मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

दहा महानगरपालिका- 16 फेब्रुवारी; जिल्हापरिषदा, पं.स.- 7 फेब्रुवारीला मतदानः आचारसंहिता लागू

मुंबई, ता. 3 - बृहन्मुंबईसह दहा महानगरपालिका तसेच 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे जाहीर केला. यानुसार महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारी 2012 ला मतदान होईल. तर, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होईल. यासर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती सत्यनारायण यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर मुख्य सचिव चाँद गोयल उपस्थित होते. यावेळी श्रीमती सत्यनारायण म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2012 आणि इ. दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षांचा कालावधी लक्षात घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि निवडणुका वेळेवर घेण्याची जबाबदारी देखील व्यवस्थित पार पाडेल.
महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम

महानगरपालिका निवडणुकीसाठी 24 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टी व रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली 1 फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. तसेच याच दिवशी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 3 फेब्रुवारी असेल. 4 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याच दिवशी मतदान केंद्रांची मतदारनिहाय यादी प्रसिद्ध होईल. 16 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळात मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता किंवा सर्व केंद्रांवरील मतदान समाप्तीनंतर मतमोजणी होईल. स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊन दुसऱ्या दिवशी ही मतमोजणी होऊ शकते.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ (रुपयात)-
अ वर्ग महानगरपालिका (मुंबई) 1,35,000 वरून 5,00,000
ब वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर) 1,00,000 वरून 4,00,000
क वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक व नवी मुंबई)- 1,00,000 वरून 4,00,000.
ड वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) 1,00,000 वरून 3,00,000
जिल्हा परिषदा- 60,000 वरून 3,00,000
पंचायत समित्या- 40,000 वरून 2,00,000

मतदारांच्या सोयीसाठी-

राज्य निवडणूक आयोगाचे www.mahasec.com हे नवे अद्ययावत संकेतस्थळ
मतदान केंद्र मध्यवर्ती ठिकाणी.
उर्वरित महानगरपालिका, जि.प., पं. समितीसाठी मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल संख्या 800
रांगा टाळण्यासाठी मतदान केंद्रावरील कमाल मतदार संख्येत घट
अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था
अंध, अपंग, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य
राजकीय पक्षांच्या महत्वाच्या पुढाऱ्यांच्या प्रवास खर्चास उमेदवाराच्या खर्चातून सूट
आता मार्करपेनने मतदाराच्या बोटावर निशाणी
आधार कार्ड - सुद्धा चालणार
प्राण्यांचा क्रूरपणे वापर करण्यास मनाई.

जिल्हा परिषद/पंचायत समित्या निवडणूका
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे देण्यास 18 जानेवारीपासून सुरवात होईल व 23 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. छाननी व वैध उमेदवार यादी 24 जानेवारीला प्रसिद्ध होईल.

सोमवार, २ जानेवारी, २०१२

सचिन...सिडनी येथे महाशतक झळकण्याची अपेक्षा!

क्रिकेट जगताचा बादशहा...अगदी पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा खुर्चीला खिळवून ठेवणारा सचिन क्रिकेट खेळण्यासाठी कोणत्याही देशात गेला, तरीही मैदानावर जाताना मॅचचे प्रत्यक्ष वर्णन करणाऱ्यापासून अम्पायरसुद्धा खुश होणारच. शतकाचे महाशतक झळकवण्यासाठी योग्य संधीच्या शोधातल्या सचीनने गेल्या काही दिवसात संयम मात्र अजिबात सोडला नाही. सिडनी येथे सचिनचे हे शतक नक्की झळकणार असल्याची अपेक्षा अनेक चहाते व्यक्त करीत आहेत.

