मंगळवार, ११ जानेवारी, २०११

अमेरिकन महिला लोकप्रतिनिधी शिष्टमंडळ राजकीय व व्यावसायिक भेटीवर

मुंबई, ता. १०- अमेरिकेतील महिला लोक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यात मूळच्या भारतीय मात्र सध्या अमेरिकेतील आयोवा प्रांताच्या सिनेटर स्वाती दांडेकर यांचा समावेश होता.
अमेरिकन महिला लोकप्रतिनिधींच्या या शिष्टमंडळाने नागपूर येथे भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी भुजबळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली. महात्मा फुले यांनी भारतात सर्वप्रथम समतेचा लढा उभारताना अमेरिकेत अफ्रो-अमेरिकन बांधवांवर सुरू असलेल्या अत्याचारांचाही विरोध केला आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणारे ते पहिले आशियाई नागरिक होते, असे सांगताच शिष्टमंडळातील सदस्या भारावून गेल्या. भुजबळ यांनी भारतातील प्रकल्प मान्यतेची प्रक्रिया, प्राधान्यक्रम आणि सार्वजनिक-खासगी सहभागातून राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या विषयी देखील तपशीलवार माहिती दिली.
नॉर्थ डकोटाचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात स्वाती दांडेकर यांच्यासह अमेरिकन नॅशनल फाऊंडेशन फॉर विमेन लेजिस्लेचर्स या संघटनेच्या अध्यक्ष जेनिटा वॉल्टन, संघटनेच्या उपसंचालक क्रिस्टल ऍडिक्सन, लुइझियाना प्रांताच्या नीता रुसीच हटर, सेंट कॅरोलिनाच्या जॉइस डिकन्सन, केंटुकी प्रांताच्या टीना वॉर्ड-प्युघ, नासा च्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग उपसंचालक क्रिस्टील जॉन्सन, अलायन्स फॉर युएस इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी आणि संचालक नेहा कारखानीस यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ अहमदाबाद येथे भेट देऊन नवी दिल्ली येथे देखील जाणार आहे.

सोमवार, १० जानेवारी, २०११

आली लहर...केला कहर!

सर्वत्र थंडी 'मी' म्हणत असून शीतलहरीचे लोणावळा परिसरातील हे विहंगम दृश्य. अती थंडीमुळे सूर्याने सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी धुक्याची ही चादर तर पांघरली नसेल नां...! (picture taken through mobile/cell  phone, by me) 

आणखी आठवडा थंडीची लाट राहणार..

मकरसंक्रांत येऊन ठेपली तरीही थंडी कमी होत नसून गेल्या महिन्यापासून थंडी आहे तशीच टिकून आहे. अनेक शहरांचे किमान तापमान पाच अंशांपर्यंत स्थिरावले आहे. राजधानी दिल्लीचे कमाल तापमान देखील अवघे बारा अंश सेल्सिअस खाली येऊन हिवाळ्यातील दिल्लीचे आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडित निघाले. मध्य प्रदेशासह काही राज्यांनी शाळांना पंधरा जानेवारीपर्यंत सुट्या घोषित केल्या आहेत. थंडीची ही लाट आणखी किमान आठवडाभर तरी कायम राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गुरुवार, ६ जानेवारी, २०११

'क्षण' तोच...'पण' नवा...!!!

I myself exposed this photograph...

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीस सिडकोने ५० हेक्टर जमीन त्वरीत द्यावी : उपमुख्यमंत्री

मुंबई, ता. ६ - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचा वाढता व्याप लक्षात घेऊन सिडकोने ठरलेल्या दरानुसार बाजार समितीस ५० हेक्टर जमीन त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. सहकार व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे सचिव, सिड को व बाजार समितीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. पवार यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात बाजार समितीच्या उलाढालीत चार पटींनी वाढ झाली आहे. तसेच खाद्यतेल, ऊस, केळी, गुरे, फुले आदींसाठी नवीन आवाराची उभारणी करावयाची आहे. शिवाय कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस सारख्या सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. त्यासाठी बाजार समितीला अधिक जागेची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून सिडकोने ५० हेक्टर जमीन तातडीने उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर शासकीय जागा उपलब्ध असल्यास मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवावा.
बाजार आवाराच्या विकासासाठी वाढीव एफएसआय संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविला जाईल. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बाजार समितीने प्रयत्न करावेत. घनकचर्‍यापासून वीजनिर्मिती व कंपोस्ट युनिटला नवी मुंबई महापालिकेने परवानगी द्यावी अथवा बाजार आवारातील संपूर्ण कचरा नियमितपणे उचलावा.
गोरेगाव येथील आरे कॉलनीत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने चार एकर जागेवर फुलबाजार प्रकल्पाची उभारणी केली आहे. बाजार समितीला फुलांच्या घाऊक बाजारपेठांच्या विकासासाठी जमिनीची आवश्यकता असल्याने हा प्रकल्प मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीला भाडे तत्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात महामंडळाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबत प्रस्ताव सादर करावा.

