सोमवार, ३ जानेवारी, २०११

नव्या दशकाच्या दहा "द.." चा दम!


'गेलेला काळ आणि वेळ पुन्हा येत नसते' असे म्हणतात, म्हणून 'मिळेल त्या संधीचे सोने करावे' असा सल्ला वडिलधारे देतात. दहा वर्षाचा काळ देखील थोडा-थोडका नसतो. माणसाने त्याच्या आयुष्यातले वाईट दिवस विसरावे मात्र गतकाळ विसरू नये. "कालाय तस्मै नमः" प्रमाणे येणार्‍या काळाला, उगवत्या सूर्याला नमस्कार करावा. नुकत्याच पूर्ण झालेल्या दशकाल्या कळत-नकळत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये या अपेक्षेने नव्या जोमाने, उमेदीने कामाला सुरवात करावी...

नव्या दशकात शासनासह समाजातल्या सगळ्याच घटकांकडून या १० "द" च्या अपेक्षा:
            दहशतवाद निर्मूलन: आज भारतासह सगळ्या जगासमोर प्रमुख मुद्दा बनलेले संकट दहशतवाद हे आहे. काही देश आपल्या सीमेलगत असलेल्या देशांची जमीन बळकावण्यासाठी तर काही देश दुसर्‍या देशात हिंसाचार वाढवण्यासाठी दहशतवादी तयार करत आहेत, येन केन प्रकारेण त्यांना मदत करून दहशतवादास खतपाणी घालत
आहेत. सध्या भारतावर तिसरी महाशक्ती म्हणून पाहिले जात आहे. आजमितीस देश संरक्षण क्षेत्रात सुद्धा बर्‍यापैकी विकसित झाला असून जमीन, पाणी आणि अंतराळ अशा तीनही ठिकाणी वापरता येणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्यात भारताला यश मिळाले आहे. इतकेच नव्हे, तर मानवरहित टेहळणी विमान देखील भारत आता बनवू शकतो. परंतू इतका सगळा साठा, सज्जता, परिपूर्णता असूनही देशावर दहशतवादाचे संकट आहे. देशाच्या महानगरांइतकेच महत्वाच्या शहरांवर आता अतिरेकी आपले लक्ष्य केंद्रित करीत आहेत. अतिरेक्यांच्या या नापाक कृत्त्याला शेजारी राष्ट्र चिथावणी देत आहे ही बाब जगजाहीर आहे. परंतु सध्या महासत्ता असलेले देश भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना
व्यवस्थित कुरवाळत असून जखमांवर मीठ चोळण्यात यशस्वी होत असल्याचेच अभ्यासाअंती जाणवते. दहशतवाद्यांनी थेट संसदेवर आणि मध्यंतरी मुंबईवर हल्ला करून देशाच्या सुरक्षेलाच आव्हान दिले आहे. परंतु राजकीय निर्णय प्रक्रियेमुळे सुरक्षा यंत्रणा काहीही करण्यात हतबल झाल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासारख्या महनीयांच्या या देशात शांतता प्रस्थापित होण्याऐवजी दिवसेंदिवस हिंसेचा आलेख वाढत असल्याचे दृश्य असून खर्‍या अर्थाने देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दहशतवाद निर्मूलन ही काळाची गरज ठरली आहे.

