पनवेल: (ता. १०) कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य मंडप उभारणीला सोमवारी (ता. १०) श्रीगणेशा झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंडप उभारणीचा श्रीफळ वाढविण्यात आला. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन रुग्णालयासमोरील गुजराथी शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडप उभारण्यात सुरुवात झाली आहे.
रायगड, नवी मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात ‘पनवेलचा महागणपती’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. भव्य राजवाडा, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक सजावट आणि १८ ते २१ फुटांची गणेशमूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अकरा दिवसांच्या उत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मंडप उभारणी कधी सुरू होणार, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता असते. यंदाही वेगळे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.
यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मंडपाच्या उभारणीपासूनच चर्चेत राहणारा हा उत्सव यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्यार आहे.
यंदाच्या उत्सवासाठी सुमारे सात हजार चौरस फुटांचा शामियाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बाहेरील मंडपही अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात येत आहे. जर्मन पद्धतीच्या हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून मंडप उभारणी करण्यात येत आहे. अँल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या या हँगरची उभारणी हायड्रा आणि कामगारांच्या मदतीने करण्यात येत आहे.
मंडप उभारणीच्या शुभारंभाप्रसंगी कडू यांचे सहकारी सुधीर सोमवंशी, किरण करावकर, देवेंद्र तांडेल, सुरज भोईर, अश्विनी भोसले, निशा पाटील, रेश्मा भोईर, निशा भोईर, यशश्री म्हात्रे आदी उपस्थित होते.
