शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०१०

'कसाब' चा पुळका कशाला "साब"...

(संग्रहित छायाचित्र)
देशाची आर्थिक राजधानी मानली जाणार्‍या मुंबईवरील हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होतील. जवळपास ६० तास सुरक्षा यंत्रणांनी अथक परिश्रम करून अतिरेक्यांच्या ताब्यात असलेली हॉटेल ताजसह इतर ठिकाणे मुक्त केली होती. या हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होऊन अनेक महिने उलटून गेले. कसाही वागणार्‍या उर्मट कसाबसाठी शासनाला इतका पुळका कशाला हवा?
संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत मुंबईतील महत्वाची ठिकाणे ताब्यात घेऊन बेछुट गोळीबार करून देशाच्या अनेक नागरिकांना आणि कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या अधिकार्‍यांना देखील मारणार्‍या नराधम अतिरेक्यांपैकी कसाब हा एक अतिरेकी सुरक्षा पथकांच्या हाती जखमी अवस्थेत जीवंत सापडला. रुग्णालयातून उपचार घेऊन बरा झाल्यानंतर कसाबची रवानगी तुरुंगात करण्यात येऊन त्याच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. स्वतंत्र सेल, स्क्वॉड, यंत्रणा..सर्वच अगदी स्वतंत्र..। खरंतर प्रत्यक्ष सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी कसाब याने गोळी झाडताना दाखविल्याची चित्रफीत उपलब्ध असताना आणखी पुरावे मागण्याची मुळात गरजच काय?
कसाब याचे जेवण, राहणी, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तैनाती, वाहतूक, वहन, तपासण्या, विशेष वकील इ.वर दररोज लाखो रुपये खर्च झाला असून हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात तर कधीच पोहोचला आहे. मध्यंतर तो तुरुंगाधिकार्‍यांशी वाईट वागला, कुटे थुंकला, तरीही सर्व काही निमुटपणे सहन करायचे..। इतकी सन्मानाची वागणूक त्याला कशाला हवी? पाकिस्तानमधील भारतीय वंशाच्या लोकांना अथवा भारतीय कैद्यांना मिळणारी वागणूक शासनाने ध्यानात घेणे नितांत गरजेचे आहे. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याची देखील अनेक उदाहरणे आजकाल समोर येत आहेत. परंतु इतक्या मोठ्या देशद्रोह्याला, अतिरेक्याला पोलिस संरक्षणाची गरजच का? कसाबकडून मिळवायची तेवढी माहिती घेणे पूर्ण झाल्याचे सुरक्षा यंत्रणेचे सांगितले असल्याचे वृत्त आहे. परिणामी त्याला जनतेच्या सुपूर्द करणे अथवा लवकरात लवकर फाशीची शिक्षा देणे आवश्यक ठरले आहे. दोन वर्ष उलटून देखील अद्याप त्यावर निर्णय न होऊ शकणे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे.
अतिरेकी, देशद्रोही यांच्यासाठी विशेष कायद्याची तरतूद घटनेत करण्यात यावी. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानच्या भारत-विरोधी कारवायांना अजिबात पायबंद न बसता उलटपक्षी पोषक वातावरण, परिस्थिती निर्माण होईल. शासनाच्या ताब्यात असलेल्या सर्वच अतिरेक्यांना लवकरात लवकर फाशी देऊन संभाव्य खर्च टाळण्यात यावा. खर्च होणारी रक्कम शहीदांच्या कुटूंबांना दिल्यास मोठा आधार होऊन, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण, हवे तसे शिक्षण घेता येईल, देशाच्या शिलकेत एकप्रकारे भरच पडेल, हाच विश्वास!

