सोमवार, २ मे, २०११

नवी मुंबई मेट्रो शहराचा चेहरा बदलणार: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई, ता. १ - नवी मुंबईने सर्वांगीण विकासासाठी वेग घेतला आहे. ही निश्चितच आदर्शदायी बाब आहे. देशातील पहिला मेट्रो प्रकल्प स्वतः सिडको महामंडळाकडून राबविण्यात येत आहे. विमानतळ व मेट्रो सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच राज्य शासन व सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारे भविष्यातील विविध प्रकल्प आधुनिक पद्धतीने उभारून नवी मुंबई उपनगराचा 'सुपरसिटी' असा विकास करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. प्रकल्पावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
श्री. चव्हाण यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या विकासकार्याचे भूमिपूजन रविवारी (ता. १ मे) सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वे स्थानक (नियोजित) नवी मुंबई येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. श्री. चव्हाण पुढे म्हणाले, की नवी मुंबईतील अंतर्गत परिवहनास अधिक व्यापकता व गती देण्याची क्षमता या प्रकल्पात असून, नवी मुंबई प्रकल्पाची उभारणी ही सर्वस्वी सिडको महामंडळाची आहे. या प्रकल्पामुळे नागरीकरणास चालना मिळेल आणि यामुळे आर्थिक प्रगती सुद्धा साधली जाईल. विमानतळापाठोपाठ मेट्रो रेल्वे प्रकल्प व नागरीक सुविधा विकासाला मानवी चेहरा प्रदान करेल.
कार्यक्रमास जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादनशुल्क व अपारंपारिक उर्जामंत्री व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, खासदार डॉ. संजीव नाईक, सिडको संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ११.१० किमी. लांबीच्या बेलापूर ते पेंढर मार्गिका क्र. १ च्या बांधकामास १९८४ कोटी खर्च अपेक्षित असून ११ रेल्वे स्थानके बांधण्यात येतील. हे काम १ मे २०१४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी तर आभार मुख्य अभियंता बिपीनचंद्र मेहता यांनी मानले.

सुट्टीची भटकंती...(८)

घरी परत जायचं मामीला सांगितल्यानंतर मामीन आणखी दोन दिवस राहण्याचा आग्रह केला. खूपच आग्रह झाल्यामुळे मी सुद्धा होकार दिला. आज मामी पापडाचा..बिबडी..हा प्रकार तयार करणार होती. माझ्यासाठी हा प्रकार नवीन होता. पहाटे साडेतीनला काहीतरी खुडबुड ऐकून मला जाग आली. पाहतो, तर मामी स्वयंपाकघरात काहीतरी करत होती....(काही कारणास्तव उर्वरित भाग उद्या...)

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न


नवी मुंबई नियोजित मेट्रो रेल्वे स्थानकाचेभूमिपूजन आणि प्रकल्पाचा शुभारंभ कुदळ मारून करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण   



ओसामा अखेर संपला..ओसामाचे अलकायदा आता पडणार ओस...

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या सीमेनजीक वेगात सुरू केलेल्या ओसामा शोध मोहिमेस रविवारी मध्यरात्री (ता. २ मे) अखेर यश मिळाले. अमेरिकेच्या पथकास अपेक्षित यश मिळून ओसामाला ठार मारण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यामुळे सुमारे तीन हजार लोक या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. ओसामाचा म्होरक्या ओसामा लादेन याचे यामागे मास्टरमाईंड असल्याचे मानले जात होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, "दहशतवाद्यांविरुद्ध अमेरिकेची लढाई अशीच सुरु राहणार असून, अल कायदाविरुद्धच्या लढाईतील हा सर्वात मोठा विजय आहे. आमची लढाई इस्लामविरुद्ध नसून, दहशतवाद्यांविरुद्ध आहे. या मोहिमेत पाकिस्तानी सैन्याची अमेरिकी सैन्याला मदत झाल्याने मी त्यांचे आभार मानतो."
दरम्यान ओसामा याला ठार मारल्यास अमेरिकेस आणखी गंभीर परिणाम भागावे लागतील अशी माहिती गेल्या आठवड्यात अल कायदा या संघटनेने दिल्याचे वृत्त आहे. ओबामा यांनी लादेनला ठार मारल्याची घोषणा केली तेव्हा व्हाईट हाऊसबाहेर अनेक अमेरिकी नागरिकांची गर्दी जमली होती.
ओसामा ठार झाल्यामुळे आता ओसामाची संघटना अल कायदा ही संघटना नक्कीच ओस पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी

