शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.

सुट्टीची भटकंती...(२)

सुट्टीच्या पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिनेमा पाहून झाला...आठवडाभर पोटभर झोप झाली...पुढे काय? गावी मामाकडे जायचं की पुण्याला काकांकडे? असा प्रश्न पडला (तसं तर सगळ्याच नातेवाईकांनी सुट्टीत बोलावलं होतं) पण ठरवलं, की गावी जायचं...
ठरल्याप्रमाणे गावी मामाकडे गेलो. शहर आणि गावाच्या वातावरणात फरक पडतोच नां..। गावात बस पोहोचल्यानंतर बस-स्टँड पर्यंत जाणार्‍या रस्त्यावर इतक्या सकाळी सुद्धा वर्दळ होती. स्टँडवर मामा घ्यायला आला होता. मामाच्या घरी जाताना वाटेत अनेकजण रामराम, नमस्कार करत होते. मनात विचार आले, खरंच किती छान..त्यानिमित्ताने संवाद तरी साधला जातो एकमेकांशी. नाहीतर, आमच्या मोठ्या शहरात अगदी घराच्या ओट्यावर बाहेर बसलेले शेजारी  तोंडातून चकार शब्द काढायला सुद्धा तयार होत नाहीत. पाहूणे म्हणून आलेल्या एखाद्या व्यक्तीने कोणाचा पत्ता विचारला तर केवळ हातानेच इशारा केला जातो किंवा खुणावले जाते. इथे तर पहा, अगदी सगळं वातावरणच जीवंत असल्यासारखं आणि चैतन्य असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मला नकळत हुरुप आला. कदाचित गावाच्या मातीचा आणि वातावरणाचा हा परिणाम असावा. मामाचा मोठ्ठा वाडा होता त्यामुळे आपल्या अपार्टमेंटमध्ये असलेल्या केवळ तीन खोल्यांची (वन् बीएचके) आठवण चटकन आली. वाड्यात दाराजवळच शेणाने सारवलेली जमीन, काढलेली छान मोठ्ठी रांगोळी, आजुबाजूला असलेली मोगरा, गुलाब, रातराणी, निशिगंध अशी कितीतरी फुलांची झाडं आणि अनेक झाडांना आलेला बहर यामुळे तर अगदी प्रसन्न वाटत होतं. अनेक दिवसांनी भाचा आला म्हणून मामीने सुद्धा औक्षण केलं, दूध-भाकरीचा तुकडा टाकला..घरात बॅग ठेवल्यानंतर सगळ्या मोठ्यांना नमस्कार केला, आमच्या आजोबांना तर आश्चर्य वाटलं, की अजूनही हा नमस्कार करतो (अर्थात हे सगळे आई-वडिलांचे संस्कारच होते)...।
दोन दिवस छान गप्पा करण्यातच वेळ गेला. तिसर्‍या दिवशी मात्र थोडं बोअर झालं. मग, मामाने माझ्या समवयस्क मुलांशी ओळख करून दिली. कारण मामाचा मुलगा जॉबच्या शोधार्थ नशीब अजमवायला बाहेरगावी गेला होता. शिक्षण संपल्यानंतर पालकांसकट आजकाल मुलांना सुद्धा काहीतरी करण्याची जिद्द असते, इच्छा असते. आणि मध्यमवर्गीयांना तर याशिवाय गत्यंतरच नसते नां। मामाची शेती होती, परंतु मामाच्या मुलाला शेती करायची नव्हती, अर्थात मुलाने काहीतरी मोठ्या पदावर काम करावे अशी मामाचीही इच्छा होती. आमचे आजोबा सुद्धा नवीन आणि चांगल्या विचारांचा स्वीकार करणारे असल्यामुळे नोकरी हा विषय फारसा महत्वाचा आणि जड नव्हता.
पण, मी खेळायला, हुंदडायला जाण्याऐवजी मामाबरोबर शेतात जायचा विचार पक्का केला. त्यानिमित्ताने शेतीची थोडी माहिती होईल, इतकेच..। दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळीच सातच्या आत शेतात पोहोचणार होतो...
(पुढील भाग उद्या...)

गुरुवार, २१ एप्रिल, २०११

गौरव पुरस्काराचा...

नवी दिल्ली येथे गुरूवारी (२१ एप्रिल) अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या समवेत.

विजय नाहाटा यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव

नवी दिल्ली येथे डीजीआयपीआर महाराष्ट्र चे महासंचालक विजय नाहाटा यांना आज (२१ एप्रिल) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा पुरस्कार देताना.

विहंगावलोकन

उडुनी नभी उन्हात विहंग दमले पहा
दमुनी पंख्यावरी अहो बसलो मिनिटे दहा
जाहलो उष्म्याने अवघा बावळा..
आहे शुभ्र पंखा..काळा मी कावळा...

सुट्टीची भटकंती...