केंद्रीय माहितीचा अधिकार : जनतेला सिडको प्रशासनातर्फे आवाहन

सिडको महामंडळातील विविध विभागांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदारांकडून अर्ज प्राप्त होत असतात. परंतु काही अर्जदार आपल्या अर्जावर वा अपिलांवर फक्त माहिती अधिकारी एवढेच नमूद करून, संबंधित अधिकार्‍याचा हुद्दा अथवा विभागाचे नाव नमूद न करता अर्ज सादर करीत असतात. यामुळे संबंधित विभागाकडून विहीत कालावधीत अपेक्षित असलेली माहिती ही एकापेक्षा अधिक विभागांशी संबंधित असल्याने संकलन करण्यास अधिक कालावधी लागतो. यामुळे संबंधित विभागाकडून विहित कालावधीलत माहिती उपलब्ध करून देण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निर्दर्शनास आले आहे.
उपरोक्त बाब लक्षात घेऊन, सिडको प्रशासनाच्या वतीने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत सादर करायचे अर्ज/अपील- महाव्यवस्थापक (प्रशासन) सिडको भवन, तळमजला, यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील. जनतेच्या सुविधेकरता ही तरतूद येत असून जनतेने कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.
सहाय्यक जनमाहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी, आणि अपीलिय माहिती अधिकार्‍यांची सुधारित यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतचा विस्तृत फलक सिडको भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ तळ मजला येथे लवकरच प्रदर्शित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

बने चाहे दुश्मन जमाना हमारा..

राजीनामा देण्याचे हे देखील (जवळीक?) एक कारण तर नसेल नां...? (इंटरनेटवर सर्फिंग करता-करता उपरोक्त छायाचित्र सापडले आणि नकळत(बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा...ही  हिंदी गाण्याची ओळ मनाला चाटून गेली...)

लहुजींनी ज्ञानप्रसार केला: प्रा. हरी नरके

मुंबई, ता. १८- महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक चळवळीमध्ये क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी वस्त्यावस्त्यात जाऊन शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक प्रा. हरी नरके यांनी केले. मुंबई येथे क्रांतीकारक लहुजी साळवे यांच्या २१६ व्या जयंतीनिमित्त भारतीय बहुजन परिषदेच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रा. नरके म्हणाले, की जोतीराव-सावित्रीबाईंना घर सोडावे लागले, तेव्हा लहुजी त्यांच्या मदतीला धावले नसते तर फुले यांचा कार्य बंद पडले असते. आपल्या शैक्षणिक चळवळीचे प्रेरणास्थान म्हणून जोतीराव लहुजींना गुरूस्थानी मानत होते.  साहित्यिकांना सध्या देण्यात येणारे वाड्‍.मय पुरस्कार इंग्रज सरकारला सुरू करायला लावण्यात लहुजींचा मोठा हातभार होता.
मुक्ता साळवे या दलित साहित्यातील आद्य लेखिका असून त्यांचा निबंध दीडशे वर्षांपूर्वी राज्यात गाजला होता. परिक्षेतील पुरस्कार स्वीकारताना आपल्याला खाऊच्या खेळण्याचे बक्षिस नको, तर शाळेला ग्रंथालय द्या अशी मागणी मुक्ताने केली होती. ब्रिडीश राजवटीत दक्षिणा प्राईज कमेटीतर्फे पुरोहितांना दिल्या जाणार्‍या दक्षिणेतील काही रक्कम ग्रंथ पुरस्कारासाठी केली जावी अशी मागणी लोकहितवादी व त्यांच्या सहकार्यांनी सरकारकडे केली होती.
साहित्य हे संस्कृतीच्या जनुकांचे वाहक असते. सहिष्णुता आणि भलेपणाची वृत्ती जागती ठेवण्याचं काम लेखक करतो. साहित्य संमेलन म्हणजे एक प्रकारे सामुहिक उमदेपणाचा उत्सव असतो. वाचन ही एक कला असून वाचनात मागे असलेले लोक समाज उपद्रवात पुढे जातात. अणूबाँबच्या स्फोटापेक्षाही जगाला निरक्षरतेचा धोका मोठा आहे. निरक्षरता मानवी संस्कृतीला धोक्यात टाकते असे प्रतिपादन प्रा. नरके यांनी यावेळी केले.
कुसुम कपोले यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. बाबासाहेब गोपले यांनी १५ ठराव मांडले. स्वागताध्यक्ष अप्पासाहेब अवचारे, विकास तांबे, साहित्यिक दया हिवराळे, संपत जाधव, शरद जाधव यांनी मनोगत मांडले. प्रास्ताविक व आभार व्यंकट शिंदे यांनी मानले.

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

कांद्याने न चिरताच रडविले...