दारिद्र्य निर्मूलन: देशातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या कमी करायचे वास्तविकतः सरकारचे धोरण आहे, नव्हे योजना आहे. परंतु सातत्याने वाढणार्‍या महागाईमुळे दारिद्र्य रेषा उंचावते आहे. वाढत्या महागाईचा परिणाम श्रीमंतांवर आणि बड्या मंडळींवर अजिबात होत नाही. शासकीय कर्मचार्‍यांना देखील दरवर्षी बोनससह आयोगाच्या शिफारसींनुसार गलेलठ्ठ वेतन मिळत असल्यामुळे त्यांच्यावरही याचा फारसा परिणाम होत नाही. झळ बसते ती केवळ मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, काही अंशी खासगी क्षेत्रात नोकरी करणार्‍या घटकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाच...! नुकतेच लोकप्रतिनिधी आमदार-खासदारांचे वेतन देखील वाढले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर
कोट्यवधींचा बोजा पडणार आहे. शासनास प्रचंड महसूल देऊ शकणार्‍या वीज कंपनीला सुद्धा भारनियमन आणि मोफत वीज, चुकवेगिरी यामुळे नुकसान होऊन परिणती वीज दरवाढीत झाली आहे. हा सर्व पैसा शासन सामान्य नागरिकांकडूनच कर रुपात वसुल करते. तुटपुंज्या वेतनात मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांना इतकी देणी देणे शक्य नसल्यामुळे त्यांचा आर्थिक दर्जा घसरून दारिद्र्य रेषा उंचावत आहे. शासनाने विविध प्रकारचे लादण्यात आलेले कर कमी करून सामान्यांना दिलासा देणे व तुलनेने दारिद्र्य निर्मूलन करणे गरजेचे आहे.

दौर्बल्यमुक्ती: दौर्बल्य अर्थातच दुबळेपणा...एखाद्या विषयावर पक्का, योग्य निर्णय घेऊ न शकणार्‍या विशेषतः युवकांना याची गरज आहे. इंटरव्ह्यू ला जाताना तयारी करून गेल्यानंतर देखील अनेकदा प्रत्यक्ष उत्तर/उत्तरे देऊ न शकणार्‍या युवकांना पालक, शिक्षकांनी मानसिकरित्या उत्तम तयार करणे व आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे. सध्याचा काळ हा प्रचंड धावपळीचा आहे, नोकरी करेन, तर अमुक एक नोकरीच करेन..अमुक-अमुक पदाचीच नोकरी करेन..। असे म्हणण्याचा काळ आता जवळपास संपुष्टात आला आहे. येत्या दशकात स्पर्धा वाढणार असून परिणामी मिळेल ते काम आणि मिळेल ती नोकरी करून मिळतील तितके पैसे (शक्यतो जास्त पगार) पदरात पाडून घेण्याची ही वेळ आहे.
अपेक्षानुरूप नोकरी अथवा काम न मिळाल्यास हिरमोड होऊ न देता दुसर्‍या नोकरी, उद्योग-व्यवसायाच्या शोधार्थ जाण्याचीच ही वेळ आहे.

दरडोई उत्पन्नवाढ: शासनाने दरडोई उत्पन्नवाढ चांगल्या प्रकारे होऊन प्रत्येक नागरीक किमान कुटुंबापुरते तरी अर्थार्जन करू शकेल इतकी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

दंडूकेशाही: लोकशाही असलेल्या या देशात आजही दंडूकेशाहीचा वापर राजरोसपणे सुरू आहे. समाजाला घडविण्यात, दिशा देण्यात, शासन आणि समाज, नागरीक यांना जोडणारा मधला दुवा मानल्या जाणार्‍या मीडिया अर्थातच वृत्तपत्र क्षेत्रास दंडूकेशाहीचा अनुभव मोठ्या प्रमाणात येत आहे. आपले मत, मते परखड, निर्भिडपणे मांडण्याचे स्वातंत्र्य..हा विषय हळुहळू बंद होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सद्य स्थितीत राजकारणी मंडळी देखील वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश करीत असून परिणामी काही वृत्तपत्रं मुखपत्र बनली आहेत. दंडूकेशाहीची झळ सर्वाधिक वृत्तपत्र क्षेत्राचा कणा असलेल्या बातमीदार, पत्रकार, प्रतिनिधी या घटकाला बसते. गावपातळीवर एखाद्या दैनिकात संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दंडूकेशाहीचा वापर आजही होत आहे. आगामी दशकात शासनाने याबाबत आचारसंहिता, कायदा अस्तित्वात आणण्याची गरज आहे.