मुंबई, ता. 28 - येत्या एक मे स महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षस्थानी असतील.
नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पातील ११.१० किमी लांबीच्या व ११ स्थानकांचा समावेश असलेल्या "बेलापुर ते पेंढार" मार्गिका क्रमांक एक चे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. सेंट्रल पार्क मेट्रो रेल्वेस्थानक (नियोजित) सेक्टर - २४, खारघर, नवी मुंबई येथे रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून यावेळी, जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, राज्य उत्पादन शुल्क व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, सिडको अध्यक्ष नकुल पाटील, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्यासह खासदार गजानन बाबर, संजीव नाईक,  आमदार व सिडको चे संचालक सुभाष भोईर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विवेक पाटील, संदीप नाईक, आदी मान्यवर उपस्थित राहतील. असे सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, मुख्य अभियंता व महाव्यवस्थापक (तांत्रिक) सिडको - बिपीनचंद्र मेहता आणि सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी कळविले आहे.

मध्य प्रदेशही तापले...

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात दिवसाचे कमाल ३८ अंश सेल्सिअसवर स्थिरावलेले तापमान वाढून काल (ता. २८ एप्रिल) कमाल ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही भागात पारा ४१ अंश सेल्सिअसवर सरकला आहे. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी झाली असून अनेक ठिकाणी ऊसाचा रस, कोल्ड्रिंक, शीत पेयांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. काही भागात दिवसातून अनेकदा विद्युत पुरवठा खंडीत होत असून रात्रीही डासांचा त्रास होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये डासांचा उपद्रव झाला असून नागरीकांनी प्रशासनाकडे परीसरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता.
नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामुळे मी न रहावून मामीला विचारलं..हे चूर्ण हिंग्वाष्टक चूर्ण होतं. अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं होतं. नंतर पोटही थोडं शेकलं. यामुळे जणू काही जादूची कांडीच फिरली होती. डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज भासली नाही. आपण म्हणतो आयुर्वेदाच्या औषधांमुळे खूप उशीरा बरं वाटतं, पण हा अनुभव मी स्वतः घेतला होता. ऍलोपॅथीचं औषध सुद्धा दोनदा घ्यावच लागतं की...। मग आयुर्वेदाला नावं कशाला ठेवायची? या आजीबाईच्या बटव्यात यासह त्रिफळा चूर्ण, कस्तुरी गोळ्या, त्रिभुवन कीर्ती रस, चंद्रप्रभा वटी, शंखवटी, श्वासकासामृत सिरप, ज्येष्ठमधचूर्ण, सुठ, दालचिनी, थोडी हळद, मिरपूड, जिरपूड, कदली क्षार, जायफळ, वेखंड, पानपिंपळी, वेलदोडा, लवंग, कांदा, दुर्वा अशी कितीतरी सामुग्री होती. यापैकी बर्‍याच गोष्टी तर दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात.
आज मामाच्या शेतातल्याच आंब्याच्या झाडाच्या कैर्‍यांचं पन्हं आणि गवतात पिकवलेल्या आंब्यांचा रस, पुरी असं पुन्हा एकदा हेवी जेवण होतं. मामीने जेवणात गरम पाणीच प्यायला सांगितलं होतं. मी सुद्धा तसच करून नंतर पुन्हा एकदा मामीने तयार केलेला दुसर्‍या औषधाचा डोस घेतला. गावात यात्रा सुद्धा आली होती. सहज यात्रेत फेरफटका मारायला गेलो. यात्रेत डफडी, भोंगा, बासरी, बॅट सगळ्याच वस्तू होत्या. विविध स्टॉल्स होते. काय काय होतं सांगू? एक विशेष म्हणजे गावात जास्त जाड असे कोणीही नव्हते. स्थूल व्यक्तिमत्व होतं पण आजारी असं कोणीही दिसलं नाही किंवा शहरातल्या माणसांसारखी पोटंही कोणाची हातावर नव्हती. याचं कारण म्हणजे दररोज फिरायला जाणं, शेतावर जाऊन काम करणं हे असावं. शहरात आपण एकाच जागेवर तासन् तास बसलेलो असतो, घरी असताना टीव्ही समोर, आणि ऑफिसमध्ये असताना पीसी समोर...परिणामी अनेक विकार आम्हांला जडले आहेत. ग्रामीण भागात भार नियमनामुळे टीव्ही तर कमीच पहायला मिळतो. शेतात न गेल्यास खाणार काय? असा प्रश्न पडतो...खरंच गावाकडचं वातावरण आणि जीवन किती छान आहे...हे मी अनुभवलं आणि दुसर्‍या दिवशी परत घरी जाण्याचं ठरवलं...

