बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

सिडकोची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना; १५ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू: ४,७७९ सदनिका

 सिडको महामंडळातर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ४,७७९ सदनिकांची नवीन गृहनिर्माण
योजना जाहीर करण्यात येत असून, शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता
www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका उपलब्ध आहेत.

योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव असून प्रत्येक प्रकल्पाची सदनिकानिहाय किंमत व सर्व इतर शुल्क नोंदणी सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹६ लाखांपर्यंत असलेले व भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत; सविस्तर पात्रता निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत.

तळोजा, कळंबोली व खारघर हे नोड्स विस्तृत रस्ते जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाच्या समीपतेमुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत.

सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी व योजनेच्या अटी-शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन
राहील. अद्ययावत माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२६

पनवेलचा महागणपती मंडप 'श्रीगणेशा'; अध्यक्ष कडू यांच्या हस्ते शुभारंभ

 पनवेल: (ता. १०) कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आयोजित ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य मंडप उभारणीला सोमवारी (ता. १०) श्रीगणेशा झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मंडप उभारणीचा श्रीफळ वाढविण्यात आला. पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील डॉ. पटवर्धन रुग्णालयासमोरील गुजराथी शाळेच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडप उभारण्यात सुरुवात झाली आहे.रायगड, नवी मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रात ‘पनवेलचा महागणपती’ विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. भव्य राजवाडा, आकर्षक विद्युत रोषणाई, सुबक सजावट आणि १८ ते २१ फुटांची गणेशमूर्ती हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. अकरा दिवसांच्या उत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच मंडप उभारणी कधी सुरू होणार, याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता असते. यंदाही वेगळे आकर्षण असणार आहे अशी माहिती अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.

यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होऊन २५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे ‘पनवेलचा महागणपती’च्या भव्य उत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मंडपाच्या उभारणीपासूनच चर्चेत राहणारा हा उत्सव यंदाही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरण्यार आहे.



यंदाच्या उत्सवासाठी सुमारे सात हजार चौरस फुटांचा शामियाना उभारण्यात येणार आहे. त्यासाठी बाहेरील मंडपही अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात येत आहे. जर्मन पद्धतीच्या हँगर तंत्रज्ञानाचा वापर करून मंडप उभारणी करण्यात येत आहे. अँल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेल्या या हँगरची उभारणी हायड्रा आणि कामगारांच्या मदतीने करण्यात येत आहे.

मंडप उभारणीच्या शुभारंभाप्रसंगी कडू यांचे सहकारी सुधीर सोमवंशी, किरण करावकर, देवेंद्र तांडेल, सुरज भोईर, अश्विनी भोसले, निशा पाटील, रेश्मा भोईर, निशा भोईर, यशश्री म्हात्रे आदी उपस्थित होते.


मंगळवार, २१ जुलै, २०२६

आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'पैलवान दत्तक योजने'चा शुभारंभ

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'पैलवान दत्तक योजना २०२६–२७' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.


या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर

या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार

मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, "महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. 'पैलवान दत्तक योजना' ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे."

गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ

देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना' ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.

शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम

युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.

दिग्गज मल्लांची उपस्थिती

या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला.

निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका

या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.

महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा

कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना' हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा  विश्वास व्यक्त केला.

 


सोमवार, २० जुलै, २०२६

सिडको: आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

 सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ८,७९५ सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न
 

सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर - माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकाच्या ८,७९५ सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सिडको भवन, सीबीडी
बेलापूर येथे श्री. अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी श्री. शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक; डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक; श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी; श्री. नरेंद्र भामरे, संचालक (आयटी), एनआयसी; श्रीमती हबीबा ए. एल., उपसंचालक (आयटी), एनआयसी; श्री. श्रीनिवास मोकळीकर, (प्र.) महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्री. अश्विन मुद्गल यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे लक्ष्य असून, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नामांकित कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आराखडा यांमुळे सिडकोची घरे गुणवत्तापूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.
ही सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांसाठी आयोजित करण्यात आली होती. अन्य
प्रवर्गातील सदनिकांची सोडत मा. उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे याची
कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी.
डिसेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे व खारकोपर
येथे ८,७९५ ईडब्ल्यूएस सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यासाठी १०,८३२ अर्ज प्राप्त झाले
होते. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी
www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

सिडकोची ऑनलाईन संगणकीय सोडत २० जुलैस

 सिडकोतर्फे डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची ऑनलाईन संगणकीय सोडत
सोमवारी २०.०७.२०२६ रोजी काढण्यात येणार आहे.


सदर गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये १६,८७६ सदनिका (आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटक (EWS) – ८,७९५ व अल्प उत्पन्न गट (LIG) – ८,०८१) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी एकूण १९,५४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
तथापि, मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. २६५० / २०२६ मध्ये दिनांक २५.०३.२०२६ रोजी दिलेल्या
अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने, सदर संगणकीय सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील
८,७९५ सदनिकांसाठी घेण्यात येणार आहे. या प्रवर्गासाठी एकूण १०,८३२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सदर सोडत पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने घेण्यात येईल. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यशस्वी
अर्जदारांची यादी सिडकोच्या अधिकृत गृहनिर्माण संकेतस्थळावर www.cidcohomes.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल.