गेल्या महिन्यात परतीच्या मान्सून नंतर पावसाळा संपला असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तटवर्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात अनेक ठिकाणी अकाली पाऊस झाला. परिणामी सर्वाधिक नुकसान कांदा, मिर्ची चे झाले. बाजारपेठेत जाणार असलेला आणि बाजारपेठेत जाऊन विक्रीच्या बेतात असलेला कांदा पावसात भिजला. मुसळधार पाऊस पडेल अशी सुतराम शक्यता, शंका शेतकरी व व्यापार्‍यांना नसल्यामुळे कांदा ओला होऊन मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून द्यावा लागला आहे. यातही चांगला कांदा गवसतो का? या आशेने गरीब नागरीक चांगल्या कांद्याच्या शोधात आहेत. तोंडचा घास गेल्यामुळे कांद्याने न चिरताही डोळ्यात पाणी आणल्याची अर्थातच रडविल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

बकरी ईद, एकादशीनिमित्त शासनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरी ईद व कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ईदनिमित्त ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी सकाळी नमाज अदा करून देशाच्या विकास आणि एकजुटीसाठी प्रार्थना केली. पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनातर्फे ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्यात येत होत्या.
मध्यंतरी अकाली पाऊस पडल्याने पीकाचे नुकसान होऊन अनेक शेतकर्‍यांच्या तोंडचा घासच जणू ओढला गेला. यामुळे आता तरी पाऊस पडू नये अशी आळवणी काही भाविकांनी यावेळी केली. मंदीर परिसरात गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी होती.

कबड्डी विजेत्या-उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई, ता. १६- जम्मू येथे झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजेत्या उपविजेत्या संघाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची धुरा सांभाळत असतानाच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन्ही संघाने आपल्याला ही विजयाची बहुमोल भेट दिली असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले. मुलांच्या संघाचे प्रशिक्षक प्रशांत मोकल, कर्णधार अक्षय उघाडे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक संतोष शिर्के, कर्णधार प्राजक्ता तापकिर आदी उपस्थित होते. असोसिएशनचे सरकार्यवाह मोहन भावसार यांची चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कबड्डीचे तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

मंत्र्यांचा कँपस इंटरव्ह्यू एक चांगला पायंडा...

राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये इच्छुक (उमेदवार) मंत्र्यांचे कँपस इंटरव्ह्यू घेण्यात आले. अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्याची तर काही मंत्र्यांनी आपल्या कामाची, कामगिरीची फाईलच यावेळी दाखविली, काही मंत्र्यांनी बाहेर व्यवस्थित अभ्यास करून प्रवेश केल्यानंतर आपल्या कामांचा पाढा म्हणून दाखवला. काहीही असो...शिक्षणाचा कुठे ना कुठे फायदा तर झाला?
शंभर टक्के शिक्षीत आणि गुन्हे दाखल नसलेल्या उमेदवारासच भविष्यकाळात निवडणुकीत (मग ती गावपातळीपासून थेट दिल्लीपर्यंत, कोणतीही असो) तिकिट देण्याची पद्धत सुरू करणे काळानुसार आवश्यक आहे. परिणामी घाणेरड्या राजकारणापासून दूर राहून देशाचा विकास खर्‍या अर्थाने करणे सहज शक्य होईल, हीच अपेक्षा.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्र्यांचाही "आदर्श"

आपल्या अभिनंदनाचे होर्डिंग, बॅनर काढण्याच्या सूचना नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी कार्यकर्ते आणि महापालिकेने केली असून आतापर्यंत सुमारे पाच हजार होर्डिंग, बॅनर, काढण्यात आले आहेत. ही बाब खरोखर स्तुत्य असून आदर्श ठरली आहे. राज्यातील अन्य नेत्यांनी देखील हे ध्यानात घेऊन तशी कृती करावी.

अशोक चव्हाण यांना मंत्रीमंडळात न घेण्याचा "आदर्श"...?

आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी राजीनाम द्यावा लागलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे काँग्रेसने जवळपास निश्चित केले आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली येथे काल काँग्रेस मुख्यालयात पक्षश्रेष्ठींशी नूतन मंत्रीमंडळातील समाविष्ट करण्यासंदर्भात मंत्र्यांविषयी चर्चा केली. यामुळे अनेक मंत्री दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात तळ ठोकून होते. परंतु माजी मुख्यमंत्री यांचा नूतन मंत्रीमंडळात समावेश न करण्याचे संकेत मुख्यालयाने दिले आहेत. भ्रष्टाचार करणार्‍यांची गय नाही, असा आदर्श काँग्रेस घालून आपली प्रतिमा बदलवू इच्छित असल्याचे हे द्योतक असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेसजन व्यक्त करीत आहेत.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...