विशेष म्हणजे क्रिकेटमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आजपर्यंतचे खेळाडू पाहिले तर या सगळ्यांची उंची जेमतेमच असल्याचे सहज जाणवते. सर ब्रॅडमन, रिकी पॉइंटिंग, सुनिल गावस्कर ही नावं यासाठी लगेच डोळ्यासमोर येतात. यांची उंची कमी असली तरीही शारीरिक आणि बौद्धिक उंची फारच उंच आहे. तिथपर्यंत पोहोचायला अजून अनेकांना बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रविवार, १ जानेवारी, २०१२

नूतनवर्षाभिनंदन...

प्रिय वाचकबंधूंनो...
आमचे भारतासह समस्त युनायटेड स्टेट्स, नॉर्वे, तैवान, कॅनडा आदी देशांमधील वाचकबांधव, हितचिंतक, मार्गदर्शक, अभ्यागतांना इंग्रजी नववर्ष 2012 च्या हार्दिक शुभेच्छा...!

रविवार, २५ डिसेंबर, २०११

मुखेड नगरपरिषदेसाठी ७३ टक्के मतदान

मुंबई, ता. २५- नांदेड जिल्ह्यातील मुखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज ७३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणुक आयोगाने व्यक्त केला आहे. येथे एकूण १७ जागा असून दुपारपर्यंत सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये: निवडणूक आयोग

मुंबई, ता. २३ - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात प्राण्यांचा वापर क्रूरपणे न करण्याचे आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३४३ के व २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांचे नियंत्रण आणि संचलन राज्य निवडणूक आयोगाकडून केले जाते. या निवडणुकांदरम्यान काही उमेदवार किंवा राजकीय पक्ष निवडणूक प्रचारासाठी किंवा काही बाबींचा निषेध करण्यासाठी प्राण्यांचा वापर करतात, असे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले आहे. बैल, हत्ती, गाढव आदी प्राण्यांना अमानवी पद्धतीने वागविले जाते. गाढवांना चपलांचा हार घालणे, त्यांच्या तोंडाला काळे फासणे यासारखे क्रूर प्रकार करून प्राण्यांचे हाल केले जातात. हे प्रकार अमानवी असल्याने प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० च्या उद्देशांशी विसंगत आहेत. यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात किंवा त्यासाठीच्या मिरवणुकांमध्ये प्राण्यांचा वापर क्रूरपणे करू नये. या सूचनांचे पालन न करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले असल्याचे राज्याचे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.

सहा नगरपरिषदांसाठी ६८ टक्के मतदान

मुंबई, ता. २३- नांदेड जिल्ह्यातील पाच आणि लातूर जिल्ह्यातील एक अशा सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) झालेल्या मतदानात सरासरी ६८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या सहा नगरपरिषदांसाठी शुक्रवारी (ता. २३) मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत कुंडलवाडी येथे सर्वाधिक ५९.२७ टक्के तर कंधार येथे ५८.४६ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर सर्वच ठिकाणी मतदानास वेग आला. सर्व सहा नगरपरिषदांसाठी सरासरी ६८ टक्के मतदान झाले असून कुठेही अनुचित घटना घडली नसल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

...अखेर "हिंग्लिश" च्या पगड्याची पगडी बसली डोक्यावर!

आजकालच्या मुलांना भेसळीचे खाण्याची सवय झाली आहे, शुद्ध तुपातले अन्न खाल्ले तर, त्यांचे पोट बिघडते, अपचन होते...अशी वाक्य अनेकदा ऐकू येतात. देशातल्या अनेक भाषांच्या बाबतीतही जवळपास असेच झाले आहे. प्रामुख्याने देशात व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या दोन प्रमुख भाषा मानण्यात येणार्‍या हिंदी आणि इंग्रजी यांचे मिश्रण म्हणजेच हिंग्लिश वापरण्याची मुभा शासनानेच आता अप्रत्यक्षपणे दिली आहे...

