल्यामुळे फेकून द्यावा लागला. यातही, जीवो जीवस्य जीवनम्.. प्रमाणे केवळ हातांवर आणि पायांवरच पोट चालणार्‍या घटकांनी यातूनही थोडा सुस्थित असलेला कांदा वेचून विकला आणि काही दिवस कशीबशी उपजिवीका सुरू ठेवली. मात्र व्हायचे तेच होऊन हा कांदा देखील अंकूरल्यामुळे फेकून द्यावा लागला. बाजारपेठेतून कांदा पूर्णपणे नाहीसा होण्याची चिन्हं दिसू लागली. धनदांडगे व्यापारी आणि काही गुदामांमध्ये असलेला उर्वरित कांदा चढ्या भावाने विक्रीस सुरवात होऊन याचा परिपाक म्हणजे अवघ्या आठ ते बारा रुपये प्रति किलो दराने मिळणारा कांदा आज महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पन्नास ते सत्तर च्या घरात पोहोचला आहे.
शासनाने नुकतीच तातडीची बैठक बोलावून सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन देशातून केली जाणारी कांद्याची निर्यात थांबविण्याचे आदेश नाफेडला दिले आहेत. किंमतीचा उंचावणारा आलेख कुठेतरी थांबण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शिल्लक चांगला कांदा देशांतर्गत विकण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. शेजारी देश पाकिस्तानमधून काही अंशी कांदा आयात करण्यात येणार असून पंजाबमध्ये हा कांदा सर्वप्रथम पोहोचेल, तेथूनच अन्यत्र वितरीत करण्यात येण्याचे वृत्त आहे.
कुटुंब प्रमुखासारखेच आधी आपल्या कुटुंबाला आणि शिल्लक राहिल्यास दुसर्‍यांना द्यावे या उक्तीप्रमाणे ही बाब खरोखर प्रशंसनीय आहे. काही का असेना, उशीरा का होईना अखेर शासनाला जाग आली, हे ही नसे थोडके...

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

सिडको गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी

मुंबई, ता. २०- बेलापूर येथे उद्या (ता. २१) सिडको गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सिडकोतर्फे दरवर्षी मुंबई कार्यक्षेत्रातील शालांत परिक्षा, उच्च माध्यमिक शालांत परिक्षा आणि सीबीएसई, आयसीएसई च्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते. सिडको भवन, सातवा मजरा, सिडको सभागृह, सीबीडी-बेलापूर नवी मुंबई ४००६१४ येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, आमदार आणि संचालक सुभाष भोईर, संचालक नामदेव भगत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील. असे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी कळविले आहे.

साहित्यिक डॉ. भेंडे यांना पवार, भुजबळ यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या निधनामुळे गंभीर लेखनाबरोबरच विनोदी लेखनावरही प्रभुत्त्व गाजविणार्‍या आणि नाविन्याचा दृष्टीकोन बाळगणार्‍या लेखकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अर्थशास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. भेंडे यांनी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या शैलीतून प्रबोधनाचे कार्य केले. नजरेच्या मिस्किल चष्म्यातून जीवनातील घडामोडींकडे ते खेळकर दृष्टीने बघत. लेखनाच्या माध्यमातून वाचकांनाही ते सहभागी करून घेत.

विनोदाच्या पायवाटेवरून चालताना गंभीर आणि समस्याप्रधान कादंबर्‍यांचेही त्यांनी लेखन केले. त्यांच्या कादंबर्‍यांमधील आशयात विलक्षण विविधता जाणवते, असा दिलदार आणि अंगभूर रसिकता असलेला लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याचे श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट संवेदनशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. सुभाष भेंडे उत्कृष्ट साहित्यिक होतेच परंतु एक उत्तम माणूस देखील होते, या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...