बुधवार, २ सप्टेंबर, २०२६

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंदा ‘पनवेलचा महागणपती’ची उज्जैनच्या  पार्श्वभूमीवर महाकाल स्वरूपात निर्मिती केली आहे. यंदाचे हे विशेष आकर्षण आणि त्याकरिता साडेसहा हजार स्केअर फुटीचा कोरीव मूर्तीच्या लेण्यांचा तितकाच सुंदर, आकर्षक आणि मनमोहक शामियाना कलेच्या उत्तम नमुन्यातून निर्माण करण्यात आला आहे.


मुंबई आणि पुणेनंतर पनवेलमध्येही गणेशोत्सवाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि भक्तीचे निर्मळ पावित्र्य राखत ‘कांतीलाल प्रतिष्ठान’ने सालाबादप्रमाणे फिल्मसिटीचे कला दिग्दर्शक आणि कारागीरांच्या संकल्पनेतून यंदा ‘महाकाल’चा देखावा उभा करण्यात आला आहे.


मुंबईच्या राजन खातू यांच्या कार्यशाळेत ‘पनवेलचा महागणपती’ सोज्वळ आणि शांतरसाने न्हावून निघत आहे. मूर्ती अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच देखाव्यावरही कारागिरांचा शेवटचा हात फिरत आहे.


महाद्वारावरील १६ फुटी भगवान शंकरांची मूर्ती भक्तांना शक्ति देणारी असून आकर्षित करणारी आहे.


महाकालस्वरूप फिलर, कोरीव मूर्ती आणि प्रशस्त शामियांना तयार करण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरु आहे. पनवेलच्या महागणपतीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्यांचे मनोबल वाढविणारी आणि आवडनिवड जपत गणेशोत्सवाला आकार देण्याचे कार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत.


तेव्हा गणेशोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद, भक्ती आणि समाधान द्विगुणित करावा, असे आवाहन संयोजक किरण करावकर, सुधीर सोमवंशी यांनी केले आहे.

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

बंद क्लोज्ड लूप कार्ड परतावा १५ सप्टेंपर्यंत घ्या; सिडको मेट्रो

 नवी मुंबई: सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावरील प्रवाशांकरिता दि. ३ जून २०२६ पासून
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुरू करण्यात आले असून त्यापूर्वी वापरात असलेली क्लोज्ड लूप
कार्ड बंद करण्यात आली आहेत. 

क्लोज्ड लूप कार्डवरील शिल्लक रकमेचा परतावा दि. १५ सप्टेंबर २०२६ या
अंतिम मुदतीपर्यंत प्राप्त करण्याचे आवाहन सिडकोतर्फे मेट्रो प्रवाशांना करण्यात आले आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वर यापूर्वी शुल्क भरणा करण्याकरिता क्लोज्ड लूप कार्ड वापरात होते. सदर
क्लोज्ड लूप कार्ड दि. ३ जून २०२६ पासून बंद करण्यात आली असून सदर जुनी क्लोज्ड लूप कार्ड या
मार्गावरील कोणत्याही मेट्रो स्थानकावर प्रवासासाठी वैध राहिलेली नाहीत. ज्या प्रवाशांकडे अद्याप शिल्लक
रक्कम असलेली क्लोज्ड लूप कार्ड आहेत अशा प्रवाशांनी निर्धारित मुदतीत आपल्या कार्डवरील शिल्लक रकमेचा
परतावा प्राप्त करून घ्यावा. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी निर्धारित मुदतीत प्रवाशांनी परताव्याची प्रक्रिया
पूर्ण करावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना; १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू: ४,७७९ सदनिका

 सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण
योजना जाहीर करण्यात येत असून, शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध आहेत.

योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव असून प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹६ लाखांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत; सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत.

सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन
राहील. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

पनवेलचा महागणपती मंडप 'श्रीगणेशा'; अध्यक्ष कडू यांच्या हस्ते शुभारंभ

 पनवेल: (ता. १०) कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य मंडप उभारणीला सोमवारी (ता. १०) श्रीगणेशा झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंडप उभारणीचा श्रीफळ वाढविण्यात आला. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन रुग्णालयासमोरील गुजराथी शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडप उभारण्यात सुरुवात झाली आहे.रायगड, नवी मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात ‘पनवेलचा महागणपती’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. भव्य राजवाडा, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक सजावट आणि १८ ते २१ फुटांची गणेशमूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अकरा दिवसांच्या उत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मंडप उभारणी कधी सुरू होणार, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता असते. यंदाही वेगळे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मंडपाच्या उभारणीपासूनच चर्चेत राहणारा हा उत्सव यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्यार आहे.



यंदाच्या उत्सवासाठी सुमारे सात हजार चौरस फुटांचा शामियाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बाहेरील मंडपही अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात येत आहे. जर्मन पद्धतीच्या हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून मंडप उभारणी करण्यात येत आहे. अँल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या या हँगरची उभारणी हायड्रा आणि कामगारांच्या मदतीने करण्यात येत आहे.

मंडप उभारणीच्या शुभारंभाप्रसंगी कडू यांचे सहकारी सुधीर सोमवंशी, किरण करावकर, देवेंद्र तांडेल, सुरज भोईर, अश्विनी भोसले, निशा पाटील, रेश्मा भोईर, निशा भोईर, यशश्री म्हात्रे आदी उपस्थित होते.


मंगळवार, २१ जुलै, २०२६

आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'पैलवान दत्तक योजने'चा शुभारंभ

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'पैलवान दत्तक योजना २०२६–२७' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.


या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर

या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार

मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, "महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. 'पैलवान दत्तक योजना' ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे."

गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ

देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना' ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.

शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.

दिग्गज मल्लांची उपस्थिती

या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला.

निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका

या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा

कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना' हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा  विश्वास व्यक्त केला.

 


सोमवार, २० जुलै, २०२६

सिडको: आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

 सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न
 

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकाच्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी
बेलापूर येथे श्री. अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक; डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीमती हबीबा ए. एल., उपसंचालक (आयटी), एनआयसी; श्री. श्रीनिवास मोकळीकर, (प्र.) महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आराखडा यांमुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
ही सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. अन्य
प्रवर्गातील सदनिकांची सोडत मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे याची
कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी.
डिसेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे व खारकोपर
येथे ८,७९५ ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी १०,८३२ अर्ज प्राप्त झाले
होते. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी
www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

सिडकोची ऑनलाईन संगणकीय सोडत २० जुलैस

 सिडकोतर्फे डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन संगणकीय सोडत
सोमवारी २०.०७.२०२६ रोजी काढण्यात येणार आहे.


सदर गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये १६,८७६ सदनिका (आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटक (EWS) – ८,७९५ व अल्प उत्पन्न गट (LIG) – ८,०८१) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
तथापि, मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. २६५० / २०२६ मध्ये दिनांक २५.०३.२०२६ रोजी दिलेल्या
अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने, सदर संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील
८,७९५ सदनिकांसाठी घेण्यात येणार आहे. या प्रवर्गासाठी एकूण १०,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सदर सोडत पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने घेण्यात येईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी
अर्जदारांची यादी सिडकोच्या अधिकृत गृहनिर्माण संकेतस्थळावर www.cidcohomes.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल.


यशस्वी अर्जदारांच्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने संबंधित अर्जदारास त्या सदनिकेवर कोणताही कायदेशीर
हक्क अथवा दावा आपोआप प्राप्त होणार नाही. सदनिकेचे अंतिम वाटप हे अर्जदाराची पात्रता पडताळणी,
कागदपत्रांची छाननी, गृहनिर्माण योजनेतील अटी व शर्तींची पूर्तता तसेच सिडकोच्या लागू असलेल्या इतर
निकषांच्या अधीन राहील.