दायित्व: समाज आणि शासन या दोन्ही घटकांचे एकमेकांविषयी दायित्व, जबाबदारी असून कोणीही आपले दायित्व विसरू नये. येत्या दहा वर्षात राजकारणी, राजकीय पक्ष प्रबळ होतील. नवीन राजकारणी, राजकीय पक्ष जन्माला येतील. केवळ स्वार्थासाठी कार्य न करता समाजातील प्रत्येक घटकाने आपले दायित्व ओळखून एक नागरीक या भावनेने कार्य केल्यास भारत प्रथम क्रमांकाची महासत्ता म्हणून निश्चितच ओळखला जाईल.

देशभक्ती: कोणतेही जाती-पातीचे राजकारण न करता केवळ समाजकारणासाठी राजकारण करून प्रत्येकात असलेली देशभक्ती जोपासल्यास सर्व-धर्म-सम-भाव संकल्पना सार्थ ठरेल. भारतात स्थायिक झालेल्या परंतू मूळ दुसर्‍या देशाचे नागरीक असलेल्या नागरिकांनी देखील आपण आता भारत देशाचेच नागरीक असून देशाशी एकनिष्ठ राहण्याची देशभक्ती अंगी बाळगल्यास खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जग भारताकडे बघेल आणि देशाच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाईल यात शंका नाही.

दूरदृष्टी: मुख्यत्वे प्रशासनाने दशकासह अर्थातच दहा वर्षांसह पुढील पाच दशकांची गरज ओळखून प्रकल्प राबविल्यास पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल.

दंडसंहिता बदल: दिवसेंदिवस लोकभावना, मते-मतांतरे, दृष्टीकोन, जनादर, हित-अहित, संधी-स्वार्थ अशा विविध गोष्टींमध्ये कालानुरूप बदल होत आहे. इतिहास पाहिल्यास दर दहा वर्षांनी काही ना काही बदल आणि गरजा मोठ्या
प्रमाणावर झाले असल्याचे लक्षात येते. परिणामी पूर्वीचे नियम, आचारसंहिता, घटना यात बदल करणे आवश्यक होत आहे. काही बाबतीत नियम कडक करण्याची देखील गरज आहे.

दरवाढ नियंत्रण: वारंवार केल्या जाणार्‍या विविध वस्तूंवरील कर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढीवर नियंत्रण करणे ही आज सामान्यातीसामान्य नागरिकाची गरज ठरली आहे. परिणामी शासनाच्या तिजोरीवर याचा भार पडून चुकवेगिरीचे प्रमाण बोकाळले आहे. समान दर आणि कर लागू केल्यास आगामी दशकात शासन आवश्यक तितका निधी जनयोजनांसाठी सहज प्रदान करू शकेल.

नव्या आशा-अपेक्षांचे स्वागत..

लेखणी च्या सर्व वाचक, हितचिंतकांना नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा! आपणां सर्वांच्याच सहकार्य आणि सूचनांमुळे आजपर्यंत लेखणीचे लिखाण अविरत सुरू आहे. हा प्रवास आणखी असाच किंबहुना यापेक्षाही चांगला सुरू रहावा असे वाटते.
आपण लेखणी कडून असलेल्या आपल्या अपेक्षा कळवाव्या, म्हणजे आणखी सुधारणा करता येईल.
आपल्या मित्रमंडळींना देखील लेखणी ची लिंक देऊन लेखणी ब्लॉग वाचावयास सांगावा, ही विनंती-प्रार्थना.

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

नाताळ, नववर्षानिमित्त शुभेच्छा

"लेखणी" च्या समस्त वाचक, हितचिंतकांना नाताळ आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
लेखणी वर आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि सदिच्छा असेच कायम राहो, हीच प्रार्थना...