गुरुवार, २८ एप्रिल, २०११

नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्राची मोठी हानी - छगन भुजबळ

मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक नारायण आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत पातळीवर माझा एक चांगला मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, नारायण आठवले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय योगदान दिले. 'लोकमित्र', 'लोकसत्ता' या दैनिकांतील पत्रकारितेबरोबरच 'गोमंतक'चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत परंतु अत्यंत नि:पक्षपाती व परखड लिखाण केले. सत्तरच्या दशकात आम्ही चालविलेल्या 'प्रभंजन' या साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही नारायण आठवले यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. या साप्ताहिकात 'अनिरुध्द पुनर्वसु' या टोपणनावाने त्यांनी केलेले ललित लेखन त्या काळात खूप गाजले. 'चित्रलेखा'मधील त्यांचे लेखही चांगलेच गाजले. सन 1996मध्ये शिवसेनेतर्फे लोकसभेवर खासदार म्हणून त्यांना केवळ अठरा महिने काम करण्याची संधी लाभली तरी, तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्यासमोर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाविषयी आवाज उठविण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली होती. या विविध क्षेत्रांतले त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असेही भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.

दरम्यान, खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनीही नारायण आठवले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एक अत्यंत हुशार व जाणकार पत्रकार, लेखक म्हणून लौकिक असलेल्या आठवले यांच्या निधनामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आजच्या पत्रकारांनी आदर्श घ्यावा, अशी पत्रकारिता नारायण आठवले यांनी केली. पत्रकारितेची मूल्ये जोपासत असताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही, अशा भावना आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

सुट्टीची भटकंती...(६)

