बुधवार, १२ जानेवारी, २०११

दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण संस्थेसाठी बारामती येथे जमीन उपलब्ध करणार

मुंबई, ता. १२- बारामती येथे नागरी दहशतवाद प्रतिकार पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रूपये व जमीन उपलब्ध करून दिली जाईल. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पोलिस प्रशिक्षण केंद्रासंदर्भात मंत्रालयात समिती कक्षात ते बोलत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील, अप्पर मुख्यसचिव उमेशचंद्र सरंगी, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की बारामतीजवळ बर्‍हाणपूर येथील जागा प्रशिक्षण केंद्रासाठी योग्य ठरेल. तेथील पालखी तळ सुरक्षित ठेवून उर्वरित जागेवर प्रशिक्षण केंद्र उभारता येईल. यासाठी केंद्राकडून २० कोटी रुपये मिळणार असून राज्यशासनही २० कोटी रुपये उपलब्ध करून देईल.
श्री. शिवानंदन म्हणाले की, राज्यात पोलिस प्रशिक्षण केंद्र आहे परंतु नागरी दहशतवाद प्रतिकार प्रशिक्षण केंद्र नाही. केंद्र शासनाने अशा प्रकारची प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. या ठिकाणी पोलिसांना दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल. अशा प्रशिक्षणाची आपल्या पोलिसांना आवश्यकता आहे.

अनुभवी मार्गदर्शकास मुकलो- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. १२- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या निधनाने एका ज्येष्ठ आणि अनुभवी मार्गदर्शकाला आम्ही मुकलो आहोत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष कार्यालयात समन्वयक म्हणून महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. विविध निवडणुकांच्या वेळी ते निवडणूक आयोग आणि निवडणुकीसंदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. म्हणून त्यांना गुरूजी म्हणून संबोधले जात होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्ष संघटनेची पडद्यामागची मात्र महत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कर्तृत्वाची पावती म्हणून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठवून अधिक महत्वाची जबाबदारी सोपविली होती. कोकणच्या प्रश्नावर देखील ते नेहमीच आक्रमक भूमिका घेत असत. त्यांच्या निधनाने कोकण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरूनाथ कुलकर्णी यांचे निधन

मुंबई, ता.१२- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूनाथ कुलकर्णी (वय ७०) यांचे प्रदीर्घ आजारानंतर आज दुपारी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच गुरूनाथ कुलकर्णी यांनी पक्षाच्या विस्तारासाठी समर्पणशील भावनेने कार्य केले. पक्षाच्या घटनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर त्यांचा भर असे. केंद्रिय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे एकहाती सांभाळली. आपल्या संयमी आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजावर देखील छाप पाडली. त्यांच्या निधनामुळे गोरगरीबांविषयी अत्यंत आस्था असणारा एक कृतीशील सामाजिक नेता राज्याने गमावला आहे.
गुरुवारी (ता. १३) दुपारी बाराला त्यांच्या देहावर दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चिनी "मांज्या" प्रमाणेच अन्य वस्तूंवर बंदी आणण्याची गरज