पुन्हा एकदा नापाकांचे लक्ष्य: मुंबई

मुंबईत लष्कर ए तैय्यबा चे चार अतिरेकी शिरले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिल आहे. २६-११ ची घटना अजून शमत नाही तोच पुन्हा एकदा नापाक अतिरेक्यांचे लक्ष्य शांत आणि सर्वधर्मसमभावासाठी पवित्र मानल्या जाणार्‍या मुंबईकडे आहे.
शहरातील गर्दीची ठिकाणे, स्थानके, विविध धार्मिक स्थळे आणि अतीसंवेदनशील भागांना अतिरेकी लक्ष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. काही तासातच नाताळ सण सुरू होत असून लवकरच नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव याच्या उधाणाचा उत्साह पसरेल. या पार्श्वभूमीवर पोलिसांना व विशेष पथकास पाचारण करण्यात आले असून नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. २६-११ घटनेतील हाती लागलेला आरोपी कसाब हा पाकिस्तानचा नागरीक असल्याचे सबळ पुरावे देखील उपलब्ध झाल्याचे न्यायालयात सिद्ध करण्यात आले आहे. विविध क्लुप्त्यांनी कसाब स्वतःची सुटका न्यायालयातून करवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संसदेवर हल्ला करणार्‍यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आलेली असली तरीही अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतिंकडे प्रकरण गेले असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कसाबचे काय व्हायचे ते होईल परंतु मुंबईमध्ये सध्या शिरलेले हे चार अतिरेकी पोलिसांना सापडल्यास त्यांना पोलिसांनी कंठस्नान घालावे अथवा नागरिकांच्या सुपूर्द करावे असे अनेक नागरिकांचे मत आहे. बहुदा देशाच्या सुरक्षिततेसारख्या गंभीर प्रकरणांच्या घटनेतील आरोपींना अद्याप फाशी न दिली जाणे हे यामागील प्रमुख कारण असावे. मुंबईत प्रवेश केलेल्या या अतिरेक्यांची नावे अब्दुल करीम मुसा, नूर अबू इलाही, वालिद जिन्नाह आणि महफूज आलम आहेत. त्यापैकी वालिद जिन्नाहचे छायाचित्र पोलिसांना मिळाले असून ते प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात देखील मुंबईमध्ये दोन अतिरेकी शिरल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र हे अतिरेकी शोधण्यात पोलिस अथवा सुरक्षा यंत्रणेस अद्याप यश आलेले नाही. दोन वर्षापूर्वी इतकी गंभीर घटना घडून देखील सुरक्षा व्यवस्थेत कुठेतरी ढिलाई असल्याचे हे द्योतक अथवा यंत्रणेचे अपयश असल्याचे मानले जात आहे. आता तरी खडबडून जागे होऊन अतिरेकी शोधावे व भविष्यकाळात एकही अतिरेकी भारतात येणार नाही इतकी कडक सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात यावी, हीच अपेक्षा.

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

विठ्ठल महाराज यांच्या निधनामुळे प्रबोधनाचा वारसा खंडित

मुंबई, ता. २३- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल महाराज चौधरी यांच्या निधनामुळे भक्तीच्या मार्गाने प्रबोधनाचा वारसा पुढे नेणार्‍या व्यक्तीमत्वाला आपण मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
श्री. पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, की वारकरी संप्रदायाच्या शिक्षण परंपरेचा पाया घालणार्‍या आणि देशाला नवनवीन प्रवचनकार व कीर्तनकार देणार्‍या गुरुवर्य जोग महाराजांच्या संस्थेचे अध्यक्षपद चौधरी यांनी भूषविले, हेच त्यांच्या आयुष्यातील महान कार्य व महान गौरव आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेचे केलेले अत्यंत सखोल व भावगर्भ असे विवेचन हे जोग महाराज संस्थेचे वेगळे वैशिष्ट्य सांगता येईल. संस्थेच्या या वैशिष्ट्यात आणि लौकिकात मौलिक भर घालण्याचे कार्य चौधरी महाराज यांनी केले आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा वाढल्या