यशस्वी अर्जदारांच्या यादीत नाव समाविष्ट झाल्याने संबंधित अर्जदारास त्या सदनिकेवर कोणताही कायदेशीर
हक्क अथवा दावा आपोआप प्राप्त होणार नाही. सदनिकेचे अंतिम वाटप हे अर्जदाराची पात्रता पडताळणी,
कागदपत्रांची छाननी, गृहनिर्माण योजनेतील अटी व शर्तींची पूर्तता तसेच सिडकोच्या लागू असलेल्या इतर
निकषांच्या अधीन राहील.


लॉटरीचा निकाल तसेच पुढील वाटप प्रक्रियेबाबतची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी अर्जदारांनी
www.cidcohomes.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सोमवार, १३ जुलै, २०२६

१३ जुलैपासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी कमी

 १३ जुलै २०२६ पासून बेलापूर–पेंधर मेट्रो प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होत आहे.
सोमवार, दिनांक १३ जुलै २०२६ पासून सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. १ वरील बेलापूर–पेंधर दरम्यानच्या मेट्रो सेवेचे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 

मेट्रो संचालनाचे अधिक कार्यक्षम नियोजन केल्यामुळे प्रत्येक एकेरी प्रवासाचा कालावधी १ मिनिट ३० सेकंदांनी कमी होणार असल्याची कृपया
नागरिकांनी नोंद घ्यावी असे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी कळवले आहे.


जि. प. शिक्षकांचा भार महापालिकेवर नको: कांतीलाल कडू

 

(पनवेल, ता. ११): पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे वर्गीकरण करताना त्या शाळांमधील शिक्षकांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करू नये, अशी मागणी लोकमुद्रा जनहित पार्टीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षकांचे वर्गीकरण झाल्यास महापालिकेवर शेकडो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. 


पनवेल महापालिका क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून, त्यामध्ये सुमारे ६,९९५ विद्यार्थी आणि २६५ शिक्षक कार्यरत आहेत. या शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळांसोबत शिक्षकांचाही समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल कडू यांनी आक्षेप नोंदविला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचा भार महापालिकेवर टाकणे योग्य ठरणार नाही. अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांचे निवृत्ती वेतन, इतर लाभ आणि उच्च वेतनश्रेणीमुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. हा खर्च अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
त्याऐवजी राज्य शासनाच्या 'पवित्र' पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती केल्यास नव्या उमेदवारांना संधी मिळेल आणि महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भारही पडणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती महापौर नितीन पाटील आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी कडू यांच्यासमवेत ज्येष्ठ सदस्य भूषण साळुंके, देवेंद्र तांडेल, संज्योगिता परदेशी, भाग्यश्री दोडके आणि रेश्मा पाटील उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल तसेच याबाबत लवकरच लेखी भूमिका स्पष्ट केली जाईल, असे आश्वासन आयुक्त मंगेश चितळे यांनी बैठकीत दिल्याचे कडू यांनी सांगितले.




गुरुवार, १८ जून, २०२६

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विन मुद्गल

 सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे अश्विन मुद्गल यांनी
१७ जून २०२६ रोजी स्वीकारली. सिडकोचे मुख्य कार्यालय असलेले सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी
मुंबई येथे श्री. अश्विन मुद्गल यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली.

सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती होण्यापूर्वी ते एमएमआरडीए महामंडळात अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत होते.
सन २००७ च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या श्री. अश्विन मुद्गल यांनी
आपल्या प्रशासकीय सेवेची सुरूवात नाशिक जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर पंढरपूर-सोलापूर येथे उपजिल्हादंडाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा व यवतमाळयेथे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि नागपूरचेअतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळले आहेत. श्री. अश्विन मुद्गल हे वाणिज्यिक शाखेचे पदवीधर आहेत.

“सिडको हे देशातील अग्रगण्य नियोजन व विकास महामंडळांपैकी एक असून, सिडकोतर्फे राबविण्यात
येणाऱ्या वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासाला मोठा हातभार लागत आहे.
सध्या सिडकोमार्फत साकारण्यात येत असलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्प नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण
पद्धतीने पूर्ण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे श्री. मुद्गल यांनी सिडकोच्या उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारताना सांगितले.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

मार्चमध्ये पनवेल येथे चौथे राज्यव्यापी साहित्य संमेलन: कवी, गजलकारांना सहभागी होण्याचे संस्थांचे आवाहन

 पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याकरिता सहभागी होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील नामवंत कवी, गजलकारांनी आपल्या स्वरचित कविता, गजल २० फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि विश्वव्यापी मराठी साहित्य, सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केले आहे.

