शुक्रवार, १६ मार्च, २०१२

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे.

श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महिला बचत गटाची व्याप्ती आणि कार्य वाढत आहे. या गटांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात चांगली तरतुद केली आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता यासाठी केलेली मोठी तरतूद ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यास निश्चितपणे हातभार लावील, असा विश्वासही श्री.भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

आचारसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांना हरकत नाही

मुंबई, ता. १६ - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी व चंद्रपूर महानगरपालिकेची १५ एप्रिल २०१२ रोजी निवडणूक असल्याने या महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहितेमधील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून १४ एप्रिल २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास हरकत नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचारसंहितेच्या कालावधीतच असल्याने त्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा होत आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करताना श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीत येणार्‍या सार्वजनिक सण-उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा कायम रहावा यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०११ रोजी निर्गमन केलेल्या आदर्श आचारसंहितेमधील परिच्छेद-३ (१७) मध्ये मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास अथवा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास हरकत नाही. परंतु यासाठी स्थानिक पातळीवर ज्या परवानग्या घ्याव्या लागतात, त्या सक्षम प्राधिकार्‍यांकडून प्राप्त करून घेणे ही संबंधितांची जबाबदारी आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते अशा कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. राजकीय व्यक्तीचे नावही कार्यक्रम पत्रिकेवर असू शकते. परंतु संबंधित व्यक्तीच्या राजकीय पक्षाचा अथवा कुठल्या प्रभागातील उमेदवार आहे, याचा उल्लेख नसावा. कार्यक्रम पत्रिकेवर राजकीय नेत्यांची छायाचित्रे नसावी. तसेच अशा कार्यक्रमात राजकीय नेत्यांचे सत्कार आयोजित करू नये. राजकीय नेत्याने किंवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूचे वाटप करू नये किंवा त्यासाठी अशा कार्यक्रमाचा आधार घेऊ नये. विशेष म्हणजे अशा मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये कुठल्याही पक्षाला प्रचार करता येणार नाही, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवार, १५ मार्च, २०१२

श्री पूना गुजराती बंधू समाजच्या शताब्दी महोत्सवाचे रविवारी उदघाटन

पुणे (ता. १५) - येथील श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक १८ मार्च रोजी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे उदघाटन होणार असून यानिमित्त श्री. मोदी यांना 'गुजरात रत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष श्री. नितिनभाई देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. भरतभाई शहा, उप कार्यकारी विश्वस्त श्री. हरीशभाई शहा, उपकार्यकारी विश्वस्त श्री. नैनेशभाई नंदू, सल्लागार समिती सदस्य हिराभाई चोखावाला आदी उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना श्री. नितिनभाई देसाई म्हणाले, पुण्यातील गुजराती बांधवांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या श्री. पूना गुजराती बंधू समाज या संस्थेची स्थापना १९१३ साली करण्यात आली. यावर्षी संस्था शताब्दी महोत्सवात पदार्पण करीत असून त्याचा शुभारंभ गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच संस्थेतर्फे उभारण्यात येणार्‍या प्रस्तावित गुजरात भवनचे भूमिपूजनही श्री. मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एफटी समूहाचे संचालक जिग्नेशभाई शहा उपस्थित रहाणार आहेत. गुजराती बांधवांसाठी अभिमानाचा विषय असलेले मा. नरेंद्र मोदी यांना यावेळी गुजरात रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्थेच्या मोठ्या आश्रयदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दिनांक १८ मार्च २०१२ रोजी संध्याकाळी पाच वाजता गणेश क्रीडा रंगमंच येथे हा भव्य सोहळा होणार आहे.

श्री. हरीशभाई शहा म्हणाले, संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या उदघाटनानिमित्त शनिवारी (ता. १७) मार्चला '१०२ नॉक आऊट' या नाटकाचा प्रयोग सायंकाळी सातला होईल. सौम्या जोशी यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक मुंबई थिएटर गाईड या संस्थेतर्फे सादर केले जाणार आहे. तर रविवारी १८ मार्च रोजी दुपारी साडेचारला गुजरात सरकारतर्फे 'गुजरात स्वर्णिम महोत्सव' हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यानंतर सायंकाळी पाच वाजता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचे उदघाटन करण्यात येईल. तसेच यावेळी संस्थेच्या शतक महोत्सव स्मरणिकेचे प्रकाशनही मा. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होतील, असेही शहा यांनी सांगितले.