...सकाळी उठून गावात फेरफटका मारावा या उद्देशाने तयार झालो आणि गावात गेलो. अगदी गावाच्या सीमेपर्यंत पोहोचलो. गावाच्या सीमेवर अगदी टिप्पीकल वास येत होता...तसाच उलट पावली परत फिरलो. शासनाची शौचालयासंदर्भात असलेली योजना स्वीकारण्यास अजूनही ग्रामस्थ मंडळी तयार नाहीत असं दिसलं. ठराविक घरांमध्येच किंवा घराबाहेर सिट्स बसविल्याचं लक्षात आलं. खरंतर शासनाच्या अनेक चांगल्या योजना असतात, पण त्या व्यवस्थित राबविल्या जात नसाव्या किंवा पोहोचत नसाव्या. खर्च तर होऊन जातो, हे मी तुम्हांला मागेही सांगितलंच (कदाचित हा उल्लेख अनेकदा होईल). हो, एक मात्र आहे. शासनाने ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे राबविणार्‍या ग्रामपंचायतीला, पालिकेला बक्षिस, पुरस्कार, काही सवलती जाहीर केला असल्यामुळे अनेक गावं ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल, यशस्वी कशी होईल याचा विचार करतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीही करतात. या गावात सुद्धा तसंच चित्र होतं. गावात ठिकठिकाणी गल्लीच्या कोपर्‍यावर कचरा-कुंडी ठेवली होती. तसंच कचरा गोळा करण्यासाठी दररोज सकाळी ठराविक वेळेत कचरा उचलणारी गाडी, कर्मचारी किंवा घंटागाडी येत होती. ही घंटागाडी थोडी मोठी असल्यामुळे अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊ शकत नव्हती. तिथे गल्लीच्या तोंडावर गाडी थांबून कर्मचारी थेट आतमध्ये येऊन कचरा नेताना दिसत होते. सगळा कचरा गोळा करून गावापासून सरासरी पाच ते सहा किलोमीटर दूर नेऊन तिथे स्वतंत्र व्यवस्था केली होती. कचर्‍यातलं प्लॅस्टिक इथे वेगळं केलं जायचं. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्ज वापरण्याची बंदी इथेही घातलेली होती. म्हणून शासनमान्य प्रमाणातील कॅरी बॅग्ज किंवा कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह केला जात होता (कॅरी बॅग ला..मी गंमतीने वाहक पिशवी असं म्हटलं आणि आमच्या मामाला हसू आलं).
गावातल्या काही धनाढ्यांकडे खूप गाई होत्या. त्यांनी गावाबाहेर छानसं फार्म हाऊस तयार केलं होतं. इथून दूध शहरांमध्ये पाठवलं जायचं. तसंच गावच्या सरपंचाने तर दुधापासून तयार होणार्‍या पदार्थांचा छोटासा कारखानाच सुरू केला होता. त्यालाही प्रतिसाद चांगला होता. हा कारखाना बघण्याची मनात इच्छा होती. सरपंच चक्क बी. एस्सी. पीएच. डी. असल्यामुळे संशोधनातही त्याला अभिरूची होती. त्या दृष्टीने तो सुद्धा याव्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न करतोय असं वाटलं.
घरी परत येताना बस स्थानकाशेजारच्या हॉटेलमधून मस्तपैकी वड्यांचा आणि मिसळीच्या रस्श्याचा वास आला. आज वडा-पाव आणि मिसळ खायची असा विचार केला आणि हॉटेलमध्ये शिरलो. पाहिलं तर थोडंस अस्वच्छ असं हॉटेल होतं. इतक्या सकाळी सुद्धा गावातल्या नागरिकांप्रमाणे माशाही उठलेल्या जाणवलं. पण विचार केला, इथले लोक तर इथे खातातच आपण ही खाऊन पाहू...वडा-पाव खायला सुरवात केली, मात्र...पाव वडा खायला सुरवात केली आणि काय विचारता। तिखट पण खावा असाच वाटणारा तो वडा होता. नाकातून पाणी यायला आणि कान खाजवायला सुरवात झाली. ऑर्डर प्रमाणे त्यांनी संगळं दिलं होतं आता खाणं आवश्यकच...। कमी गर्दी असल्यामुळे हॉटेलच्या मालकाला ते लक्षात आलं. जवळ येऊन त्याने, नवीन दिसताय? कुठून आलात? जास्त तिखट लागलं का? अरेरे...अरे, थोडा कलाकंद आण पाहू...असं एका वेटरला(कळकट कपड्यातल्या पोर्‍याला) सांगितलं. कलाकंद खाल्ल्यानंतर जरा बरं वाटलं. माझ्या समोर बसलेला एक माणूस तर चक्क मिरची कचाकचा खात होता..ते पाहून तर मलाच चर्र झालं. मिसळही खाल्ली, वरून मुद्दामच हॉटेलचा चहा प्यायलो. बिल द्यायला गेलो, मात्र खिशात पैसे थोडे कमी होते. असं कुठे जाऊ याची शक्यता नसल्याने मोजके पैसेच खिशात ठेवले होते. आता काय करावं? या विचारात असताना हॉटेलच्या मालकाने ते ओळखलं आणि तुम्हा पाहूणे आहात, राहू द्या पैसे. असं सांगितलं आणि घेतलेले पैसेही परत केले. मी खूप आग्रह केला तरी घेतले नाहीत...गावच्या माणसांच्या मायेचा ओलावा आणि शहरातील शुष्कता रूक्षपणा यावरून माझ्या लक्षात आला..!

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...