अभिजात मराठी भाषेच्या जतनाकरिता गेली अनेक वर्षे दोन्ही संस्था कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली कवी संमेलने, गजल मुशायरा, चर्चासत्रांपासून मराठी भाषेचा गोडवा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सकाळी वारकरी दिंडीतून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ यांच्या गजरासह ग्रंथ दिंडीत टाळ, चिपळ्या, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने नयनरम्य पालखी काढण्यात येईल. या परंपरेच्या माध्यमातून पनवेल शहराचे साहित्य, संस्कृती आणि सांस्कृतिक वारसा जतन केला जात आहे. सकाळी दिंडी, उद्घाटन सोहळा, एक-एक तासाच्या अवधीची दोन चर्चासत्रे, कवी आख्यान, गजल मुशायरा याशिवाय अन्य दोन प्रभावी कार्यक्रमांची रेलचेल संमेलनाच्या रूपरेषेत आखण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वव्यापीचे उपाध्यक्ष गजलकार प्रशांत वैद्य (टिटवाळा) यांनी दिली.

गेल्या वर्षापासून ज्येष्ठ कलावंत, साहित्यिकांची निवड करुन त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात ही निवड केली जाईल. यंदापासून १५ हजार रोख रुपयांचे पारितोषिक, मानपात्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल.

‘स्व. हरिश्चंद्र चांगू कडू’ या अवलियाच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. या संदर्भात निवड समितीचा निर्णय येत्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे संस्थेचे सचिव गजलकार बंडू अंधेरे यांनी कळविले आहे. व्हॉ
याशिवाय, राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड, प्रमुख पाहुणे, स्वागताध्यक्ष तसेच सहभागी मान्यवरांची नावेही निश्चित केली जातील. राज्यातील मान्यवर साहित्यिक, रसिक, मराठीचे जाणकार आणि मराठी बांधवांना ही पर्वणी ठरणार असल्याने त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कांतीलाल प्रतिष्ठानचे सचिव शर्वाय कडू यांनी केले आहे. लवकरच साहित्य संमेलन नियोजन समितीची बैठक संपन्न होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाकरिता व्हॉट्सॲप क्रमांक ९९२०१५८३३८ वर संपर्क साधावा. पत्रव्यवहाराकरिता, १०७, आदित्य हाऊसिंग सोसायटी, गेट नं. ०१, रूम नं. ०१, प्रजापती ब्रह्मकुमारी केंद्राच्या खाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, एमसीसीएच सोसायटी पनवेल. ४१०२०६ ( नवी मुंबई) येथे संपर्क साधावा.


कविता, गजल पाठविणाऱ्यांची निवड झाल्यावर त्यांना याबाबत दूरध्वनीद्वारे सूचित करण्यात येईल. त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोजकांना फोन करू नये. संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. शिवाय दुपारच्या स्नेह भोजनाचीही मोफत व्यवस्था असल्याने कोणीही साहित्यिक, रसिक सहभागी होऊ शकतो, असे कळविण्यात आले आहे.

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्जता- विमानतळ परिचालनाचा महत्त्वाचा टप्पा

 नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या
सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. 



यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी
भारतीय हवाई दलातर्फे घेण्यात आलेली इन्स्ट्रूमेन्ट लँडिंग चाचणी आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी इंडिगोतर्फे
घेण्यात आलेली प्रवासी विमान लॅंडिंग चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती.
या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक
संचालक, नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळ (BCAS), श्री. विजय सिंघल, (भा. प्र. से.), उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. शान्तनु गोयल, (भा. प्र. से.), सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको,
श्रीमती गीता पिल्लई, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ), सिडको आणि नवी मुंबई इंटरनॅशनल
(एनएमआयएएल) यांचे अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी २४ फेब्रुवारी
२०२५ रोजी नागरी विमान वाहतूक महासंचलनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या
अधिकाऱ्यांनी संपूर्ण दिवस विमानतळाची पाहणी केली.



नागरी विमान वाहतूक महासंचालनालय ही देशातील प्रमुख विमानतळ सुरक्षा नियामक संस्था असून नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेल्या भेटी दरम्यान महासंचालनालयातर्फे विमानतळाचे व्यापक
मूल्यमापन करण्यात येऊन विमानतळाच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक
महासंचालनालयातर्फे विमानतळाच्या धावपट्टी, एप्रन, टॅक्सीवे, एटीसी टॉवर टर्मिनल बिल्डिंग, बॅगेज हॅंडलिंग
सिस्टीम इ. महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली.


या पाहणी दरम्यान मान्यवरांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. यामध्ये डमी बोर्डिंग
पास आणि बॅगेज टॅग जारी केले, ज्यावर रीव्ह्यू टीमने समाधान व्यक्त केले.
सिडकोतर्फे ११६० हेक्टरवर विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रती वर्ष २०
दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष टन माल वाहतुकीकरिता नियोजित आहे. अंतिम टप्प्यात विमानतळाची
प्रती वर्ष प्रवासी वाहतूक क्षमता ९० दशलक्ष आणि माल वाहतूक क्षमता २.६ दशलक्ष टन असणार आहे. मुंबई
येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी भार हलका करण्याच्या उद्देशाने नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्यात आले आहे. सदर विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील
मध्यवर्ती ठिकाणी असून या विमानतळाद्वारे एमएमआर प्रदेशाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक यांसह प्रस्तावित
हैदराबाद हायस्पीड रेल्वेद्वारे कनेक्टिव्हिटी नियोजित आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...