लॉटरीचा निकाल तसेच पुढील वाटप प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी अर्जदारांनी
www.cidcohomes.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सोमवार, १३ जुलै, २०२६

१३ जुलैपासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी कमी

 १३ जुलै २०२६ पासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होत आहे.
सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ पासून सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वरील बेलापूर–पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 

मेट्रो संचालनाचे अधिक कार्यक्षम नियोजन केल्यामुळे प्रत्येक एकेरी प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होणार असल्याची कृपया
नागरिकांनी नोंद घ्यावी असे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी कळवले आहे.


जि. प. शिक्षकांचा भार महापालिकेवर नको: कांतीलाल कडू

 

(पनवेल, ता. ११): पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे वर्गीकरण करताना त्या शाळांमधील शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करू नये, अशी मागणी लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांचे वर्गीकरण झाल्यास महापालिकेवर शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. 


पनवेल महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून, त्यामध्ये सुमारे ६,९९५ विद्यार्थी आणि २६५ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळांसोबत शिक्षकांचाही समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचा भार महापालिकेवर टाकणे योग्य ठरणार नाही. अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांचे निवृत्ती वेतन, इतर लाभ आणि उच्च वेतनश्रेणीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. हा खर्च अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
त्याऐवजी राज्य शासनाच्या 'पवित्र' पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती केल्यास नव्या उमेदवारांना संधी मिळेल आणि महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भारही पडणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती महापौर नितीन पाटील आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी कडू यांच्यासमवेत ज्येष्ठ सदस्य भूषण साळुंके, देवेंद्र तांडेल, संज्योगिता परदेशी, भाग्यश्री दोडके आणि रेश्मा पाटील उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल तसेच याबाबत लवकरच लेखी भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आश्वासन आयुक्त मंगेश चितळे यांनी बैठकीत दिल्याचे कडू यांनी सांगितले.




गुरुवार, १८ जून, २०२६

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल

 सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी
१७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी
मुंबई येथे श्री. अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली.

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते.
सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या श्री. अश्विन मुद्गल यांनी
आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळयेथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचेअतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. श्री. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत.

“सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्यात
येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे.
सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण
पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे श्री. मुद्गल यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.

अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य दोन प्रभावी कार्यक्रमांची रेलचेल संमेलनाच्या रूपरेषेत आखण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वव्यापीचे उपाध्यक्ष गजलकार प्रशांत वैद्य (टिटवाळा) यांनी दिली.

गेल्या वर्षापासून ज्येष्ठ कलावंत, साहित्यिकांची निवड करुन त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात ही निवड केली जाईल. यंदापासून १५ हजार रोख रुपयांचे पारितोषिक, मानपात्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

‘स्व. हरिश्चंद्र चांगू कडू’ या अवलियाच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. या संदर्भात निवड समितीचा निर्णय येत्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे संस्थेचे सचिव गजलकार बंडू अंधेरे यांनी कळविले आहे. व्हॉ
याशिवाय, राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष तसेच सहभागी मान्यवरांची नावेही निश्चित केली जातील. राज्यातील मान्यवर साहित्यिक, रसिक, मराठीचे जाणकार आणि मराठी बांधवांना ही पर्वणी ठरणार असल्याने त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठानचे सचिव शर्वाय कडू यांनी केले आहे. लवकरच साहित्य संमेलन नियोजन समितीची बैठक संपन्न होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाकरिता व्हॉट्सॲप क्रमांक ९९२०१५८३३८ वर संपर्क साधावा. पत्रव्यवहाराकरिता, १०७, आदित्य हाऊसिंग सोसायटी, गेट नं. ०१, रूम नं. ०१, प्रजापती ब्रह्मकुमारी केंद्राच्या खाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, एमसीसीएच सोसायटी पनवेल. ४१०२०६ ( नवी मुंबई) येथे संपर्क साधावा.


कविता, गजल पाठविणाऱ्यांची निवड झाल्यावर त्यांना याबाबत दूरध्वनीद्वारे सूचित करण्यात येईल. त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोजकांना फोन करू नये. संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. शिवाय दुपारच्या स्नेह भोजनाचीही मोफत व्यवस्था असल्याने कोणीही साहित्यिक, रसिक सहभागी होऊ शकतो, असे कळविण्यात आले आहे.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या
सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. 



यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी
भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे
घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.
या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक
संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल
(एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी
२०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या
अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली.



नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक
मूल्यमापन करण्यात येऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक
महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग
सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली.


या पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग
पास आणि बॅगेज टॅग जारी केले, ज्यावर रीव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले.
सिडकोतर्फे ११६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २०
दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची
प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. सदर विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील
मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित
हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

‘सिडको’ हक्काचे घर मिळालेल्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

 मुंबई, ता. १९ : सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान
उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे
काम करत आहेत. आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१,३९९
सदनिकांच्या महासोडतीच्या माध्यमातून एकूण १९,५१८ नागरिकांचे सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’
या योजनेद्वारे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या
अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली. एका क्लिकवर मा. उपमुख्यमंत्री
यांच्या शुभहस्ते १९,५१८ अर्जदारांचे हक्काच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या
पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी श्री. विजय सिंघल,
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ.
राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्री. मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी व्हिडिओद्वारे दिलेला संदेश प्रसारित करण्यात
आला. आपल्या संदेशामध्ये मा. मुख्यमंत्री यांनी सिडकोची गृहनिर्माण योजना हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले व यशस्वी अर्जदारांना
शुभेच्छा दिल्या. तसेच नवी मुंबई हे भविष्यातील विकासाचे केंद्र असून सिडकोच्या योजनेमुळे सर्वसामान्य
कुटुंबांना नवी मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले असल्याचे मा. मुख्यमंत्री यांनी या संदेशाद्वारे सांगितले.
श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी महासोडत कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशाचे या वेळी
वाचन करण्यात आले. तसेच त्यांनी आपल्या संदेशामध्ये, महासोडत प्रक्रिया हे “सर्वांसाठी घरे”
या संकल्पपूर्तीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केले व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा
दिल्या. अनेक सर्वसामान्य कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणे, हा आनंदाचा क्षण असल्याचे मत देखील व्यक्त केले.

श्री. शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून
यात नागरिकांना आपली पसंत नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी
नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय
दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे.
नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून ते म्हणाले की,
आता अटलसेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होतो. ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात
येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे
सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन
कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा
विश्वास मा. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर
गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे.
त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व
संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास
माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे श्री.शिंदे यांनी
सांगितले.


एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या
प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र
त्यावेळी रिमुव्हर्स सर्क्यूलेशन ड्रेन, नॉईज बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे
फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे
दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी
भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार,

डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.





बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

जामनेर- नमो कुस्ती महाकुंभ: अमृता पुजारी, विजय चौधरी यांचे वर्चस्व

 जळगाव, (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पहिलवानच भारी ठरले. नमो कुस्ती महाकुंभ २ अंतर्गत देवाभाऊ केसरी  आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगलमध्ये महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीसह सर्वच भारतीय पहिलवानांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी पहिलवानांना धूळ चारत आपले वर्चस्व दाखवून दिले.



देवाभाऊ केसरीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय दंगलमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी जगभरातील 9 देशांमधून आलेल्या नामवंत पहिलवानांना पराभूत करून कुस्तीच्या मैदानी परंपरेचा अभिमान वाढवला. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेप्रमाणे कुस्तीत महिलाना समान सन्मान देताना या मैदानातील पहिली आणि अंतिम कुस्ती महिलांची लावण्यात आली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळाल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आणि कुस्तीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

आपल्या तालुक्यात कुस्तीच्या मैदानात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पहिलवान येणार असल्यामुळे सुमारे पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा अथांग जनसागर पसरला होता. महाराष्ट्र केसरी विजेत्या अमृता पुजारीने रोमानियाच्या ऑलिम्पियन कॅटलिना क्सेन्टने हिच्यावर वर्चस्व गाजवत विजय मिळविला. शेवटच्या कुस्तीमध्ये अमृताने उत्कृष्ट डावपेच आणि चपळाईने गुण मिळवत आपला पराक्रम सिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विश्वविजेता व ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची कुस्तीला सलामी देण्यात आली.  सर्व विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी

 मुंबई- माझे पसंतीचे सिडकोचे घर; गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत 19 फेब्रुवारी 2025 पार पडणार
२६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून सिडको महामंडळाच्या “माझे पसंतीचे सिडकोचे
घर” गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी २.०० ते ४.००
च्या दरम्यान पार पडणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळासोबतच सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टींगच्या
माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे अर्जदार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून या सोडतीचे साक्षीदार होऊ
शकतात.
सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. अर्जदार
सदर संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या देखील पाहू
शकतात.
याशिवाय सोडतीचे थेट प्रक्षेपण खारघर पूर्व (तळोजा): भूखंड क्र.१४, सेक्टर-३७, तळोजा पंचानंद, पनवेल,
रायगड, ४१०२०८, खांदेश्वर: भूखंड क्र. १, सेक्टर-२८, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, पनवेल, रायगड,
४१०२०९, खारघर: भूखंड क्र. ६३ अ, सेक्टर-१५, खारघर, पनवेल, रायगड, ४१०२१० येथील अनुभव
केंद्रांवर देखील करण्यात येणार आहे. यामुळे २६,००० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या
क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

जामनेरमध्ये होणार ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती दंगल: फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, जॉर्जिया, इराण, रोमानिया आणि एस्टोनियाचे पैलवान उतरणार

 मुंबई, दि. ४ - जळगाव जिल्ह्यातील जामनेर हे गाव इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. येथील भूमीवर १६ फेब्रुवारी २०२५ रोजी 'नमो कुस्ती महाकुंभ-२' सोबत 'देवाभाऊ केसरी' ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या दंगलीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दंगलीमध्ये हिंदुस्थान , फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, जॉर्जिया, इराण आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, ऑलिंपियन, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी सारखे महिला आणि पुरुष दिग्गज कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. हे मोठे आयोजन मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याबद्दल बोलताना या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचे प्रमुख आयोजक महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले कि, संपूर्ण महाराष्ट्रात या आयोजनाबद्दल प्रचंड उत्साह आहे. या कुस्ती दंगलमुळे जामनेर हे गाव जागतिक कुस्ती नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. हे क्रीडा संकुल सामान्य घरातील खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवण्यासाठी मोठी भूमिका बजावेल.

कुस्ती रसिकांसाठी हा एक पर्वणीचा क्षण ठरणार आहे. जागतिक दर्जाच्या कुस्तीपटूंना एकाच मंचावर पाहण्याची ही अनोखी संधी आहे. ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. कुस्तीला समर्पित असलेले हे आयोजन जामनेर येथे मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी  केले आहे.

खारघर येथे पार पडले वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन

 मुंबई :  मुंबई आणि परिसरात राहणा-या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी विदर्भाच्या संपर्कात (कनेक्ट)राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ बांधकाम व्यावयासिक व माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या तिस-या वैदर्भीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

 नवी मुंबई व मुंबई परिसरातील वैदर्भियांचे हक्काचे व्यासपीठ

म्हणून “आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था’’ गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने रविवारी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश हावरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळी आपला विदर्भचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड, सरचिटणीस प्रमोद चुंचूवार, कोषाध्यक्ष अनंत शिंदे, सचिव राजेंद्र नंदनकर, उपाध्यक्ष अश्विनी हडपे यांच्यासह सभागृहात मोठ्या संख्येने वैदर्भीय उपस्थित होते. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार पडली.

याप्रसंगी, “चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता” हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो वर्षांच्या संबंधांमागील लोकपरंपरा उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत यांनी गोंड राजांनी मराठी भाषेच्या प्रचारात आणि लोककल्याण क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली.