सिडकोतर्फे १६ मार्चपासून अर्बन हाट येथे 'वसंत मेळ्याचे' आयोजन

नवी मुंबई, ता. १६- सिडकोतर्फे सीबीडी, बेलापूर येथील सिडको अर्बन हाटमध्ये १६ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान २४ दिवसीय वसंत मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वसंत मेळ्यात राज्यासह इतर अनेक राज्यातील कलावंत सहभागी होतील. दर्जेदार हस्तकला आणि हातमागांवरील उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या आस्वाद व खरेदीचा लाभ रसिकांना घेता येईल.

मेळ्याचे हे तिसरे वर्ष असून यंदा मेळ्यात मध्यप्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान चंदिगड या राज्यातील ज्यूट, रेशीम, कॉटनसारख्या वैशिष्ट्यपूर्ण कला उत्पादने उपलब्ध असतील. याचबरोबर लाकडी खेळणी, टेराकोटाची उत्पादने, बांबूचे फर्निचर व गृहसजावटीच्या वस्तू, चित्रकला, आयुर्वेदिक, फ्लोरिकल्चर, चामड्याची विविध उत्पादने या मेळ्यातील आकर्षणे असतील. तसेच वसंत मेळ्यात विविध भाषांमधील दर्जेदार साहित्य देखील उपलब्ध असून यात नामवंत प्रकाशने व लेखकांच्या पुस्तकांचा समावेश आहे. वसंत मेळ्याला भेट देणार्‍या रसिकांना अॅम्फिथिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येईल, तसेच फुडकोर्टमध्ये कोकणी-मालवणी-कोल्हापुरी खाद्यपदार्थांबरोबरच राजस्थानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

वसंत मेळ्यात सहभागी होण्यासाठी हातमाग, हस्तकला, हस्तशिल्पी, खाद्यपदार्थ आदींशी संबंधित व्यावसायिक कलावंत व उत्पादक, महिला बचतगट सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व्यवस्थापक- (अर्बन हाट), सी. बी. डी. बेलापूर नवी मुंबई येथे ०२२- २७५६१२८४, ९५९४५२११६९ या क्रमांकावर तसेच manager.urbanhaat@gmail.com येथे संपर्क साधावा.

सोमवार, १२ मार्च, २०१२

cloudy climate

सूर्याला कितीही तेज असले तरीही छोटेसे ढग सूर्य झाकू शकतात...। तात्पर्य- गर्वाचे घर खाली.

सवड राजकारणातून...



मध्यप्रदेशचे वाणिज्य उद्योगमंत्री कैलाश विजयवर्गीय आणि आमदार जितू जिराती..अनुक्रमे श्री विष्णू आणि नारद यांच्या वेशभूषेत..! होळीनिमित्त इंदूरला हिन्द मालवा संस्थेतर्फे आयोजित बजरब ट्टू हास्य कवि संमेलनात या दोघे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोघेही चांगले गातात..श्री. विजयवर्गीय अनेकदा अनेक ठिकाणी सहज माईक हातात घेतात आणि मैफलींमध्ये रमून जातात. याचबरोबर दरवर्षी होळी, दिवाळीसारख्या विविध सणांमध्ये अशाप्रकारे सहभाग घेतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यापासून इंदूरचे महापौर, मंत्री..असा श्री. विजयवर्गीय यांचा प्रवास आहे.

(courtesy: NaiDunia)

रविवार, ११ मार्च, २०१२

आता आम्हीही झालोय हुश्शार...