दरवर्षाप्रमाणे यंदाही गुजरातमध्ये पतंग महोत्सवानिमित्त सुमारे दोनशे देशांमधील प्रतिनिधींचा सहभाग आहे. चीनच्या मांज्यावर यंदाही शासनाने बंदी कायम ठेवली आहे. याप्रमाणेच आपल्या देशात चिनी बनावटीच्या विक्री होत असलेल्या अन्य वस्तूंवर देखील बंदी आणण्याची गरज आहे.
पतंग उडविण्यासाठी आवश्यक असलेला दोरा म्हणजेच मांज्या..! भारतीय बनावटीच्या या मांज्या वर चिनी बनावटीच्या मांज्याने मध्यंतरी कुरघोडी करून भारतीय मांज्याची पतंग कापली होती. परिणामी चिनी मांज्याला प्रचंड उठाव आल्यामुळे आणि हा मांज्या तुलनेत अधिक धारदार असल्यामुळे विशेषतः हातांना नुकसान होण्याची शक्यता होती. यामुळे शासनाने या मांज्यावर बंदी घातली आहे. भारतीय मांज्यासाठी एका दृष्टीने हे पथ्यावरच पडले म्हणायचे. या बंदीमुळे तरी बिचार्‍या भारतीयांनी बनविलेल्या मांज्याला उठाव आला असेल. देशात मोबाईलपासून सणासुदिला वापरण्यात येणारी विद्युत रोषणाई, फटाके, मुलांची खेळणी, विविध वस्तू अशा अनेक बाबतीत चिनी वस्तूंनी भारतीय बाजारपेठ व्यापली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. यासाठी शासनाचे व्यापारविषयी असलेले धोरण, नीति, धारणा जबाबदार असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे. कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष करून दुसर्‍याच्या मुलाचे संगोपन करण्यासारखीच ही तर्‍हा म्हणावी लागेल. एकीकडे देशात बेरोजगारीची समस्या भेडसावत असून यातून बाहेर पडण्याचा मार्ग बेरोजगारच काय शासनाला सुद्धा पाहिजे तसा सुचत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे चिनी वस्तू भारतीय बाजारपेठ व्यापत आहेत. देशी वस्तूंपेक्षा चिनी वस्तू स्वस्त असल्यामुळे दोन पैसे बचत होत असल्याने अनेक ग्राहक चिनी वस्तूंचे अक्षरशः अधीन झाले आहेत. चिनी मांज्याप्रमाणेच अन्य वस्तूंवर देखील बंदी आणल्यास बेरोजगारी कमी होईल, हीच अपेक्षा!

थंडीचा जोर कमी

सुमारे महिनाभर देशात अनेक राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट या आठवड्यात कमी होत असल्याचे जाणवत आहे. अनेक शहरांमध्ये दिवसा थोडी ऊबदार हवा आणि रात्री मात्र गारवा जाणवत आहे. रात्रीच्या किमान तापमानात देखील वाढ झाली असून गेल्या आठवड्यात शून्याकडे सरकणारा पारा आता दहा कडे सरकत असून अनेक राज्यांमध्ये रात्रीचे किमान तापमान आता पाच अंशांपेक्षा जास्त होत आहे. थंडीचा जोर कमी झाल्याचे जाणवताच मध्यप्रदेशमध्ये काही शाळांनी इयत्ता आठवीचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची शासनाकडे मागणी केली. परंतु तज्ज्ञ आणि विविध अधिकार्‍यांच्या झालेल्या बैठकीत शाळा सोमवार (ता. १६) पासूनच सुरू करण्याचा निर्णय कायम करण्यात आला आहे. थंडीमुळे अचानाक शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्यामुळे मात्र अनेक पालक मुलांसह गावांना गेले.

सिडको महामंडळाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन

सिडको महामंडळाच्या २०११ च्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन सिडकोच्या नोंदणीकृत कार्यालयात निर्मल येथे संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष नकुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामीन, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे, कोकण विभागीय आयुक्त एस. एस. संधू, संचालक व विधानपरिषदेचे आमदार सुभाष भोईर, नामदेव भगत आणि सचिव प्रदीप रथ उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. दिलीप वाटाणे यांनी दैनंदिनी आणि दिनदर्शिकेतील वैशिष्ट्यांची माहिती दिली

पनवेल-इंदापूर टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम तत्काळ सुरू करणार

मुंबई, ता. १२- मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून सुमारे ५५३ कोटी रुपये खर्चाचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
मुंबई-गोवा राज्यमार्ग क्र. १७ वरील इंदापूर ते झाराप या चार टप्प्यातील रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सुसाध्यता अहवाल तपासण्याचे काम सुरू असून ते येत्या मार्च २०११ पर्यंत पूर्ण होईल. यानंतर या कामाचा अहवाल केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येऊन मंजुरीनंतर चौपदरीकरणाचे हे काम त्वरीत सुरू करण्याच्या दृष्टीने आपण स्वतः प्रयत्नशील आहोत. हे काम इंदापूर ते कशेळी घाट (लांबी ७७ किमी), कशेळी घाट ते संगमेश्वर (लांबी ९९ किमी), संगमेश्वर ते टाकेवाडी (लांबी १०७ किमी), टाकेवाडी ते झाराप (लांबी ८३ किमी) याप्रमाणे चार टप्प्यात आहे.
झाराप ते पत्रादेवी हे सुमारे २१ किमी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येत्या डिसेंबर २०११ पर्यंत हे पूर्ण होईल.