 कोकणातील लोकांचा आदर्श घ्या- हावरे

 “कोकणातील प्रत्येक गावाची एक संघटना वा मंडळे असून मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देतात. या गावाच्या मंडळांनी चाळीत वा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणा-या तरूणाची काही महिने राहण्याची सोय होते. कोकणी माणूस आधीमनिऑर्डरने आणि आता ‘जी-पे’ने पैसे पाठवतो. मात्र या उलट विदर्भाचा माणूम मुंबईत आला की विदर्भाशी कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनिऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही जी-पे ने पैसे पाठवत नाही. हे चित्र बदलायला हवे. आपण विदर्भाच्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. आपला विदर्भ संस्थेने एखादा एप विकसित करून सदस्य नोंदणी, नोकरी शोधणे, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

  विदर्भापासून दूर हक्काचे कुटुंब- डांगे

 “आयआयटी खरगपूर येथे मी एमटेक करायला गेलो तेव्हा तेथील वसतीगृहासमोर एक फलक लागले होते. त्यावर लिहिले होते – टू द होम अवे फ्रॉम होम. आपला विदर्भ ही संस्था विदर्भापासून दूर राहणा-यांना कुटुंबापासून दूर राहूनही हक्काचे कुटुंब म्हणून कार्य करीत आहे. ही चांगली संकल्पना असून अधिकाधिक वैदर्भियांपर्यंत पोहोचायला हवी. विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला मुंबईत मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीही संस्थेने काम करावे,” असे डांगे म्हणाले.

सोमवार, २६ जुलै, २०२१

नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील उंचीबाबत वैध ना हरकत प्रमाणपत्र असणाऱ्या बांधकामांना मिळणार परवानगी

सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या
पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम
प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा
बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत
प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत.

ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम
प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील
बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे,
संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे.


डॉ. संजय मुखर्जी
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ
साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्या नवी मुंबई तसेच नैना क्षेत्रातील बांधकामांच्या उंचीवर
मर्यादा घालण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांना, विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने,
सिडकोकडून बांधकाम ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असले तरी त्यांचा विकास रखडला होता.

या पार्श्वभूमीवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकसित करणारी सवलतधारक कंपनी नवी मुंबई
इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या सहकार्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी
सिडको, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या प्रतिनिधींच्या
अनेक बैठका झाल्या. यानंतर ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीविषयक ना-
हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व जे वैध आहे, अशा बांधकामांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा
प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असे सिडकोतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा

सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन
आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र
(एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.  दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.



“नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो
प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.”

- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र


मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर
परिचालन आणि देखभाल सेवा पुरविण्याकरिता सिडकोकडून महामेट्रोला स्वीकारपत्र देण्यात आले आहे.
यामुळे या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होईल.
सिडकोच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याचाच प्रारंभ मेट्रो प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने झाला आहे.

डॉ. संजय मुखर्जी,
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको


नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड
परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4
उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह
तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीची
कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, तसेच या क्षेत्रातील
महामेट्रोचा अनुभव व कार्यकुशलता विचारात घेऊन सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली. महामेट्रो कंपनीस

नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित
करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा
अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोकडून 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती
करण्यात आली आहे.


या मार्गावरील परिचालन आणि देखभाल सेवांकरिता सिडकोला रु. 885 कोटी इतका खर्च अंदाजित
आहे. हा खर्च संपूर्ण महाराष्ट्रात तुलनात्मकरित्या सर्वात कमी आहे. महामेट्रोशी परिचालन आणि देखभाल
सेवा प्रदान करण्याच्या कराराचा कालावधी हा, या मार्गावर वाणिज्यिक परिचालन सुरू होण्याच्या तारखेपूर्वी
1 वर्ष आणि वाणिज्यिक परिचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून पुढील 10 वर्षे इतका असणार आहे.
हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक
प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव

 


कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली.
कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, सुदाम पाटील, शिवसेनेच्या कामोठे आघाडी प्रमुख सुवर्णा वाळूंज आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप नेते काशिनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, गणेश कडू, डॉ. नागनाथ येमपल्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, नारायणशेठ घरत, शंकरशेठ म्हात्रे, माया अहिरे, समाजसेवक बागूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...