उन्हाळ्याच्या सुट्ट्या अनेक ठिकाणी लागल्या आहेत. काही ठिकाणी लवकरच लागतील. आता काय? किमान पंचेचाळीस दिवस म्हणजेच दीड महिना मज्जाच मज्जा...। मध्यंतरी वार्षिक परीक्षा असल्यामुळे आम्हाला आई-बाबांनी अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू दिलं नव्हतं. तुझी परीक्षा झाल्यानंतर करायचं, ते कर..असं सांगून ते मोकळे झाले होते.
परीक्षा संपली आणि काय? दरवर्षाप्रमाणे आम्ही मित्र-मैत्रिणी सिनेमाला गेलो. आजकाल तर मल्टीप्लेक्स असल्यामुळे सगळीच धमाल येते. तिकिटाचे पैसे जास्त द्यावे लागतात हे खरं असलं तरीही तिथे छान एअर-कंडीशन, पॉपकॉर्न, सूप, आईस्क्रीम, शेंगदाणे, चिप्स, कोल्ड्रिंक्स अशा सगळ्या सोयी आतल्या आतच केलेल्या असल्यामुळे मध्यांतरात रस्त्यावर जायची गरज नाही. असंही रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते की रस्ता ओलांडताना अपघात झाला नाही म्हणजे सुटलो एकदाचा...असं म्हणून परत येऊन आपल्या चेअरवर बसून सिनेमा पहायचा. हो, एक मात्र आहे..पूर्वी चित्रपटगृहात असलेले उंदीर आजही मल्टीप्लेक्समध्ये आहेत. ए.सी. ची हवा खाऊन ते अजूनच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचीही नवीन पीढी आली असेल...
अनेक दिवसांपासून साचलेली झोप मी आता आठवडाभर घेणार आहे. नंतर गावाला जाण्याचा विचार करेन. पण गावाला नेमकं कुठे जाऊ? मित्रांबरोबर कुठेतरी ७-८ दिवसांसाठी जाऊ की नेहमीप्रमाणे गावाकडे, गावाला मामाकडे जाऊ? अशा द्विधा स्थितीत मी आहे. बघू या, काय प्लॅनिंग होतंय ते...। पुन्हा उद्या तुम्हांला मी भेटायला येईन..
नमस्कार!

सोमवार, १८ एप्रिल, २०११

वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे उत्कृष्ट विनोदी साहित्यिक हरपला - छगन भुजबळ

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, दि. 17 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक वि.आ. बुवा यांच्या निधनामुळे मराठी विनोदी साहित्यसृष्टी समृध्द करणारा उत्कृष्ट साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, मराठी विनोदी साहित्यात चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे यांच्यानंतर उदयाला आलेल्या रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ गाडगीळ या विनोदी साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये वि.आ. बुवा यांचाही अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद आणि अत्यंत साधी सोपी भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्टये होती. 'बुवा उवाच', 'परमेश्वराला रिटायर करा' आदी अनेक विनोदी कथासंग्रह, लेखसंग्रह, ललितसंग्रह, कादंबरी अशा विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी विपुल विनोदी लेखन केले. विविध वृत्तपत्रांतून त्यांच्या स्तंभलेखनालाही मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

रविवार, १७ एप्रिल, २०११

गुरुवार, १४ एप्रिल, २०११

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस छगन भुजबळ यांचे अभिवादन

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, दि. 14 एप्रिल : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीस भेट देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे आज सकाळपासूनच आंबेडकरी जनतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी चैत्यभूमीचे दर्शन घेणाऱ्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मंत्री जयंत पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, मुंबईच्या महापौर श्रध्दा जाधव, खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र गवई, माजी आमदार संजय दत्त, महेंद्र साळवे, चंद्रकांत कसबे, नागसेन कांबळे आदींचा समावेश होता.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग नाक्यावरील चौकाचे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक चौक' असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमासही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी आंबेडकर यांच्याविषयी नरेंद्र वाबळे यांनी तयार केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे आवश्यक - भुजबळ



मुंबई, दि. 14 एप्रिल : महाराष्ट्राची तसेच देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी भूमीपुत्रांना विकासातील भागीदार बनविणे अत्यावश्यक आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (एमईडीसी) आणि अमेरिकास्थित लॅम्ब्डा-अल्फा इंटरनॅशनल (एलएआय) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'युज ऑफ लँड रिसोर्सेस इन द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्रा' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात हा उद्धाटन समारंभ झाला.
विकासकामांमध्ये राजकारण आणण्याऐवजी विकासासाठी राजकारण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जमीन हा अत्यंत मूलभूत व आवश्यक घटक आहे. शासन अथवा खाजगी विकासक या दोन्ही घटकांनी जमीनमालकांना विश्वासात घेऊन आपल्या सद्हेतूंविषयी त्यांची खात्री पटविली तर कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे कोणताही प्रकल्प उभारत असताना तो ज्या जमिनीवर उभा करण्यात येत आहे, त्या शेतकरी, अल्पभूधारक तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणास सर्वच संबंधितांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.
यापुढील काळात राज्याची आर्थिक प्रगती खऱ्या अर्थाने साधावयाची झाल्यास सार्वजनिक-खाजगी भागीदारीला (पी-पी-पी) पर्याय नसल्याचे स्पष्ट करून श्री. भुजबळ म्हणाले की, केवळ शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींतून पायाभूत सुविधा विकासाचे मोठमोठे प्रकल्प हाती घेणे आणि विहित मुदतीत पूर्ण करणे अशक्य असते. त्यामुळे 'पीपीपी' तत्त्वावर प्रकल्प उभारणेच अधिक उपयुक्त ठरते. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 2749 कोटींची तरतूद करण्यात आली असताना अजघडीला राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प खाजगीकरणाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहेत. केवळ अर्थसंकल्पावर अवलंबून राहिल्यास यातला एखादा प्रकल्पही निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य होऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत 'एमईडीसी' व 'एलएआय' यांच्यात 'आर्थिक विकासासाठी जमिनीचा वापर' यासंदर्भात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक विकासाला निश्चितपणे लाभ होईल, अशी आशा श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.
सुरवातीला 'एमईडीसी'चे अध्यक्ष विठ्ठल कामत यांनी प्रास्ताविक केले. अमेरिकन कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिकविषयक प्रमुख रॉबर्ट कार्लसन यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमास 'एलएआय'च्या अध्यक्ष डॉ. कॅरन सिएरॅकी, राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी, एमईडीसीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. डॉ.सी.एस. देशपांडे यांनी आभार मानले.

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...