अवघ्या दशकापूर्वी अतिशय शुद्ध स्वरूपात बोलल्या जाणार्‍या जवळपास अनेक प्रादेशिक भाषांमध्ये आता इंग्रजीने शिरकाव केला आहे. देशावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या ब्रिटिशांनी देश सोडून जाता-जाता चहा आणि सॉरी हे दोन शब्द इथेच सोडले, अन् बस्स...चहा नसला तर अनेकांना चुकल्यासारखे वाटणे, कामे न होणे यासारखेच अगदी भाषांचेही झाले आहे. दररोजच्या बोलण्यात, शब्दप्रयोगात इंग्रजी शब्द नसला तर चुकल्यासारखे वाटते. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरांपासून याला अप्रत्यक्षरित्या सुरूवात झाल्याचे जाणवते, नव्हे, इंग्रजी चा मोठ्या प्रमाणावर भाषांमध्ये शिरकाव होणार असल्याचे जणू ते सूतोवाच ठरले..

अनेक सुशिक्षित अथवा मोठ्या शहरांमध्ये शिकणारी मुलं आपसात बोलताना एखादा शब्दप्रयोग मुद्दामच इंग्रजीमध्ये करून आपल्याला इंग्रजीचे ज्ञान असल्याचे दर्शवित असल्याचा आरोप जनसामान्यांकडून तेव्हा केला जात होता. मात्र आज राजरोसपणे इंग्रजीच्या अनेक शब्दांनी बोलीभाषेत दखल देऊन (किंवा आपल्यासारख्यांनीच आणून) प्रादेशिक भाषांवर आक्रमण केले आहे.

सध्या मिंग्लिश आणि हिंग्लिश अशा दोन उपभाषाच जणू उदयास आल्या आहेत. मराठमोळ्या संस्कृतीत केक येऊन तर थोडाफार इंग्लिश कल्चर ने प्रवेश केला होताच...त्यात भरीस भर म्हणून दररोजच्या संवादात सुद्धा इंग्रजीचा वापर करणे सुरू झाले. मराठी + इंग्लिश आणि हिंदी + इंग्लिश अर्थातच सर-मिसळ होऊन खरोखर मिसळच झाली आहे...दररोज दिवसाची 'सुप्रभातम्' ने होणारी सुरवात आता 'हाय' ने आणि शेवट 'बाय' ने होतोय, सरासरी दहा घरांपैकी आठ घरांमध्ये हेच चित्र आहे. कॉन्व्हेंट चा ट्रेंड आता झाल्यामुळे शुद्ध हिंदी, मराठीत बोलणारी मुलंसुद्धा अनेकदा इंग्रजीतले अनेक शब्दप्रयोग बोलण्यात करतात. हिंदी अथवा मराठी भाषांमध्ये इंग्रजाळलेल्या हिंग्लिश आणि मिंग्लिश यांचा पगडा नक्कीच बसला आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात इंग्रजी भाषा येणं जरी काळाची गरज ठरली असली, तरीही मराठी असो किंवा हिंदी...कोणतीही मातृभाषा काळाच्या ओघात मागे पडणार नाही, मोडी प्रमाणे मोडणार नाही, ही प्रत्येकाची जबाबदारीच नव्हे, कर्तव्य ठरले आहे!

१८ नगरपरिषदांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान

मुंबई, ता. १३ - राज्यातील १८ नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. १३ डिसेंबर) सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली, असे राज्याचे निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी कळविले आहे.

मतदान झालेल्या नगरपरिषदांची जिल्हानिहाय नावे- पुणे- दौंड, अहमदनगर-संगमनेर, सातारा-सातारा, पाचगणी, सांगली-इस्लामपूर, उस्मानाबाद- उस्मानाबाद, तुळजापूर, पारंडा, लातूर-औसा, अमरावती-अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, अकोला-अकोट, मूर्तिजापूर, नागपूर-खापा, कामठी, चंद्रपूर-बल्लारपूर, सोलापूर-मैंदर्गी इ.

सर्वाधिक ७२ टक्के मतदान तुळजापूर आणि पारंडा येथे झाले. कुठेही अनुचित प्रकार किंवा अप्रिय घटना घडली नाही, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...