गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी प्राथमिका अंदाजानुसार ५४ टक्के मतदान

मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली.  
दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत.  
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

दहा महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान - साडेनऊहजार उमेदवार रिंगणात

मुंबई, ता. १५ - बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी उद्या (ता. १६) मतदान होणार असून १ हजार २४४ जागांसाठी ९ हजार ५३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगून श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे की, दहा महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २० हजार ४४१ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. यातील २ हजार ६३९ मतदान केंद्र संवेदनशील तर १२२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ४, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ११८ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांसह अन्य सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेवढी उपाययोजना करण्यात आली आहे. एकूण २ कोटी २ लाख ७१ हजार ९२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी १० लाख ३ हजार ८१९ पुरुष तर ९२ लाख ६८ हजार १०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

महानगरपालिकानिहाय तपशील असा-

बृहन्मुंबई-     जागाः २२७      उमेदवार २२३३        मतदान केंद्र ८३२६    मतदार संख्या १०२७९३७७.
ठाणे-     जागाः १३०     उमेदवार ७७८        मतदान केंद्र १४७१     मतदार संख्या ११९४८८६.
उल्हासनगर-    जागाः ७८     उमेदवार ५०४         मतदान केंद्र ५७६     मतदार संख्या ४७६३२७.
नाशिक-     जागाः १२२     उमेदवार ९२९२         मतदान केंद्र १२५३     मतदार संख्या १००३०००.
पुणे-     जागाः १५२     उमेदवार ११७७         मतदान केंद्र २९९६     मतदार संख्या २५५८५७८.
पिंपरी-चिंचवड- जागाः १२८     उमेदवार ८८३         मतदान केंद्र १३३०     मतदार संख्या ११५२५८८.
सोलापूर-     जागाः १०२     उमेदवार ५५७         मतदान केंद्र ९२६     मतदार संख्या ७५४२४०.
अमरावती-     जागाः ८७     उमेदवार ७२४         मतदान केंद्र ६४२     मतदार संख्या ५१७३३८.
अकोला-     जागाः ७३     उमेदवार ५१७         मतदान केंद्र ४२३     मतदार संख्या ३४९५३६.
नागपूर-     जागाः १४५     उमेदवार १२३२       मतदान केंद्र २४९८  मतदार संख्या १९८६०५७.
 
निर्भयपणे मतदान करा

महानगरांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी अधिकाधिक मतदारांनी निर्भयपणे मतदान करून आपला हा बहुमोल हक्क बजवावा असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी

या सर्व महानगरपालिकांसाठी १६ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान होत असून संबंधित सर्व महानगरपालिका हद्दीतील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून राज्य शासनाने आ पल्या विशेषाधिकारांचा वापर करून मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१२

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ - महिला उमेदवारांसाठी केवळ अडीच हजार रुपये अनामत रक्कम

मुंबई, ता. १३ - महानगरपालिका निवडणुकीतील महिला उमेदवारांना नियमाप्रमाणे केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम म्हणून जमा करणे आवश्यक असते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी महिला उमेदवारांना केवळ अडीच हजार रुपयेच अनामत रक्कम भरणे आवश्यक असताना काही ठिकाणी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात आले. त्यानुसार ज्या महिला उमेदवारांकडून पाच हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली आहे त्यांना अडीच हजार रुपये तात्त्काळ परत करण्यात यावेत. तसेच यापुढे होणार्‍या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नियमातील तरतुदीनुसारच अनामत रक्कम घेतली जाईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्याबाबत सर्व महानगरपालिका आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार करता येत नाही. परंतु घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर बंदी नाही. याचबरोबर प्रचार समाप्तीनंतर किंवा मतदानाच्या दिवशी केवळ वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासही हरकत नसल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१२

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

आठ मतदान केंद्रावर फेरमतदान जि.प., पं.स. क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल

मुंबई, ता. 8 - राज्यातील 27 जिल्हा परिषदा व 305 पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. याचबरोबर 8 मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारी 2012 रोजी फेरमतदान घेण्याचा निर्णय देखील राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत लागू असते. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया संपली असली तरीही मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणार आहे. यामुळे मतदान आणि मतमोजणीतील बराच कालावधी लक्षात घेऊन आणि विकास कामांमद्ये अडथळा येऊ नये यासाठी संबंधित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार तालुक्यात 12 फेब्रुवारी रोजी मतदान असल्यामुळे तेथे मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता मात्र 17 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

आठ ठिकाणी 12 फेब्रुवारीला फेरमतदान

बीड जिल्ह्यातील होळ (ता. केज) येथील मतदान केंद्र क्रमांक 45/20 परभणी जिल्ह्यातील सोस (ता. जिंतूर) येथील मतदान केंद्र क्रमांक 4/19, सांगली जिल्ह्यातील अनुक्रमे खानापूर (ता. खानापूर) येथील मतदान केंद्र क्रमांक 85, वाळवा (ता. वाळवा) येथील मतदान केंद्र क्रमांक 43/188, दिघंची (ता. आटपाडी) येथील मतदान केंद्र क्रमांक 27, नाशिक जिल्ह्यातील पांगरी बु. (ता. सिन्नर) येथील मतदान केंद्र क्रमांक 71-18, कोल्हापूर जिल्ह्यातील हसुर खु. (ता. कागल) येथील मतदान केंद्र क्रमांक 34-68-37 आणि जालना जिल्ह्यातील पोखरी केंधळी (ता. मंठा) येथील मतदान केंद्र क्रमांक 31-28 या आठ मतदान केंद्रांवर 12 फेब्रुवारीला फेरमतदान घेण्यात येईल. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. फेरमतदान होत असलेल्या संबंधित गट आणि गणात मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता कायम राहील, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी म्हटले आहे.
सरासरी 66.90 टक्के मतदान

राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी काल (ता. 7) एकूण सरासरी 66.90 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 75.24 टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात, तर सर्वात कमी 58.24 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झाले. जिल्हानिहाय मतदान टक्केवारी अशी: ठाणे- 58.24 टक्के, रायगड- 69.9, रत्नागिरी- 63.52, सिंधूदुर्ग- 67.17, नाशिक- 64.23, जळगाव- 63.7, अहमदनगर- 65.9, पुणे- 65.6, सातारा- 67.26, सांगली- 70.11, सोलापूर- 65.28, कोल्हापूर- 75.24, औरंगाबाद- 67.77, जालना- 70.6, परभणी- 71.15, हिंगोली- 72.27, बीड- 66.67, नांदेड- 64.18, उस्मानाबाद- 64.23, लातूर- 65.29, अमरावती- 65.4, बुलढाणा- 69.22, यवतमाळ- 64.55, नागपूर- 62.87, वर्धा- 69.17, चंद्रपूर- 71.5, गडचिरोली- 67,  आणि सरासरी- 66.90.

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

शुभं भवतु।

युवराज सिंग याला कॅन्सर...

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले आहे. त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत.

भारताचा ज्येष्ठ फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असून तो अजून पहिल्या चरणातच असून यामुळे घाबरून जाण्यासारखी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्याच्या डाव्या फुप्फुसात ट्यूमर असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि परिस्थिती फारशी गंभीर नसल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र अष्टपैलू युवराज याला वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे पाच कसोटी सामने आणि एक दिवसीय मालिकेस मुकावे लागले. त्याच्यावर अमेरिकेत सध्या केमोथेरपि सुरू आहे. दरम्यान, काही बातम्यांमध्ये युवराज अमेरिकेस शस्त्रक्रियेसाठी गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु 1 फेब्रुवारीला युवराजने ट्विटरवर, आपण कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे ट्विट केले होते. विश्वचषकापासूनच युवराज याच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी तक्रारी सुरू झाल्या होत्या. यानंतर तो केवळ इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामनाच खेळू शकला होता.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

we are wise than Guys'...

See them! How wise those cows are..! Surely they are wise than Guys/human beings. They are ready to cross the second lane of road. They are waiting for pass the vehicle.

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

सिडको प्रदर्शन संकुलाचे विकासकार्य प्रगतीपथावर

मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भविष्यात येथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे सहाय्यभूत व्यवसायांना चालना आणि रोजगार निर्मिती होऊन शहराच्या लौकिकात भर पडेल असे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी व्यक्त केले. येथील प्रदर्शन संकुल, पामबिच मार्गाच्या विस्तारातत समाविष्ट उड्डाण पूल आणि आंतरराष्ट्रीय राजदूतावास प्रकल्पांच्या विकास कामांची त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता केशव वरखेडकर, प्रकल्पांवर नियुक्त स्थापत्य, विद्युत, वास्तुशास्त्र विभागातील अभियंते व अधिकारी, वास्तुतज्ज्ञ सल्लागार, कंत्राटदार, यासह काही कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रदर्शन संकुलाचा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून येथील सर्व स्थापत्य, विद्युत, वातानुकूलन, अंतर्गत सजावट या कामांच्या विकास प्रक्रियांमध्ये समाविष्ट सर्व साहित्य उत्तम प्रतीचे असावे, यात कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, मूळ काम उच्च दर्जाचे झाल्यास देखभाल दुरुस्तीवरील खर्च आटोक्यात ठेवता येऊ शकेल आणि चांगला दर्जा राखून नवीन उदाहरण सिद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना सत्रे यांनी केल्या.

महाराष्ट्राची दुसरी आर्थिक राजधानी होण्याकडे नवी मुंबई वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शन संकूलाची निर्मिती होत आहे. वाशी, सेक्टर- 30 ए, येथील 7.4 हेक्टर क्षेत्रावरील प्रदर्शन संकूलामुळे वाणिज्यिक व औद्योगिक जगताला आपल्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी दर्जेदार प्रदर्शन सुविधा उपलब्ध होतील. LEED च्या ग्रीन बिल्डिंग मानकानुसार विकास करण्यात येत असलेल्या एकूण पाच लक्ष चौरसफूट क्षेत्रफळाच्या या प्रदर्शन संकूलात दोन भव्य प्रदर्शन दालने, सार्वजनिक सभागृह आणि मध्यवर्ती सभागृहाचा समावेश तसेच, नाट्यगृह, परिषद कक्ष, प्लाझा, खुले प्रेक्षागृह, मेजवानी सभागृह, सहाय्यभूत गृहसमुदाय तसेच प्रशासन, फुडकोर्ट, वाचनालय आणि संमेलनस्थळ यांचा समावेश आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...