गेल्या आठवड्यात कांद्याने रडविल्यामुळे, काळ्या बाजाराचे व्यापारी हसले होते. कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. कांद्याचे प्रकरण ताजे असतानाच काही भागातील बाजारपेठेत टोमॅटो देखील निकृष्ट दर्जाचे  दाखल होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यासह भुईमुगाच्या तेलासह, साबुदाणा, शेंगदाणा, खोबरे, तीळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. महागाईविरुद्ध शासनाशी संघर्ष करण्याची तयारी विरोधी पक्ष करीत आहेत.

बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

क्षण आनंदाचा...

...तर रायगड जसाच्या तसा उभारू! -भुजबळ

मुंबई, ता. २२- केंद्र शासनाने रायगडच्या पुनरुज्जीवनाची आणि सुशोभीकरणाची परवानगी दिल्यास शिवकालीन रायगड जसाच्या तसा उभा करून दाखवू, असे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. "केसरी गौरव सन्मान २०१० पुरस्कार" वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राज्याला छत्रपती शिवरायांचा थोर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातले सुमारे साडेतीनशे गडकिल्ले त्याची थोरवी सांगतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. छत्रपतींचा हा वारसा जपून ठेवण्यासाठी त्यांची डागडुजी व सुशोभीकरण आवश्यक आहे. परंतु यासंदर्भात पुरातत्त्व खात्याचे नियम कडक आहेत. पडझड झालेल्या या गडकिल्ल्यांना भेट देऊन आपण छत्रपतींच्या आस्तित्वानं पावन झालेली माती अभिमानाने कपाळावर लावतो, मात्र इथे भेट देणार्‍या परदेशी पर्यटकांच्या मनात ही भावना असणं शक्य नसतं. ती निर्माण होण्यासाठी किमान तशा कल्पना येण्यासाठी तरी काही वास्तू आपण उभ्या करायला हव्यात. यासाठी प्रयोगादाखल रायगडच्या पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यास परवानगी देण्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत आपण विनंती केंद्र सरकारलाकेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे आगामी वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी देऊन पर्यटन क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, संस्था आणि तज्ज्ञांनी आपल्या सूचना द्याव्यात असं आवाहन केलं. राज्यातील प्रचलित, अप्रचलित पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छता, पायाभूत सुविधा विकास करण्याबरोबरच योग्य मार्केटिंग करण्यावर आपला भर राहिल, असेही ते म्हणाले.
"केसरी गौरव सन्मान २०१०" पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. अजित फडके, कृषी क्षेत्रात अनेक यशस्वी प्रयोग करणारे कॅप्टन प्रकाश थोरात, 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून काश्मिरी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी धडपडणारे संजय नाहर, धावपटू कविता राऊत, 'टाटा नॅनो' च्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणारे गिरीश वाघ, अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा समावेश होता. रोख रूपये एक्कावन्न हजार आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं.

"सावित्रीचे सावित्रीपण" पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई येथे मंगळवारी (ता. २१) प्रकाश धुळे यांच्या "सावित्रीचे सावित्रीपण" या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री सचिन अहिर, श्री. धुळे, नंदकुमार वाघ आदी.

उपमुख्यमंत्र्यांकडून पहिलवान बुचडे यांचे अभिनंदन

मुंबई, ता. २२- पंजाब येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत मानाचा "रुस्तम-ए-हिंद" किताब पटकावून सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी कामगिरी बजावलेल्या पहिलवान अमोल बुचडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अलिकडच्या काळात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. श्री. बुचडे यांनी ही कामगिरी बजावून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे राज्यात कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारात मोलाची भर पडून नवोदितांना निश्चितच प्रोत्साहन मिळेल. या शब्दात श्री. पवार यांनी बुचडे यांचे अभिनंदन केले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...