सोमवार, १७ जानेवारी, २०११

आदर्श जमीनदोस्त करणे म्हणजे सर्वच नष्ट...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. यानंतर आदर्श प्रकरण संसद व विधानसभेच्या सत्रात चांगलेच गाजले होते. फाईल गहाळ होणे, विविध प्रकरणांची चौकशी लागणे आदी घडामोडींनंतर आता आदर्शची इमारतच जमीनदोस्त करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. तीन महिन्यात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. प्रकरण काँग्रेसवर चांगलेच शेकले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत असून इमारत जमीनदोस्त करणे म्हणजे संपूर्ण प्रकरणावरच पडदा टाकून जनतेला शांत करण्यासारखे असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन- २०११ चे बक्षीस वितरण

मुंबई, ता. १६ - सुमारे ३८ हजारांहून अधिक देशी-विदेशी नागरिकांचा सहभाग लाभलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन-२०११ मधील विजेत्यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुंबई मॅरेथॉनमधील ४२ किलोमीटर लाँग-रन मध्ये आज इथिओपियाच्या गिरीमा असेफा याने विजेतेपद मिळविले. इथिओपियाच्याच बोटो सिगाए वोल्ड याने द्वितीय तर केनियाच्या पॅट्रिक मुरिकी याने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात देखील इथिओपियाचेच वर्चस्व कायम राहिले.
भारतीय धावपटूंच्या गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे राहिले. प्रारंभी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, मंत्री जयदत्त क्षीरसागर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, गोरी खान, परमेश्वर गोदरेज आदींनी सहभाग घेतला होता.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत वसई कृत संगीत संशयकल्लोळ द्वितीय

मुंबई, ता. १६ - राज्य शासनाने आयोजित केलेल्या ५० व्या महाराष्ट्र राज्य व गोवा संगीत नाट्य स्पर्धेत वसई येथील मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या पाईकदेव  भोलनाथ संस्थेच्या संगीत मीरा मधीरा या नाटकास ३५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ चे दिग्दर्शन हृदयनाथ कडू यांनी केले होते. अश्विनीशेठ ची भूमिका करणारे दशरथ राऊत यांना साभिनय गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृत्तिकेची भूमिका करणारी श्रीयंका देसाई व भादव्याच्या भूमिकेसाठी महेश पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ऑर्गन व तबल्यासाठी श्रीरंग परब व श्रीनिवास शेंबेकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर

पुणे, ता. १७ - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. पंडित भीमसेन जोशी यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक मात्र स्थिर आहे. त्यांच्यावर हिमोडायलिसिस करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

प्रेमासाठी..वाट्टेल ते...!!!

प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां...
प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्‍याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले.
सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती.
नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..?
अटी अशा-
१). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा.
२). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे.
३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद.
४). पे अकाउंट दोघांचे संयुक्त खाते असेल.
५). घर खर्चात सुरवातीला नवरोबाचे पैसे वापरले जातील.
६). घर खरेदीची रजिस्ट्री (व्यवहार) सौभाग्यवतींच्या नावावर होतील.
७). सौं. नी मोबाईलवर कॉल केल्यानंतर लगेच पिक केला जाईल, टाळंटाळ करणार नाही.
८). दारू सौं. ना विचारून नंतरच प्यावी.
९). नवरोबा आपल्या आईस भेटण्यास जाणार नाही.

नवरोबांवर अशा नऊ अटी लादून प्रेयसी त्यांची सौभाग्यवती झाली होती.
# @ असलं प्रेम नक्कोच नको.. प्रेमासाठी वाट्टेल ते..म्हणतात नां, ते हेच!

पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी

ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची अपिरिमित हानी झाली आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
प्रभाकर पणशीकर यांनी "तो मी नव्हेच" मधील लखोबा लोखंडेच्या भूमिकेसह अनेक नाटकांमध्ये साकारलेल्या विविध भूमिका अविस्मरणीय ठरल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे निधन

"तो मी नव्हेच" सह विविध भूमिका साकार करून अभिनयास आकार देऊन ज्यांची छाप अखिल मराठी मनावर कायमची पडली असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर (वय ७९) यांचे गुरुवारी (ता. १३) रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासास त्रास होत असल्यामुळे आणि किडनी बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पर्यटनवृद्धीसाठी भारत व त्रिनिदाद यांच्यात द्वि-पक्षीय सहकार्य वाढविण्याची गरज

मुंबई, ता. १३ - भारत आणि रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यात पर्यटन क्षेत्रात द्वि-पक्षीय सहकार्य वाढीस लागावे यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री म्हणून प्रयत्न करण्यास आपल्याला निश्चितपणे आनंद वाटेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद व टोबॅगोचे पर्यटनमंत्री रुपर्ट ग्रिफीथ यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय शिष्टमंडळाने आज सकाळी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, विश्वविख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्यामुळे त्रिनिदादचे नाव जगभरात झाले आहे. या निसर्गसमृद्ध देशासोबत पर्यटन सहकार्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरवर्षी भारतातील सुमारे ११ दशलक्ष पर्यटक अन्य देशात पर्यटनासाठी जातात. वेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असणार्‍या कित्येक भारतीय पर्यटकांसाठी त्रिनिदाद हा उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. शिष्टमंडळाच्या होणार्‍या चर्चेतून सकारात्मक गोष्टी निश्चितपणे निष्पन्न होतील अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. ग्रिफीथ यांनी त्रिनिदाद व टोबॅगोचे राष्ट्रीय वाद्य असलेल्या स्टील-पॅनची प्रतिकृती श्री. भुजबळ यांना भेट दिली. यावेळी त्रिनिदाद व टोबॅगो उच्चायुक्तालयाचे अधिकारी, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक  अविनाश ढाकणे व पर्यटन विभागाचे उपसचिव राजीव निवतकर उपस्थित होते.

पुणे येथे शुक्रवारी पोलिसांची वार्षिक आढावा बैठक

पुणे, ता. १३ - पुणे शहराच्या पोलिस आयुक्त श्रीमती मीरा बोरवणकर आणि सहपोलिस आयुक्त अशोक धिवरे शुक्रवारी (ता. १४) दुपारी सव्वा बाराला पोलिस आयुक्त कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण (दाखल व उघड) व इतर चांगली कामगिरीबाबत वार्षिक आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी आढावा, गुन्हे प्रकटीकरण व इतर चांगल्या कामगिरीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येईल. बैठकीस अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, उत्तर, दक्षिण, तसेच पोलिस उपायुक्त गुन्हे आणि आर्थिक परिमंडळ १, २, ३, ४ उपस्थित राहतील.

मंत्रालयात मोफत आरोग्य तपासणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. १३- रस्ते सुरक्षा पंधरवाड्यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५० कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री. भुजबळ यांनी स्वतःची रक्त-साखर तपासून शिबिराचे उद्घाटन केले. शासकीय वाहनचालक व कर्मचार्‍यांनी आपल्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी भुजबळ यांनी केले.
दिवसभरात सुमारे ३५० वाहनचालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्रचिकित्सा, रक्तदाब तपासणी आणि ई. सी. जी. तपासणी करण्यात आली. डॉ. विपुल गट्टाणी, डॉ. मुख्तार देशमुख, डॉ. संदेश श्रीप्रभू, डॉ. अजित कोठावाला, डॉ. महेश रावखंडे, डॉ. मयूर जावळे, डॉ. समीर अन्सारी, डॉ. रविकिरण पवार, आदी डॉक्टरांनी तपासणी केली.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...