आमच्या आजोबांच्या काळात सुद्धा पाणीटंचाई होतीच. माणसांबरोबर आमचीही संख्या वाढली आहे. माणसं जरी आमची संख्या कमी झाल्याचे सांगत असली तरीही असं नाही. अहो, आम्हीही माणसाच्या सोबतच रहातो की...! त्यामुळेच आम्हीही माणसांप्रमाणेच वेगवेगळ्या वसत्यांमध्ये विखुरले गेलोय. म्हणून आमची संख्या कमी झाल्यासारखं कदाचित वाटत असावं. माणसाप्रमाणेच आमचीही कामं वाढली आहेत. श्रद्धा-अंधश्रद्धा-श्राद्ध कायम होतात, वाढतात, होत असतातच. वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी..असं फक्त आता म्हणण्यापुरतंच राहण्याच्या मार्गावर आहे. वनराई, वृक्षांच्या जंगलाचं प्रमाण कमी होऊन परिणती सीमेंटच्या जंगलात झाली आहे. आमचाही नाईलाज झाला, सीमेंटच्या जंगलाचे चटके आमच्याप्रमाणेच माणसालाही नकोसे वाटतात. म्हणूनच पंखे, वातानुकूलितं यांचा शोध माणसानं लावला..। सर्वच जीवसृष्टीला जगण्यासाठी आवश्यक असलेला आणि ज्याला जीवन असं म्हटलं जातं, अशा पाण्यासाठी आजही भ्रमंती कायम आहेच. आमच्या आजोबांच्या काळात छान माठ होते..जीवो जीवस्य जीवनम्...या उक्तीप्रमाणे आम्ही माणसाने माठातलं पाणी संपवल्यावर उरलेलं पाणी पिण्याचा प्रयत्न आमच्या आजोबांच्या काळापासून करत आलो आहोत. आता पाण्याची गरज खूपच वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे आम्हांलाही तहानेने व्याकुळ होणं, अंगाची लाहीलाही होतेच...पण आम्ही काही बिसलरी विकत घेऊ शकत नाही. आमच्या आजोबांनी अक्कलहुशारी करून अगदी कमी पाणी असलेल्या माठात दगड टाकून कसंबसं पाणी पिण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्नांती परमेश्वर..यामुळे ते यशस्वी सुद्धा झाले. आम्हीही आता माणसाच्या तिसर्‍या पीढीप्रमाणे हुशार झालोय, आम्हीही डोकं चालवून चलाख माणसांच्या जवळ न जाता, गच्चीत बसवलेल्या टाकीवर बसून टाकीतलंच पाणी सहज पिऊ शकतो..आमचे बांधव सुद्धा तिथेच एकत्र जमतात आणि तृष्णा शमन करून भुर्रकन आपापल्या ठिकाणी परत जातात... झालोय की नाही आम्हीही माणसाप्रमाणेच हुश्शार...

शनिवार, १० मार्च, २०१२

खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात १२ व १३ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद

नवी मुंबई, ता. १०- सिडकोतर्फे हेटवणे धरणातून खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी येत्या १२ व १३ मार्चला वरील नोडमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

१२ व १३ मार्चला सकाळी नऊपासून (९.००) हेटवणे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. हे काम दुसर्‍या दिवशी म्हणजेच १३ मार्च दुपारी ३.०० पर्यंत चालणार असल्यामुळे सिडको क्षेत्रातील खारघर, द्रोणागिरी व उलवे परिसरात या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पुरेसा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखेर अखिलेश च्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर अखेर, समाजवादी पक्षाची धुरा यशस्वीपणे पार पाडणारे आणि सांभाळणार्‍या अखिलेश यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे आहे.
समाजवादी पक्षाच्या बैठकीत अखिलेश यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. अत्यंत कमी वयात (वय ३९) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचा मान अखिलेश यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री पदाबाबत वडील मुलायमसिंग की मुलगा अखिलेश विराजमान होणार याबाबत संभ्रम होता. अखिलेश यांनी त्यांचे वडील मुलायमसिंग हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु पक्षाला मिळालेल्या यशामध्ये अखिलेश यांचा सिंहाचा वाटा असून मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनीच सांभाळावी अशी मागणी होती.
सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुलायम यांचे बंधू आणि जसवंतनगरचे आमदार शिवपालसिंग यादव तसेच रामपूरचे आमदार आझम खान अखिलेश यांचे नाव पक्षाच्या बैठकीत सुचवतील. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बलराम यादव यांचे सुपुत्र आणि आमदार डॉ. संग्राम यादव तसेच हर्दोईचे आमदार नितिन अगरवाल हे अनुमोदन देतील. अखिलेश यांच्या नावाचा प्रस्ताव आमदारांकडून मांडण्यात आला.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...