सिडकोतर्फे अर्बनहाट येथे मकरसंक्रांत मेळा

बेलापुर, ता. १२ - सिडकोतर्फे आठ जानेवारीपासून १७ जानेवारीपर्यंत मकर संक्रांत मेळ्याचे आयोजन अर्बन हाट सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. मकर संक्रांत मेळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राच्या प्रसिद्ध पैठणी साड्यांबरोबरच तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधील रेशीम व कॉटनच्या साड्या, ड्रेस मटेरियल, ज्यूटच्या उत्पादनांबरोबरच हँडबॅग्ज, विविध कलाकुसरीच्या जरीकाम केलेल्या पर्स व विविध राज्यातील बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे.
कलाकृतींच्या निर्मितीसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याच्या पद्धतींची प्रात्यक्षिके देखील आकर्षण ठरली आहेत. येथे फुड प्लाझामध्ये पंजाबी पाककृतींबरोबरच विविध राज्यांचे वैशिष्ट्य असलेले खाद्यपदार्थ तसेच ऑम्फिथिएटरमध्ये शनिवार व रविवारी सायंकाळी साडेसात ते नऊ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. मेळ्यातील स्टॉल्स आणि फुडप्लाझाच्या नोंदणीसाठी के. एस. व्ही. नायर, व्यवस्थापक- अर्बन हाट सिडको यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२२ २७५६ १२८४, ९५९४५ २११६९ तसेच manager.urbanhaat@gmail येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

अमेरिकन महिला लोकप्रतिनिधी शिष्टमंडळ राजकीय व व्यावसायिक भेटीवर

मुंबई, ता. १०- अमेरिकेतील महिला लोक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यात मूळच्या भारतीय मात्र सध्या अमेरिकेतील आयोवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांचा समावेश होता.
अमेरिकन महिला लोकप्रतिनिधींच्या या शिष्टमंडळाने नागपूर येथे भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. महात्मा फुले यांनी भारतात सर्वप्रथम समतेचा लढा उभारताना अमेरिकेत अफ्रो-अमेरिकन बांधवांवर सुरू असलेल्या अत्याचारांचाही विरोध केला आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारे ते पहिले आशियाई नागरिक होते, असे सांगताच शिष्टमंडळातील सदस्या भारावून गेल्या. भुजबळ यांनी भारतातील प्रकल्प मान्यतेची प्रक्रिया, प्राधान्यक्रम आणि सार्वजनिक-खासगी सहभागातून राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या विषयी देखील तपशीलवार माहिती दिली.
नॉर्थ डकोटाचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात स्वाती दांडेकर यांच्यासह अमेरिकन नॅशनल फाऊंडेशन फॉर विमेन लेजिस्लेचर्स या संघटनेच्या अध्यक्ष जेनिटा वॉल्टन, संघटनेच्या उपसंचालक क्रिस्टल ऍडिक्सन, लुइझियाना प्रांताच्या नीता रुसीच हटर, सेंट कॅरोलिनाच्या जॉइस डिकन्सन, केंटुकी प्रांताच्या टीना वॉर्ड-प्युघ, नासा च्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग उपसंचालक क्रिस्टील जॉन्सन, अलायन्स फॉर युएस इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी आणि संचालक नेहा कारखानीस यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ अहमदाबाद येथे भेट देऊन नवी दिल्ली येथे देखील जाणार आहे.

सोमवार, १० जानेवारी, २०११

आली लहर...केला कहर!

सर्वत्र थंडी 'मी' म्हणत असून शीतलहरीचे लोणावळा परिसरातील हे विहंगम दृश्य. अती थंडीमुळे सूर्याने सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी धुक्याची ही चादर तर पांघरली नसेल नां...! (picture taken through mobile/cell  phone, by me) 

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...