पतसंस्थांमधील आर्थिक गुन्ह्यांप्रकरणी कठोर शिक्षा व्हावी- उपमुख्यमंत्री

मुंबई, ता.६- पतसंस्थांमधील आर्थिक गुन्ह्यांप्रकरणी कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने आयपीसीमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित सुरू करावी. असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
राज्यातील नागरी, ग्रामीण आणि बिगरशेती पतसंस्थांच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सहकार व पणन राज्यमंत्री प्रकाश सोळंके, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोकाटे आदींसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, की पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार करणार्‍यास कठोर शिक्षा व्हायला हवी. तरच गैरप्रकार करणार्‍यांना आळा बसेल. गेरव्यवहार करणारी कुठलीही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये. यासंदर्भातील गुन्हे त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टच्या स्थापनेची कार्यवाही करावी. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचबरोबर कर्जाच्या वसुलीसंदर्भातील अडचणी विचारात घेऊन संबंधित जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना आवश्यक त्या सहकार्याच्या सुचना दिल्या जातील.

रहमान यांनी लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक

ए. आर. रहमान यांनी भविष्यकाळात देशहितासाठी कोणतेही गीत तयार करताना लोकअपेक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.
मध्यंतरी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या स्वागतम् हे रहमान यांचे गीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून न शकल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. या गाण्यासाठी शासनास चक्क पाच कोटी रुपये मोजावे लागले होते(कोट्यवधींचा घोटाळा वेगळाच). आय एम् सॉरी म्हणून रहमान मोकळे झाले. वास्तविक घेतलेल्या पाच कोटिंपैकी चार कोटी अथवा काही कोटींची रक्कम तरी त्यांनी शासनास परत करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. शासनाने देखील भविष्यकाळात ही बाब ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात शुक्रवारी वैद्यकीय शिबीर

मुंबई, ता. ६ रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहाला मंत्रालयात वाहनचालकांसाठी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहात साजरा करण्यात येणार्‍या रस्ते सुरक्षा अभियानानिमित्त मंत्रालयात वाहनचालकांसाठी दरवर्षी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही मंत्रालय आवारात वाहनगृह क्र. १ ८ ते २५ येथे उद्या सात जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वाहनचालकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण उपविभागतर्फे करण्यात आले आहे.

थंडीने गारठला मध्य प्रदेश- शाळांना सुट्या जाहीर

मध्यप्रदेशात शीतलहर कायम असून मालवा प्रांताच्या अनेक भागात दव गोठून बर्फ तयार झाले आहे. पचमढी येथे अवघे १ अंश सेल्सिअस तापमान असून काही ठिकाणी शून्य अंश तापमान आहे. शासनाने मध्य प्रदेशातील शाळांना दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्या आहेत.
शाजापूर येथे बुधवारी (ता. ५) पारा घसरून अवघ्या १.५ अंश सेल्सिअस तर नौगाव येथे १.७, शिवपुरी १.५, दमोह १.२, पचमढी १.०, टीकमगड ०.६, मंडला ०.६, दतिया आणि उमरिया अनुक्रमे शून्य अंश, उज्जेन, बैतुल येथे अनुक्रमे २.२ भोपाळ २.३, इंदूर ५.०, सागर ४.०, देवास ६.४, मंदसोर ३.६, नीमच ३.५, रतलाम ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. धुक्यामुळे रेल्वे विलंबाने धावत असून हवाई वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रदेशात थंडीने कहर केला असून थंडीची लाट आल्यामुळे मध्य प्रदेश शासनाने प्रदेशातील शासकीय व खासगी शाळांच्या इ. आठवीपर्यंतच्या वर्गांना आजपासून (ता. ६) १५ जानेवारीपर्यंत सुट्या जाहीर केल्या आहेत.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...